Tuesday 31 January 2017

मख्ख थकवा आलाय विवेकाला

मख्ख थकवा आलाय विवेकाला..

सनसनाटी बनवलेल्या बातम्या,
सारख्याच प्रांजळपणाचा दावा करणारी
विरोधी नेत्यांची भाषणं,
विचारवंतांमधली मतमतांतरं,
दारिद्र्य रेषेच्या वर-खालची
व्यथित करणारी दृश्य..

या आणि अशा पुष्कळांनी
मख्ख थकवा आणलाय विवेकाला..

भीती वाटते अशा कुठल्याही विषयावर
मत मांडायची
अनाकलनीयतेच्या बोटाला
धाडस होत नाही
कुणाला साधं लाइक करण्याचं...

थकव्यापुढे दोन पर्याय आहेत-

डिप्रेशनच्या कोषात मिटून बसायचं
किंवा झिंग झिंग झिंगाटच्या
तालावर नाचणाऱ्यांची
मानसिकता आवडून घ्यायची
थिरकायचं बसल्याजागी...

आपल्या देशभक्तीचा पुरावा
मागायला कोणी येत नाही..
कोणी विचारत नाही
भारतीयत्वाची आपली व्याख्या..

पण त्या निमित्तानं विवेकाचं दार उघडलंच
तर बेंबीच्या देठापासून फुटतो टाहो
पण उमटत नाही आवाज क्षीणसाही
कपाळावर उठतात
जेमतेम चार दोन अठ्या...
त्यातून ना रक्त निथळते ना घाम..!

माहीत नाही, अशांना
जगण्याचा हक्क आहे की नाही..

पण थकवा आलेल्या देहाला आणि विवेकाला
प्रार्थनेवर विश्वास ठेवण्याची सूट घेऊन
सगळ्या निराश उद्वेगांवर
तिचं पांघरुण घालता येईल ना?
क्षणभर तरी हसेल ना
निर्मळ मनाच्या तलावातलं चांदणं?
***
आसावरी काकडे
३०.१.२०१७

Monday 30 January 2017

शब्द कसलेला नट

शब्द पांघरती शाल
कुणी देऊ केली तर
आणि नेसतात शालू
कुणी सांगितले तर

कुणी घालताच साद
शब्द होतात माऊली
गर्द अंधारता मौन
शब्द होतात दिवली

शब्द कसलेला नट
रूप कोणतेही घेती
कधी होऊन प्रतिमा
अर्थ-नर्तन दाविती

शब्द आतून बाहेर
कधी बाहेरून आत
शब्द अखंड रियाज
बोलविती निळे आर्त

शब्द असतात साध्य
शब्द स्वरूप-साधना
शब्द जागविती स्वत्व
शब्द स्वतःला प्रार्थना..!
***
आसावरी काकडे
२९.१.२०१७

अखेरचा श्वास..

जन्मतः मिळती  मोजलेले घास
अखेरचा श्वास  ठरलेला

श्वास येतो जातो  त्याचा नसे वास
अखेरचा श्वास  कोणा कळे

सांगता न ये  कोणता निःश्वास
अखेरचा श्वास  ठरणार

येणार येणार  होत राही भास
अखेरचा श्वास  हूल देई

अखेरचा श्वास  येतो अखेरीस
त्याचा उच्छवास  होत नाही

जात्या जिवासवे  प्रस्थान ठेवतो
सोबत करतो  पार्थिवाला..!
***
आसावरी काकडे
२८.१.२०१७

Friday 27 January 2017

अडकला का आत ते नाही कळाले

(ज्ञानेश्वरी उपमा ७)

अडकला का आत ते नाही कळाले
पंख होते त्यास ते नाही कळाले

माणसे त्याचीच रूपे विनटलेली
पिंजरा हा देह ते नाही कळाले

बेहिशोबी भान देही गुंतलेले
पैल आहे काय ते नाही कळाले

पंख ज्ञानाचे स्वयंभू मानवाला
जन्मता असतात ते नाही कळाले

कैक आले सांगण्या येथे परंतू
प्रेषिताचे रूप ते नाही कळाले!
***
आसावरी काकडे
२७.१.२०१७

चराचर त्याचे विलसित

(ज्ञानेश्वरी उपमा ४)

तरंग होऊन  स्वतःशीच खेळे
जळी जळ लोळे  स्वानंदात

तसा तो खेळतो  होऊन अनेक
पण तोच एक  ठायीठायी

सर्व दृश्यजात  केवल असणे
विविधांगी लेणे  ईश्वराचे

प्रत्येक कण हे  घर ईश्वराचे
चराचर त्याचे  विलसित

त्याच्याविना एक  क्षण जात नाही
कण रिता नाही  त्याच्याविना..!
***
आसावरी काकडे
२७.१.२०१७

नाही कळाले

कोण माझा मोर ते नाही कळाले
नाचता आले कसे  नाही कळाले

कल्पना केली न ते हातात आले
कोण देणारा असे नाही कळाले

कौतुकाच्या सोहळ्यांनी खूश केले
स्वत्व पण बोलावते नाही कळाले

पौर्णिमेचा चंद्र नाही उगवलेला
शब्द का धुंदावले नाही कळाले

अत्तरांचे गंध माखुन घेतले मी
फूलपण कोमेजले नाही कळाले

या निळाईशी मनाचे काय नाते
दूरचे की जवळचे नाही कळाले..!

तो भयाने फांदिला बिलगून बसला
पंख होते लाभले नाही कळाले
***
आसावरी काकडे
२६.१.२०१७

Tuesday 24 January 2017

नव्या आयुष्याचे स्वप्न

नव्या आयुष्याचे स्वप्न
पैलतीराला पडते
तेव्हा ऐलतीरापोटी
कुणी नवा जन्म घेते

ऐलतीरी जन्मणारे
कधी असतो आपण
घेतो भोगून पुरता
आयुष्याचा कण कण

कधी संथ कधी लाटा
नाव चालत राहाते
जन्मऋण चुकवत
पैलतीराला पोचते

खाली उतरता जीव
नाव फिरते माघारी
नव्या आयुष्याचे स्वप्न
पुन्हा नेते ऐलतीरी

ऐल-पैल आदि-अंत
हे तो अमूर्ताचे लेणे
नावेतील येरझाऱ्या
मर्त्य जिवाचे खेळणे..!
***
आसावरी काकडे
२३.१.२०१७

Monday 23 January 2017

आयुष्यासोबत..

आयुष्यासोबत  गुण-अवगुण
मोजलेले क्षण  ओटी आले

मिळाल्या क्षणांचा  विचार न केला
अवगुण-काला  आवरला

कळो आले मना  उणेपण काय
तरंगांची साय  खरडली

आकांत करून  अवगुण-झोळी
पुरी रिती केली  हळू हळू

कसोटीच्या क्षणी  पण उमगले
आत रुतलेले  होते बाकी

त्वचाच झालेले  जणू जन्मजात
टाकायची कात  त्यांची कशी?

नवा आकांतही  होत गेला क्षीण
त्याने मातीपण  स्वीकारले..!
***
आसावरी काकडे
२१.१.२०१७

Saturday 21 January 2017

जन्म पुढे नेती..

(ज्ञानेश्वरीतील उपमा)

पहिल्या पावला
बोट माऊलीचे
साऱ्या संस्कारांचे
बळ त्यात

शाळा गुरूजन
पुढे चालविती
स्वत्व जागविती
व्यक्तित्वात

गृहस्थाश्रमात
अनुभव गुरू
सावरते तारू
वेळोवेळी

प्रश्नचिन्हांमधे
बुडता आकंठ
सारे आडकंठ
भिवविती

अशा वेळी भेटे
संचित सावली
संताची दिवली
हाती येते

मार्ग दावणारे
रूप बदलती
जन्म पुढे नेती
तेजाकडे..!
***
आसावरी काकडे
९.२.२०१७

Tuesday 17 January 2017

स्वर-स्पर्श

किती काळ गेला
स्वप्न मिटलेले
मौन बुडालेले
नेणिवेत

एकेका जन्माचे
पुण्य प्रसवले
शब्द जन्मा आले
मौनातून

आता अक्षरांना
प्रतीक्षा स्वरांची
रात्रीला चंद्राची
असे तशी

तमातून यावा
उजेडाचा स्वर
उजळावा नूर
आकाशाचा

तसा स्वर-स्पर्श
व्हावा अक्षरांना
डोह-कंठी ताना
फुटो याव्या..!
***
आसावरी काकडे
१७.१.१७

एकल पक्षी

आकाशातिल एकल पक्षी
उडून गेला कोरत नक्षी
कुणी न होते सोबत त्याच्या
निजे येउनी अपुल्या वक्षी

उपासमारी झाली तरिही
पंखांचे बळ जोखुन पाही
भोग भोगण्या जन्म नसे हा
हार-जितीला महत्त्व नाही

उरे एकटा उंच उडे तो
त्याला वारस कोठे मिळतो
रमती सारे इथे असे की
उडणारा तो वेडा ठरतो

स्वत्व परंतू गवसे त्याला
जनलोकांची तमा कशाला
एकाकीपण भले येउदे
सार्थ कराया जन्म मिळाला..!
***
आसावरी काकडे
१७.१.१७

Sunday 15 January 2017

नवलाव झाला..

नवलाव झाला
पारिजात पुन्हा
फुलला जोमाने
ऋतू नसताना

ऋतू नसताना
मेघ गोळा झाले
आसवांसारखे
मुक्त ओघळले

मुक्त ओघळले
धरा तृप्त झाली
खोलवर माती
पुन्हा डहुळली

पुन्हा डहुळली
नवलाव झाला
ऋतु नसताना
प्राजक्त फुलला

प्राजक्त फुलला
आपुल्या शैलीत
ऋतुचक्र त्याचे
त्याच्याच बुंध्यात..!
***
आसावरी काकडे
१५.१.२०१७

Saturday 14 January 2017

नवल

प्रत्येकाच्या आत
एक वनराई
तिची नवलाई
कोण जाणे ?

वाजतसे वेणू
रंध्रा रंध्रातून
गात्रांच्या मधून
वाहे नदी

गंध दरवळे
श्वास-निश्वासात
आतल्या कोषांत
मिटलेला

स्पर्शातून वाहे
जगण्याचा स्वाद
प्राणात गोविंद
निराकार

नवल असे की
पिंडी ते ब्रह्मांडी
तरी ऐल थडी
घट रिता
***
आसावरी काकडे
१४.१.२०१७

आता...

किती जन्मोत्सव
भोगले सुखाने
आता समाधाने
घर केले.

कैक पौर्णिमांचा
उजेड घरात
नाही भिववीत
तम आता

विस्मृतीत गेले
वेदनांचे पर्व
आता बाकी सर्व
सूख आहे

नांदते गोकुळ
भोवती, मनात
आता विजनात
कोण जाई

रोम-रोमांमध्ये
साफल्य जिण्याचे
आता नाम त्याचे
आहे ओठी

दिवा मालवाया
आधाराची काठी
आता जगजेठी
सोबतीला..!
***
आसावरी काकडे
१४.१.२०१७

Friday 13 January 2017

जन्मोत्सव

जन्मोत्सव झाला
दृढ झाली नाती
आनंदा गणती
राहिली ना

कोवळेसे ओठ
शब्दांना मिळाले
पारणे फिटले
आनंदाचे

झाले पदार्पण
सुखावली भुई
आनंदली घाई
ओतप्रोत

आनंदा उधाण
येईल येईल
जाणता होईल
बाळराजा

अनुपम्य आहे
जीवन प्राकार
जणू अनुकार
आनंदाचा..!
***
आसावरी काकडे
१३.१.२०१७

आनंदाचा अनुकार - ज्ञानेश्वरीतली उपमा

Tuesday 10 January 2017

मिटल्या पापण्यांआड...

धुवाँधार पावसात
चिंब भिजून निथळणाऱ्या चेहऱ्याच्या
या छायाचित्राखाली
लिहिलीय एक ओळ
'मिटल्या पापण्यांआड...'

ती वाचण्याच्या निमित्तानं
तुम्ही छायाचित्राच्या जवळ जाल
तर फक्कन दिवे लागावेत
तशा उघडतील पापण्या
आणि आत दिसतील तुम्हाला

अनंत गतजन्मांचे भोग
प्रतीकरूपात विखूरलेले अस्ताव्यस्त...
उंच कापलेले पाहाड... दऱ्या
मधून वाहणारे रस्ते
हिरवी शेतं... फुलांचे ताटवे
किंवा ओसाड जमीन... रखरखीत डोंगर
माणसांचे जथ्थे.. वाहनं..
प्राणी.. पक्षी नि काय काय
.........

पाहता पाहता तुम्ही थकून जाल
मागे फिराल
पण.....
तुम्हाला आत घेऊन
छायाचित्रातील पापण्या मिटलेल्या असतील
आणि तुम्ही कैद व्हाल
मिटल्या पापण्यांआड....

छायाचित्र आतून पाहाल
तेव्हा कळेल तुम्हाला
की निथळणारं
ते पाणी पावसाचं नाही
गोठलेले अश्रू आहेत ....
ओघळतायत आता तुमच्या उबेनं...!
***
आसावरी काकडे
१०.१.२०१७

थंडीत या गुलाबी

थंडीत या गुलाबी
आनंद बिलगण्याचा
ग्रीष्मात विरह सोसू
स्वीकार येई त्याचा

हरवू धुक्यात आता
भेटूच ऊन येता
रंगून खेळ खेळू
हरवून शोधण्याचा

तू सांग ऐकते मी
तू उडव झेलते मी
बदलून भूमिका या
समजू स्वभाव त्यांचा

शालीत मिटुन जाऊ
अपुलीच ऊब घेऊ
आता पुरे दिलासा
येईल त्या क्षणाचा..!
***
आसावरी काकडे
१०.१. २०१७

झाडास सावळा गं..!

झाडास पाखराचा
लागे असा लळा गं
गाई सुरेल, त्याचा
आनंद आगळा गं

जाता उडून दूर
येई भरून ऊर
होता उशीर थोडा
दाटून ये गळा गं

पाना-फुलात खेळे
पसरून पंख भोळे
इवलेच रूप त्याचे
अन रंग तो निळा गं

आकाश सोबतीला
भुलवीत रंग-लीला
घे पाखरू भरारी
झाडास सावळा गं..!
***
आसावरी काकडे
९.१.२०१७

Saturday 7 January 2017

उजेडाची माया

गर्भगुहेतून  पडता बाहेर
मिळाला आहेर  उजेडाचा

तमाचे कवाड  बंद झाले पुन्हा
आयुष्याचा पान्हा  ओठी आला

विनटत गेली  माऊलीची माया
जोजविली काया  तळहाती

'मी'पण आकारा  येत गेले तसे
अस्तित्वाचे फासे  दृढ झाले

वेटाळत गेली  माया उजेडाची
सावली तमाची  दुरावली

वाटते फिरून  शिरावे गर्भात
डोळे दीपतात  फार तेव्हा..!
***
आसावरी काकडे
७.१.२०१७

तो..

मीच साक्षी ज्यास होते काळ तो गेला पुढे
की कळेना मीच त्याला सोडुनी आले पुढे

काय नाते आपुले त्याच्या सवे ते नाकळे
वाढते आयुष्य की होते उणे त्याच्यामुळे

काळ सर्वांना उखाणे घालतो हे नेहमी
सोडवाया सर्व घेती उत्तरांची ना हमी

तो पुढे ना जात किंवा ना कुणाला थांबतो
तो असे सर्वत्र, काही सांगतो ना ऐकतो..!

काळ आहे फक्त साक्षी पार्श्वभूमीसारखा
जीवनाचा खेळ चाले त्या समोरी सारखा..!
***
आसावरी काकडे
५.१.२०१७

Wednesday 4 January 2017

रेषा केवळ..

तळहाताच्या पाटीवरती
असती केवळ रेषा
काही नसते त्यांच्या खाली
मूकच असते भाषा

बाळमुठीच्या बंद त्वचेवर
रेषांचे वळ उठती
वृद्ध त्वचेला जशा सुरकुत्या
थकल्यावरती पडती

रेषा केवळ पार्थिव घटना
देहासम त्या नश्वर
दिसे कुणा पण त्यांच्या खाली
विधिलिखिताचे अक्षर..!
***
आसावरी काकडे
४.१.२०१७

ज्ञानाचा वारसा

कष्ट सोसुनिया सारे
स्वतः शिकली सावित्री
बायांसाठी झाली माय
जणू सोशिक धरित्री

पतीसोबत अथक
माय चालत राहिली
शेण दगड जनाचे
झेलून ती पुढे गेली

तिच्या काळात तिनेच
उजळली क्रांती ज्योत
होता समाज झोपला
माय राहीली जागत

सणासुदिला घेतला
तिने शिकायचा वसा
आणि कित्येक पिढ्यांना
दिला ज्ञानाचा वारसा..!
***
आसावरी काकडे
३.१.२०१७