Saturday 30 April 2016

व्हावं एक गर्द सावली..


लाल फुलांनी पूर्ण बहरलेल्या
पक्व गुलमोहरासारखे पसरलेले ठेवावेत
आपण आपले बाहू सदैव

काय सांगता येतं
दूर कुणी उभं असेल कड्यावर
स्वतःला ढकलून देण्याच्या टोकावर..
दुरून दिसेल त्याला अंधुक आधार
बुडणार्‍याला किनारा दिसावा तसा..
आधाराच्या दर्शनानंच
मागं फिरेल तो
परतेल स्वतःत सुखरूप..!

जमिनीवर गालिचा रेखत
विखरून पडलेल्या त्याच्या फुलांसारखं
आपण अंथरून ठेवावं आपलं मन
काय सांगता येतं
कोसळण्याचा क्षण कधी येईल
आणि झेलायला नसेल कुणी आसपास
तेव्हा तेच
अलगद सावरेल आपल्याला वरच्यावर..

सदैव सज्ज असावं आपण
उन्हाच्या झळा सोसूनही
बहरणार्‍या गुलमोहरासारखं
व्हावं एक गर्द सावली
दुसर्‍यासाठी
आणि स्वतःसाठीही..!!
***
आसावरी काकडे

३० एप्रिल २०१६ 

सदा असे तान्हा


ऐल पैल भाषा बोलतात तीर
मधे समांतर वाहे नदी

कधी खळाळत कधी संथ शांत
खोलात आकांत असे कधी

मिळेल ती वाट आपली म्हणते
वाहात राहाते काळासवे

भूत भविष्याची तमा नाही तिला
तिच्या सोबतीला वर्तमान

नित्य नवा जन्म तीच नसे पुन्हा
सदा असे तान्हा ओघ तिचा..!

***
आसावरी काकडे

३० एप्रिल २०१६

शब्द मिळेल शहाणा..!


कोण काठीला गाजर
बांधुनिया धावविते
धावण्याचे श्रेय सारे
उगा गाजराला जाते

पावलांना अमिषसे
कधी लागते गाजर
पण व्हावा आवेगांचा
नित्य आतून जागर

हळुहळु विसरावी
बाह्य प्रेरणांची साद
खोल जाऊन शोधावा
स्वत्व असलेला शब्द

तप असते कविता
कुणी म्हणे असे वीज
कसे कागदी शब्दांना
सोसेल हे तप्त बीज?

सारा दाह सोसणारी
व्हावे लागते जमीन
अंकुरांच्या जन्मासाठी
लागे फुटावे आतून

जन्म बाईचा लाभला
नाही अनोळखी वेणा
सोस त्याच कळा जरा
शब्द मिळेल शहाणा..!

***

२८ एप्रिल २०१६

Wednesday 27 April 2016

कोकिळेच्या कूजनात


कोकिळेच्या कूजनात
कधी माधुर्य हसते
लपलेली आर्तताही
कधी कधी उसासते

किती पाने खत झाली
वसंताच्या स्वागताला
आठवे का आधेमधे
गाताना हे कोकिळेला?

पक्षी राईचे होऊन
बहरही भोगतात
तिच्या कुशीत शिरून
पानगळ स्मरतात

पक्षी राई भुई नभ
एकमेकांच्या भानात
श्रेष्ठ माणसे परंतू
त्वचेआड जगतात..!

***
२७ एप्रिल २०१६

नेक्स्ट


आधीपासून चालू असलेल्या संवादात
खंड न पाडता डॉक्टरनं
डाव्या कुशीवर हात वर करून
निजलेल्या पेशंटच्या छातीवर
जेल लावलेले
माइकसारखे दिसणारे यंत्र टेकवले
आणि समोरच्या कॉम्प्युटरवर दिसणारी
हृदयाच्या धडधडीची आकडेवारी
स्टेनोला सांगावी तशी
कुणाला तरी सांगितली

संवाद चालू ठेवत
छातीवर माइक फिरवत
आणखी एका आलेखाचे डिस्क्रिप्शन..

छातीला टोचत होता हात..
पण पेशंट
एक माणूस नाही नंबर होता..

परत माइक फिरला
परत आकडेवारी...
पेशन्स संपायच्या आत
काम झाल्याची सूचना मिळाली...

सगळे अवयव गोळा करून
पेशंट उठेपर्यंत
संवाद चालू ठेवत
बाजूला काढून ठेवलेल्या पेशंटच्या वस्तू
गोळा होऊन त्याच्या हातात गेल्या

‘माझं हृदय काय म्हणालं?’
वस्तू सावरत, बिचकत त्यानं विचारलं
‘नंबर सांगा उद्या मिळेल रिपोर्ट’

नेक्स्ट..
संवाद चालू
पुढचा नंबर डाव्या कुशीवर..!

***

या अबोलीला..


या अबोलीला कुणी
आता जरा अवराल का
एवढासा जीव त्याला
बहर हा पेलेल का

भोवती या चौकटी अन
प्रहर तल्खीचा असा
देखणासा रंग त्याला
मूकतेचा शाप का?

***
२६ एप्रिल २०१६

Monday 25 April 2016

ग्रीष्माच्या स्वप्नात

ग्रीष्माच्या स्वप्नात
असे पावसाळा
आणि पायथ्याला
गेलेला हिवाळा

किती भाग्यवान
स्वतः तापलेला
तरी शीतलता
उशा पायशाला

पदरात आला
ग्रीष्म जरी आज
पावलांत त्याच्या
पावसाची गाज

दृश्याला असती
दोन टोके नित्य
वर मधे खाली
समग्र ते सत्य

***


२५ एप्रिल २०१६

Saturday 23 April 2016

हे जहाज..


दशदिशांना वेढून असलेला
हा अथांग सागर
अधिक अनाकलनीय
की वर्षानुवर्षे
त्यावर तरंगत राहाणारे
हे जहाज?

सागराची अनाकलनीयता
एकखट्टी
अगदी स्पष्ट
निर्विवाद..!
तिचा नाद सोडून तरी देता येतो

पण हे जहाज
पंचेंद्रियांच्या दृष्टिक्षेपात असलेले..!
मोजता येतात याच्या खोल्या
जाणवते त्यांतली
अखंड चाललेली वर्दळ
धडधड ऐकू येते स्पष्ट
आणि जावळासारखे हुंगताही येते
त्याचे तरंगत असणे

वाटतं लख्ख उघडं आहे पुस्तक समोर
पण एक अक्षर वाचता येत नाही
टपटप गळतात कितिकदा
थेंबांसारखी पाणफुले
पण वेचता येत नाहीत

आकलनाचा किनारा दिसतो
अगदी हाताशी असल्यासारखा
पण त्यावर उतरता येत नाही..!

भूत-भविष्याचा अख्खा अहवाल
कोरलेला असतो म्हणे
त्याच्या प्रत्येक कणाच्या गुणसूत्रांत..
पण तो उमगत नाही कधीच

लखलाभ असो तुझे तुला
ते अथांग अनाकलनियत्व
असं म्हणता येतं
सागराला

पण हे जहाज...
हाती लागता लागता निसटून
उंच जाणार्‍या झोक्याप्रमाणे
झुलवत ठेवते आपल्याला...
कळत नाही कोण आहे
असं झुलवणारा या जहाजाचा कप्तान
आणि किती काळ असं झुलत राहायचं
त्याच्या मर्जीनुसार..?

***

२३ एप्रिल २०१६

भेटे नवी राई..


घुसमटे जीव देहाच्या घरात
आतला आकांत साहवेना

तडे फार गेले कोसळोत भिंती
नवे तडे जाती लिंपण्याला

कधीचा चालला जीवाचा प्रवास
किती काळ वास एका ‘मी’त

संपता मुक्काम भस्म होई घर
खुणा मातीवर किती काळ?

नव्या पावलांनी सजे पुन्हा भुई
भेटे नवी राई नव्या जीवा..!

***

(२० एप्रिल २०१६)