Tuesday 13 July 2021

क्षणिका-



गर्द हिरवा गर्द पिवळा रंग त्यांनी प्राषिला
कोवळासा गंध सात्त्विक अंतरंगी उगवला
बी कवींचा सोनचाफा मौन धरतो गूढसे
उगवलेला गंध तरिही हसत राही गोडसे..!
***
आसावरी काकडे
२९.५.२०२१

दिवसभराचे चित्र स्मरावे निजताना रात्री
चितारायचे काहि नुरावे निजताना रात्री
अहोरात्र त्या नक्षत्रांच्या चमचमती दिवल्या
दिवे घरातिल मंद करावे निजताना रात्री..!
***
आसावरी काकडे
२८.५.२०२१

मी पाठीवरती मलाच वाहत असते
अन अक्षरांमधे मलाच कोरत असते
प्रत्येक ऋतूचा रंग वेगळा सुंदर
एकेक लेउनी मलाच सजवत असते..!
 *** 
११.७.२०२१

आयुष्य न केवळ...

आयुष्य न केवळ इथे, जन्मते-मरते
ते विश्व-पटाची वीण सावरित असते

कोसळतो पाउस ऊन अचानक पडते
खेळातुन त्यांच्या इंद्रधनू अवतरते

पाखरू सानुले दाणे टिपुनी उडते
धरतीवर नकळत वृक्षारोपण होते

एकांती कोणी आर्त मनी जागवते
नि:शब्द प्रार्थना कुठे धाउनी जाते..!

**
आसावरी काकडे 
१३.७.२०२१

तो मी नव्हेच


हे दुख ते दुख म्हणून जो लक्ष वेधून घेतोय,
चित्ताला अस्वस्थ करतोय तो मी नव्हेच

हवा कुंद झालीय, आकाश काळवंडलंय
म्हणून ज्याचं हृदय धडधडतंय तो मी नव्हेच

आनंदानंही विचलित करणारं मन
ज्याला बिथरवतंय तो मी नव्हेच

अस्तित्वाच्या एकेका चेहऱ्याला 'तो मी नव्हेच' म्हणत
पुढं जाता जाता प्रत्येक वेळी लक्षात येतं

की 'तोच मी' चा मुक्काम
मृगजळासारखा आणखी थोडा दूर गेलाय..!

***
आसावरी काकडे
८.६.२०२१
 ५.४०

Monday 5 July 2021

भूमिका


मी आता भूमिका बदलली आहे
फक्त भूमिका नाही
हावभाव आणि नेपथ्यही..!

बांधलेलं सामान सोडून जागच्याजागी सजवून ठेवलंय

गाडी चुकली नव्हती... आलीच नाही
वाट बघत होते तयार होऊन
सहर्ष
पण गाडी आलीच नाही
मग वाट पाहणं सोडून
'आता-इथं'च्या स्थानकावरून उठले
आणि 'जिजीविषेत शतं समा:'चं
बोट धरून परतले स्वगृही
सहर्षच

आवराआवरी झालेलीच आहे
पण आता मी भूमिका बदलली आहे
मी 'एक्झिटची वाट पाहणारी' नाही
'नाट्यात रंगलेली' झाले आहे..!

***
आसावरी काकडे
३.७.२०२१

चेहरा हसरा सदा ठेवू चला


चेहरा हसरा सदा ठेवू चला
रंग दुःखाचा जरा बदलू चला

तोंड झाकुन राहणे आता पुरे
श्वास थोडा मोकळा घेऊ चला

देह असते बाळ आईने दिले
खेळ त्याचा रंगुनी पाहू चला

अप्राप्यसे क्षितिज मृगजळ वाटते
पण खरे मानून ते धावू चला

वाचला इतिहास तो झाला जुना
सत्य आता त्यातले शोधू चला

दहशती अदृश्य साऱ्या भोवती
भेदुनी त्यांना पुढे जाऊ चला

***

आसावरी काकडे
२.७.२०२१

दाही दिशांना..


केंद्रबिंदू ठाव सोडुन धावतो दाही दिशांना
प्रसवणारा परिघ होउन फाकतो दाही दिशांना

वंचना घेऊन पदरी भटकती रस्त्यावरी ते
सांत्वनाचे दान कोणी मागतो दाही दिशांना

वेगळाले कैक रस्ते साद देती माणसांना
मोह सगळ्याचाच त्यांना पळवतो दाही दिशांना

स्वत्व अर्पुन बीज इवले सत्व मातीला पुरवते
गंध त्यातुन उगवलेला पसरतो दाही दिशांना

छाटल्यावर सर्व फांद्या रिक्त झाले झाड माझे
कैफ जगण्याचा तरीही बहरतो दाही दिशांना..!

मंच हा अवकाश सारा काळ असतो पार्श्वभूमी
रंगकर्मी रचुन नाट्ये दावतो दाही दिशांना..!!

***

आसावरी काकडे

३०.६.२०२१