Friday 26 May 2017

कसे व्हावे जिणे वाहणारे पाणी

माळी नेतो तसे  सुखे जाते पाणी
पेरणी रुजणी  माळी जाणे

असे पाणी कधी  होता येईल का?
चिंता मिटेल का  भविष्याची?

कड्या कुलुपात  जिणे बंद केले
काळाला बांधले  वर्षांमध्ये

भाव अक्षरात  अक्षरे सुरात
सूर बंदिशीत  बंद केले

नावांमध्ये, सर्व  नात्यांना बांधले
देवाला कोंडले  मंदिरात

कसे व्हावे जिणे  वाहणारे पाणी
माळ्याची पेरणी  जाणणारे..?
***
आसावरी काकडे
२५.५.२०१७

काहीच नसते चिरेबंदी इथे

नाव या विश्वाची  अखंड चालते
कोण वल्हविते  वल्ही जाणे

स्वयंभू गतीने  क्षण येतो जातो
हलत राहतो  कण.. कण

आकाशगंगाही सूर्यमालेसह
फिरते सदेह  अव्याहत

मुरवून अंगी  पृथ्वीचे भ्रमण
भ्रमतो आपण  तिच्यासवे

काहीच नसते  चिरेबंदी इथे
अखंड वाहते  जीवन हे..!
***
आसावरी काकडे
२५.५.२०१७

Tuesday 23 May 2017

नव्या रात्रीसाठी

आठवणींच्या चांदण्या लुकलुकतात आकाशात
जेव्हा गाढ निद्रेत असते
भोवतीचे जग
आणि फक्त आपण असतो
टक्क जागे..!

कुठुन कुठुन आलेल्या
कसले कसले
रंग.. गंध.. स्वाद.. ल्यालेल्या
विदेही होऊन चांदण्या झालेल्या
अनिवार आठवणी..

सोबत करतात रात्री
मनमुराद गप्पा मारतात
एकाकी असताना..
कुठे कुठे फिरवून आणतात
कुणाकुणाला भेटवतात
सुनी रखरखीत रात्र
मखमली करून टाकतात

त्यांना लपवू बघते
मनाच्या गूढ चिरेबंदी गुहेत
पण ठरल्यावेळी
सूर्य हजर होतो क्षितिजावर
आणि आठवणींना
गडप करतो प्रकाश-विवरात

जागे होते भोवतीचे जग..
मग मीही चालू लागते
नव्या दिवसासोबत
वर्तमानात येते आणि
नव्या रात्रीसाठी
अनुभवांच्या नव्या चांदण्या
जमवू लागते..!
***
आसावरी काकडे
२३.५.२०१७

विवेक,

विवेक,
मस्तिष्क के कौन-से आपे में
बसते हो तुम?

जब बेमतलब गुस्सा आता है
और सबकुछ ध्वस्त कर देता है

जब हवस बेकाबू बन
जीत लेती है संयम को

जब बेबुनियाद चिंता
खरोंचती है दिल को
चूहे की तरह

और उदासी बेवजह
मौत की राह देखने के लिए
मजबूर करती है

तब, तब विवेक
तुम कहाँ मुँह छिपाए बैठते हो?

बोलो, बोलो विवेक
मस्तिष्क के कौन-से आपे में
बसते हो तुम?

बसते हो ना?
***
आसावरी काकडे
२०.५.२०१७

Friday 19 May 2017

तुझ्यासाठी पार्था

तुझ्यासाठी पार्था
विश्वरूप ल्यालो
आणि आता भ्यालो
म्हणतोस

पुन्हा तुझ्यासाठी
होईन सारांश
विराटाचा दंश
निववीन

पण असो चित्ती
सदा तेच रूप
सगूण स्वरूप
विरणारे

कृष्णरूप तर
एकाच युगाचे
विराट ग्रंथाचे
मुखपृषठ..!
***
आसावरी काकडे
१९.५.२०१७

Wednesday 17 May 2017

निळी चाहूल

लागली निळी चाहूल
परंतू हूल
देउनी गेली

अंधार दाउनी नवा
पुन्हा ती दिवा
लावुनी गेली

या नव्या तमातुन कुणी
एक चांदणी
अशी लुकलुकली

देऊन हुलीला हूल
निळी चाहूल
पुन्हा अवतरली..!
***
आसावरी काकडे
१६.५.२०१७

Saturday 13 May 2017

सर्वात्मक असतो तो..!

आकाशी चंद्र किती
फुलांमध्ये गंध किती
मोजु नये भरलेले
अंतरात श्वास किती

चंद्राच्या कैक कला
कैक दिशा गंधाला
बंधमुक्त अवकाशी
कैक देह श्वासाला

देहांच्या क्षितिजावर
श्वासांची गस्त असे
देहातिल प्राणाला
देहाचे नाव नसे

पार्थिवात जन्म जरी
अनिर्बंध असतो तो
नाम-रूप एकच ना
सर्वात्मक असतो तो..!
***
आसावरी काकडे
१३.५.२०१७

Friday 12 May 2017

आता हे अथांग

विश्वरूप दाव
हट्ट केला कृष्णा
लगोलग तृष्णा
शमविली

पाहिला अपार
विभूती-विस्तार
आश्चर्या ओसर
पडेचना

आकळाया सारे
दिलेस माधवा
ज्ञानचक्षू तुवा
पामराला

भयकारी रूप
तरी पाहवेना
मना साहवेना
प्रलय हा

जणू झाड झाली
दीन लोकसृष्टी
कालिंदीच्या तटी
वाटतसे

त्याच झाडाचे मी
इवलेसे पान
तरी मला ज्ञान
दिलेस तू

दुःखकालिंदीचा
दावलास थांग
आता हे अथांग
माघारी घे
***
आसावरी काकडे
१२.५.२०१७

मुक्तके

देऊन जन्म मजला आयुष्य दान केले
झिजवून देह अपला मजला तिने घडविले
साऱ्याच शृंखला ती तोडून आज गेली
सारे निभावुनी अन आतून मुक्त झाली..!
***

थवे येथे उजेडाचे असावे वाटले थोडे
पाखरांना जरा खाली बसावे वाटले थोडे
किती कल्लोळ कोषांचे अंतरी साहिले त्यांनी
कळ्यांनाही उन्हामध्ये हसावे वाटले थोडे
***

रोज पहाटे दिवस उगवतो अन मावळतो संध्याकाळी
स्वप्नांना उठवून पहाटे घरी धाडतो संध्याकाळी
रोज उपसतो श्वास तमातुन पेरत जातो देहांमध्ये
मावळण्याआधीच, उद्याचा दिवा लावतो संध्याकाळी..!
***
आसावरी काकडे
२५.४.२०१७

Tuesday 9 May 2017

उगवणे थांबत नाही

निरोप घेता येत नाही
साचलेले संपत नाही
उगवणे थांबत नाही
रुजलेले

येऊ द्यावे येणारे
जाऊ द्यावे निसटणारे
उगा कोणा हाकारे
देऊ नयेत..

शब्द तर वारा केवळ
ओठी ये होऊन कवळ
रिचवून घ्यावे जवळ
येती तेव्हा

नाही तर उगी राहावे
मुळे रोवून असावे
पक्षांसाठी झाड व्हावे
मूक प्रतीक्षेचे

असो नसो आत शब्दाई
व्हावे पालखीचे भोई
प्रस्थानाची कासया घाई
निमंत्रणाआधी..!
***
आसावरी काकडे
८.५.२०१७

Saturday 6 May 2017

सोसला वैशाख..

सोसला वैशाख
स्वजन-मोहाचा
वास अज्ञानाचा
रोमरोमी

तेव्हा तू झालास
जिवाचा सारथी
कर्मयोग हाती
ठेवलास

ग्लानीतल्या मना
जाग आणलीस
आणि पाजलेस
ज्ञानामृत

तहान वाढली
मनाच्या भुईची
विश्व-दर्शनाची
लागे ओढ

जीव झाला जणू
पक्व वर्षाऋतू
आणि मेघ रे तू
अमृताचा..!

बरस असा की
'विरक्ती' विरेल
हृदयी जागेल
संजीवन..!
***
आसावरी काकडे
६.५.२०१७