Saturday 29 December 2018

तू निराकार...

तू निराकार
तरी विश्वाकार धारण केलास
तू गुणातीत
तरी त्रिगुणांनी नटलास
तू निर्विकार
तरी उगवत मावळत राहिलास
तू एकमेव
तरी अनंत झालास
तू केवल असणेपण
तरी अस्तित्वरूपांत प्रकटलास
तू सर्वात्मक .. स्वतंत्र.. आनंदस्वरूप
तरी देहांच्या पिंजर्‍यात बद्ध झालास..
दुःखाने घायाळ झालास
तू सत्‍स्वरूप.. उपाधीरहीत.. दिगंबर
तरी विश्वनिर्माणासाठी ब्रह्मा झालास
विश्वपालनासाठी विष्णू झालास
विश्वलयासाठी महेश झालास
आणि भक्तांसाठी
ही त्रयी एकवटून दत्तात्रय झालास..!
***
आसावरी काकडे
२३.१२.२०१८

Tuesday 9 October 2018

कोणतं क्षितिज खरं?

क्षितिजाकडे बोट दाखवून
मी म्हणेन, ती बघ
असीमालाही सीमा आहे...

रोरावत येणाऱ्या फेसाळत्या लाटांकडे पाहात
ऐलतीरावर बसून सूर्यास्त दाखवत म्हणेन
तो बघ पैलतीर...

तू डोळे विस्फारून पाहत राहाशील
काहीतरी अद्भुत दिसल्याचा आनंद
निथळेल तुझ्या निरागस डोळ्यांमधून..

असीमाची सीमा
अथांगाचा थांग दाखवून
तुझ्या बाल नजरेला आधार देईन मी टेकायला
पण तुझी नजर विस्तारत जाईल हळूहळू
झेपावेल मी दाखवलेल्या क्षितिजावर
तिथून दिसेल तुला
तुझं नवं क्षितिज
तुझा नवा पैलतीर..
डोळे विस्फारून पाहात विचारशील
कोणतं क्षितिज खरं, हे की ते?
कोणता पैलतीर खरा, हा की तो?

समाधानानं डोळे मिटून मी म्हणेन
तुझं तूच समजून घे ना...!
***
आसावरी काकडे
९.१०.२०१८

आनंदाने...

आयुष्याची फांदी झुकली आनंदाने
निथळतेय ती सचैल भिजुनी आनंदाने

सूख देखणे किती भोगले चवीचवीने
हसते आता वेदनेतही आनंदाने

उदास व्हावे असेच वास्तव जरी भोवती
जगती सारे ओठ मिटूनी आनंदाने

कर्मयोग साधतात झाडे राहुन जागी
फळे त्यागुनी नित्य वाढती आनंदाने

कुणास कळला नाही ईश्वर जरा तरीही
रोज भाबडे पूजा करती आनंदाने

इथे तिथे गळतात सारखी पिकली पाने
त्याच मुशीतुन नवी उगवती आनंदाने..!
***
आसावरी काकडे
८.१०.२०१८

Saturday 6 October 2018

ती चूक झाली...


मौन तेव्हा पाळले ती चूक झाली
आज अश्रू गाळले ती चूक झाली

केवढे केले प्रबोधन जाणत्यांनी
शिष्यही पण हारले ती चूक झाली

अर्जुनाने जिंकले होते स्वयंवर
द्रौपदीला 'वाटले' ती चूक झाली

खूप काही वाचले, अभ्यासले पण
शब्द नुसते साचले ती चूक झाली

भोवती जल्लोष चाले उत्सवांचा
व्यर्थ सारे मानले ती चूक झाली

एकही ना पान आले जवळ त्याच्या
उंच इतके वाढले ती चूक झाली..!

आतही, बाहेरही आहे दिवा पण
मीच डोळे झाकले ती चूक झाली..!
***
आसावरी काकडे

Wednesday 3 October 2018

या सुखानो या...

या सुखानो या म्हणाले
घर सुने सजवा म्हणाले

रंगवा नभ आठवांचे
पंख पसरा ना म्हणाले

रे किती ओसाड झाले
बरस आयुष्या म्हणाले

गंध उसना दे जरासा
पारिजाताला म्हणाले

बोट रुतली वाळवंटी
तार आम्हाला म्हणाले

आमुचा आहे पिता हा
सर्व बापूंना म्हणाले..!
***
आसावरी काकडे
२.१०.२०१८

Sunday 9 September 2018

बहर..

झेप कुंपणा पावेतो
होती, असे वाटलेले
त्याचे झाले मृगजळ
मागे धावत राहिले

विस्तारत गेली झेप
किती क्षितिजे गाठली
परतीच्या वाटेलाही
नवी किरणे दिसली

सारे बहर, वाटले
आता सरले भोगून
झरलेल्या फुलांसवे
गंध गेलाय गळून

पण आतली पुण्याई
पुन्हा आली उजळून
माझा वेडा पारिजात
पुन्हा आला बहरून..!
***
आसावरी काकडे
४.९.२०१८

Wednesday 29 August 2018

तो मदारी..

जीवनाला बंधने दे गुंतण्याला
पण मनाला पंख दे झेपावण्याला

भोवती काही नसू दे दान हिरवे
पण मुळांना खत मिळू दे पोसण्याला

आरसा दावी नको ते आतलेही
चेहऱ्याला मुखवटा दे झाकण्याला

अंत कोणाला कधीही चुकत नाही
वारसांना बळ मिळावे साहण्याला

पावसाला खंड ना, पडतोच आहे
बंध नाही कोणताही बरसण्याला

तो मदारी खेळ करतो माकडांचा
अन इथे पर्याय नाही पाहण्याला..!
***
आसावरी काकडे
२८.८.२०१८

Friday 24 August 2018

मुक्तके

समजले मला की आता इतक्यात निमंत्रण नाही
मुक्काम न हलवायाचा इतक्यात निमंत्रण नाही
बिलगून क्षणांना बसले जे जगणे बाकी आहे
वाटले तरी वाट्याला इतक्यात निमंत्रण नाही..!
**
कळी असा वा गळुन पडा असण्यातुन सुटका नाही
इथे रमा वा निघून जा असण्यातुन सुटका नाही
पूर्णच असते आहे ते अन पूर्णच बाकी उरते
नसण्याला नसते जागा, असण्यातुन सुटका नाही..!
**
सान कुडीचे तुटता बंधन चराचराने केले स्वागत
वर्तमान झुकाला खाली अन इतिहासाने केले स्वागत..!
शब्दांची टरफले निघाली कवच गळाले अर्थावरचे
खाली उरल्या मुक्त स्वरांचे आकाशाने केले स्वागत
***

पत्र लिहावे..

खोल आत काही हलले तर पत्र लिहावे
ओठांवर काही अडले तर पत्र लिहावे

ऊन सावली खेळ चालतो इथे सारखा
चुकून खेळी मन हरले तर पत्र लिहावे

आठवणींच्या रंगमहाली मैफल सजता
कुणी अचानक आठवले तर पत्र लिहावे

कोणालाही थोडासुद्धा वेळच नसतो
प्राणातिल कोणी रुसले तर पत्र लिहावे

स्वतःस द्यावे कधी निमंत्रण भेटायाचे
दारच पण उघडे नसले तर पत्र लिहावे

शहीद होता जवान कोणी सीमेवरती
नयनी अश्रू पाझरले तर पत्र लिहावे...!
***
आसावरी काकडे
२०.८.२०१८

Thursday 2 August 2018

म्हटले होते

आषाढ संपता त्याने  रिमझिमेन म्हटले होते
आल्यावर श्रावण मीही गुणगुणेन म्हटले होते

पण मेघ होउनी कविता वाकुल्या दाउनी गेली
स्वप्नात तिनेही रात्री बोलवेन म्हटले होते..!

सूर्यास्त होउदे मित्रा येउदे तमाचा फेरा
पणतीने विश्वासाने मिणमिणेन म्हटले होते

विश्वास हरवला तेव्हा ती पुन्हा उफाळुन आली
प्रत्येक अशा वेळी मी मोहरेन म्हटले होते

आधार नका रे देऊ सारखा दीन दुबळ्यांना
त्यांच्यातच बळ जगण्याचे चेतवेन म्हटले होते

भरधाव निघाला रस्ता अन दरी खोल सामोरी
पण सावध राहुन त्याने मी वळेन म्हटले होते..!
**
आसावरी काकडे
१.८.२०१८

Saturday 28 July 2018

रांगोळी


रोज सकाळी उठल्यावर
दिनचर्या सुरू करताना
रात्री मनात रेखून ठेवलेली स्वगतं
मनातच ठेवून ती दार उघडते
झाडपूस करते आणि
दारात बसवून घेतलेल्या
कडाप्प्याच्या चौकोनाला
अभिव्यक्तीचं आंगण समजून
एकेका स्वगताचे ठिपके मांडत जाते..
मनात खोल रुतलेल्या
भावनांच्या बारीक रेषांनी
अलगद जोडून टाकते त्यांना..

आणि
तयार झालेल्या रांगोळीत
असे काही रंग भरते
की स्वगतांचे ठिपके दिसेनासे होतात
भावनांच्या रेषाही झाकल्या जातात..
छान जमून जाते रांगोळी
नकळत एक दीर्घ निःश्वास टाकत
ती आत जाते..
तिला घर निरामय.. प्रसन्न वाटू लागते..

रात्री मनात रोखून धरलेली स्वगतं
रांगोळीत मिसळून ती मुक्त झालेली असते
तिला कळतही नाही की रोज दारात  
ती रांगोळी नाही एक कविता रेखत असते..!
**
आसावरी काकडे
२८.७.२०१८

मुक्तके


का उगा सैराट झाले झाड हे
विद्ध की बेधुंद आहे झाड हे
विसरले की काय गगनाची दिशा
का असे इमल्यात घुसले झाड हे?
**

पाहिले परंतू दृश्य राहिले दूर
ऐकले परंतू दूर राहिले सूर
गात्रात त्यातले सत्व उतरले नाही
काढले चित्र पण तसे उमटले नाही..!
**

नेपथ्य कुणाचे त्याला ठाउक नाही
होणार कोणते नाटक माहित नाही
तो सज्ज होउनी वाट पाहतो आहे
उत्कंठा त्याची कुणास उमगत नाही..!
**

Thursday 12 July 2018

रान


धुवांधार पाऊस पडून गेलाय
आणि लगेच लख्ख उघडलंय
सुस्नात रान सावरून बसलंय
मोर बाहेर पडलेयत पुन्हा
पक्षीही पंख झाडून झेपावलेत
असंख्य रंगाकार परतलेत
आपापल्या आकारात...
पण गाढ मौनात आहे परिसर अजून
इथे येऊन गेल्याच्या कैक पाऊलखुणा
वाहून गेल्यायत...
नवागतासारखी मी निरखतेय
आसपास नाहीए कुणी रानाशिवाय
अगदी शांत आहे सर्व
तरी असे का वाटतेय
की कुणीतरी घुसमटतंय
कुणीतरी कोंडी केलीय त्याची
एक शब्द फुटत नाहीए
रानाच्या ओठांतून...!

***

आसावरी काकडे
२६.६.२०१८

मुक्तके



टांगले कोणी हुकाला टांगु दे ना
मौज गिरक्यांची जराशी चाखु दे ना
गुंतणे की मुक्तता ही? काही असो
झिंग थोडी यातलीही घेउ दे ना..!
***
२२.६.२०१८

रात्र म्हणाली दिवसाला मी थकले आहे
तुला वाटते भाग्यवान मी निजले आहे
प्रत्येकाच्या स्वप्नांमागे रोज धावते
सोंगांसाठी तरी अपूरी ठरले आहे..!
***
२४.६.२०१८

चित्रकार की कवी कोण तो लपून असतो
कधी आकृत्या कधी अक्षरे ढाळत असतो..!
कुणास दिसते चित्र त्यामधे कुणास कविता
तो तर केवळ अव्यक्ताला झाकत असतो..!
***
२६.६.२०१८

Wednesday 11 July 2018

आतला पूर

बयो,
किती बेफाम सुटलीयस
मागचे बंध तोडून..
पण जरा बघ
तुझ्या दोन्ही तीरांवर
कोण कोण उभं आहे...

तुझ्या संथ वाहण्यानं
रुजलेत..फुललेत..बहरलेत
किती रंग.. गंध.. किती आकार
तुझा अनावर आवेग त्यांना सोसवेल का?
आणि तुला तरी?
थांबल्यावर भोवळशील गं
सार्‍या भवतालासह..!

‘मला उद्‍ध्वस्त व्हायचंय’
ही बेभान करणारी झिंग
गळामिठी घालून बसलीय तुला
पण आवर बयो हा आतला पूर
सावर स्वतःला
बघ, तुझ्या दोन्ही तीरांवर
कोण कोण उभं आहे
पसरलेल्या बाहूंचे हार घेऊन
संथ होऊन परतलेल्या
तुझ्या स्वागतासाठी...!

पूर पचवशील तर
होशील एक समृद्ध डोह
आवेगांची कमळं फुलवणारा
आणि उद्‍ध्वस्त होशील
तर भवतालासह
फक्त उद्‍ध्वस्तच होशील बयो..!
**
आसावरी काकडे
११ ७ २०१८

Thursday 5 July 2018

नव्या पर्वाच्या प्रतीक्षेत...


ऋतूंच्या वेळापत्रकानुसार 
पंचमहाभूते साजरी करत असतात 
आपली मर्दुमकी
आणि त्यांची री ओढत
सणासुदीचे दिवस लवथवत असतात घराघरात

उत्साहाचे घट ओसंडतात
मनामनातल्या गोपींच्या डोईवरचे
फुला-पानांच्या रांगोळ्या रेखल्या जातात 
रानावनात

संपूर्ण चराचरात आनंदाच्या सतारी झंकारत असताना 
एक वर्ज्य स्वर तारांवरून निखळतो
स्वतःला हरवून टाकावं म्हणून शोधतो
एक सुन्न काळवंडलेलंं मन..
तिथं दिसतो त्याला त्याच्याचसारखा निखळलेला
एक भरोसा
तो त्याचं बोट धरून चालत राहतो
ऋतूंचे नवे पर्व सुरू होण्याच्या
प्रतीक्षेच्या वाटेवरून...!
***
३०.६.२०१८

Friday 22 June 2018

...आहे काही

त्यांना सुद्धा सांगायाचे आहे काही
दुःखाखाली सुखासारखे आहे काही

झाडाने या किती भोगले बहर तरीही
बुंध्यामध्ये हिरमुसलेले आहे काही

बघता बघता कितीक स्वप्ने विरून गेली
तरी मनाला पहावयाचे आहे काही

काल विदेही धुके भेटले आणि उमगले
मुक्ततेतही भोगावेसे आहे काही

नैराश्याने ग्रासुन गेले गुरूच त्यांचे
प्रश्न पडावा असे यामधे आहे काही

ईश्वर म्हणुनी काही नसते म्हणती कोणी
त्या नसण्यातच कुणा वाटते आहे काही..!

आवरले सामान परंतू पाय निघेना
इथे अजूनी थांबावेसे आहे काही
***
आसावरी काकडे
२०.६.२०१८

Saturday 24 March 2018

सुटला न दोर आहे


डोळ्यात भूक याच्या चारा समोर आहे
केव्हाच बांधलेला सुटला न दोर आहे..!

आला सुकाळ म्हणुनी ते नाचले परंतू
सत्यात काहि नाही चित्रात मोर आहे

'भिंती' असून उघडे सारे लुटे कुणीही
त्या फेसबूकचाही प्राणास घोर आहे

बाजार मुक्त त्यांचा काही कुठून घ्यावे
सर्वास सर्व दिसते अदृश्य चोर आहे

टाळ्या हव्यात त्यांना ते बोलती प्रभावी
आपापल्या मठातच प्रत्येक थोर आहे

ओसंडती दुकाने उपभोग खूप झाला
जगणे तरी रिकामे  आयुष्य बोर आहे..!
***
आसावरी काकडे
२३.३.२०१८

Wednesday 21 March 2018

पालवी

वाकल्या खोडास फुटली पालवी
सुंदराचे भान देई पालवी

कोणतेही ऊन येवो कुठुनही
वेदनेतुन जन्म घेई पालवी

मृत्युने नेला पिता ओढून पण
पोकळी मधुनी उगवली पालवी

बीज सात्विक, जमिनही होती सुखी
कोण जाणे का न रमली पालवी

लागली की ओढ जगण्याची पुन्हा
अन जुन्या स्वप्नात आली पालवी..!
***
आसावरी काकडे
२१.३.२०१८

Saturday 17 March 2018

कोणता सल


झाड केव्हाचे इथे हे स्तब्ध आहे
कोणता सल संयमी हृदयात आहे?

खूप काही साठलेले आत याच्या
केवढे संपृक्त नुसते पान आहे

कालच्या मातीत अस्सल स्वत्व होते
आजचे पण पीकही निःसत्व आहे

वाहणारे मॉल, इमले गगनचुंबी
ही सुबत्ता की अघोरी हाव आहे

माणसाने सोडला आहे किनारा
धावणे नावेस आता भाग आहे..!

पूर्ण झाले का चुकांचे शतक आता
कोवळ्या हाती सुदर्शन चक्र आहे..!
***
आसावरी काकडे
१५.३.२०१८

Wednesday 7 February 2018

या रस्त्याने..

किती धावले या रस्त्याने
क्षितिज गाठले या रस्त्याने

वळणावरती वेग रोखुनी
घात टाळले या रस्त्याने

इथून गेले त्या प्रत्येका
वळण दावले या रस्त्याने

डोंगर खणुनी जन्मा येता
अश्रु ढाळले या रस्त्याने

मोडुन पडल्या झाडांचेही
शाप ऐकले या रस्त्याने

रोज धावती चाके त्यांचे
चरे झेलले या रस्त्याने

सारे जीवन उघड्यावरती
पणा लावले या रस्त्याने
***
आसावरी काकडे
७.२.२०१८

आज पाण्याच्या मनी काहूर नाही

फूल होणे का तुला मंजूर नाही?
उमल बाळे काळ इतका क्रूर नाही..!

हे खरे की भोवती आहे प्रदूषण
सत्व मातीचे मुळी कणसूर नाही..

दिसत नाही उगवलेला सूर्य अजुनी
शांत आहे दिवसही मग्रूर नाही..!

खूप लाटा उसळल्या अन शांत झाल्या
आज पाण्याच्या मनी काहूर नाही

कैक दिसती मंदिरे अन गोपुरे पण
जळत कोठे भक्तिचा कापूर नाही

माणसाची हाव तैसे माजता तण
नष्ट होणे पीक काही दूर नाही
***
आसावरी काकडे
३१.१.२०१८

Friday 5 January 2018

उपाधी त्याच्याच

आकाश ‘ते’ नाही
नाही क्षितिजही
रस्ता, घाट.. काही
नाहीच ते

घर-दार नाती
गाड्या नि इमले
वृक्ष फळे फुले
हेही नाही

प्राणी पक्षी मासे
भाषा ग्रंथ ज्ञान
मानवी विज्ञान
तेही नाही

ग्रह तारे वायू
आकाशगंगाही
कृष्णविवरही
नाहीच ते

‘नेती नेती’ पण
आहे ते ते ‘ते’च
उपाधी त्याच्याच
असण्याच्या..!

***

आसावरी काकडे

१ सप्टे. २०१७