Saturday, 29 December 2018

तू निराकार...

तू निराकार
तरी विश्वाकार धारण केलास
तू गुणातीत
तरी त्रिगुणांनी नटलास
तू निर्विकार
तरी उगवत मावळत राहिलास
तू एकमेव
तरी अनंत झालास
तू केवल असणेपण
तरी अस्तित्वरूपांत प्रकटलास
तू सर्वात्मक .. स्वतंत्र.. आनंदस्वरूप
तरी देहांच्या पिंजर्‍यात बद्ध झालास..
दुःखाने घायाळ झालास
तू सत्‍स्वरूप.. उपाधीरहीत.. दिगंबर
तरी विश्वनिर्माणासाठी ब्रह्मा झालास
विश्वपालनासाठी विष्णू झालास
विश्वलयासाठी महेश झालास
आणि भक्तांसाठी
ही त्रयी एकवटून दत्तात्रय झालास..!
***
आसावरी काकडे
२३.१२.२०१८

Tuesday, 9 October 2018

कोणतं क्षितिज खरं?

क्षितिजाकडे बोट दाखवून
मी म्हणेन, ती बघ
असीमालाही सीमा आहे...

रोरावत येणाऱ्या फेसाळत्या लाटांकडे पाहात
ऐलतीरावर बसून सूर्यास्त दाखवत म्हणेन
तो बघ पैलतीर...

तू डोळे विस्फारून पाहत राहाशील
काहीतरी अद्भुत दिसल्याचा आनंद
निथळेल तुझ्या निरागस डोळ्यांमधून..

असीमाची सीमा
अथांगाचा थांग दाखवून
तुझ्या बाल नजरेला आधार देईन मी टेकायला
पण तुझी नजर विस्तारत जाईल हळूहळू
झेपावेल मी दाखवलेल्या क्षितिजावर
तिथून दिसेल तुला
तुझं नवं क्षितिज
तुझा नवा पैलतीर..
डोळे विस्फारून पाहात विचारशील
कोणतं क्षितिज खरं, हे की ते?
कोणता पैलतीर खरा, हा की तो?

समाधानानं डोळे मिटून मी म्हणेन
तुझं तूच समजून घे ना...!
***
आसावरी काकडे
९.१०.२०१८

आनंदाने...

आयुष्याची फांदी झुकली आनंदाने
निथळतेय ती सचैल भिजुनी आनंदाने

सूख देखणे किती भोगले चवीचवीने
हसते आता वेदनेतही आनंदाने

उदास व्हावे असेच वास्तव जरी भोवती
जगती सारे ओठ मिटूनी आनंदाने

कर्मयोग साधतात झाडे राहुन जागी
फळे त्यागुनी नित्य वाढती आनंदाने

कुणास कळला नाही ईश्वर जरा तरीही
रोज भाबडे पूजा करती आनंदाने

इथे तिथे गळतात सारखी पिकली पाने
त्याच मुशीतुन नवी उगवती आनंदाने..!
***
आसावरी काकडे
८.१०.२०१८

Saturday, 6 October 2018

ती चूक झाली...


मौन तेव्हा पाळले ती चूक झाली
आज अश्रू गाळले ती चूक झाली

केवढे केले प्रबोधन जाणत्यांनी
शिष्यही पण हारले ती चूक झाली

अर्जुनाने जिंकले होते स्वयंवर
द्रौपदीला 'वाटले' ती चूक झाली

खूप काही वाचले, अभ्यासले पण
शब्द नुसते साचले ती चूक झाली

भोवती जल्लोष चाले उत्सवांचा
व्यर्थ सारे मानले ती चूक झाली

एकही ना पान आले जवळ त्याच्या
उंच इतके वाढले ती चूक झाली..!

आतही, बाहेरही आहे दिवा पण
मीच डोळे झाकले ती चूक झाली..!
***
आसावरी काकडे

Wednesday, 3 October 2018

या सुखानो या...

या सुखानो या म्हणाले
घर सुने सजवा म्हणाले

रंगवा नभ आठवांचे
पंख पसरा ना म्हणाले

रे किती ओसाड झाले
बरस आयुष्या म्हणाले

गंध उसना दे जरासा
पारिजाताला म्हणाले

बोट रुतली वाळवंटी
तार आम्हाला म्हणाले

आमुचा आहे पिता हा
सर्व बापूंना म्हणाले..!
***
आसावरी काकडे
२.१०.२०१८

Sunday, 9 September 2018

बहर..

झेप कुंपणा पावेतो
होती, असे वाटलेले
त्याचे झाले मृगजळ
मागे धावत राहिले

विस्तारत गेली झेप
किती क्षितिजे गाठली
परतीच्या वाटेलाही
नवी किरणे दिसली

सारे बहर, वाटले
आता सरले भोगून
झरलेल्या फुलांसवे
गंध गेलाय गळून

पण आतली पुण्याई
पुन्हा आली उजळून
माझा वेडा पारिजात
पुन्हा आला बहरून..!
***
आसावरी काकडे
४.९.२०१८

Wednesday, 29 August 2018

तो मदारी..

जीवनाला बंधने दे गुंतण्याला
पण मनाला पंख दे झेपावण्याला

भोवती काही नसू दे दान हिरवे
पण मुळांना खत मिळू दे पोसण्याला

आरसा दावी नको ते आतलेही
चेहऱ्याला मुखवटा दे झाकण्याला

अंत कोणाला कधीही चुकत नाही
वारसांना बळ मिळावे साहण्याला

पावसाला खंड ना, पडतोच आहे
बंध नाही कोणताही बरसण्याला

तो मदारी खेळ करतो माकडांचा
अन इथे पर्याय नाही पाहण्याला..!
***
आसावरी काकडे
२८.८.२०१८