Sunday 5 November 2017

असेहि घडते..

जगून झाले तेच ते पुन्हा जगवत नाही
खोल तळाशी किती साचले संपत नाही

या देहाच्या पिंजऱ्यातला पोपट जो तो
सुटका व्हावी असे कुणाला वाटत नाही

असेहि घडते इथे कुणी सावित्री होतो
एकच संज्ञा प्रत्येकाला चालत नाही

प्रतिबिंबाच्या किरणांना भुलतात माणसे
सूर्यबिंब वरचे कोणाला साहत नाही..!

धून विलक्षण साद घालते एकसारखी
अपुऱ्या श्वासांना माझ्या ती पेलत नाही

किती दूरवर धावायाचे या गाडीला
इंधन संपत आले तरिही थांबत नाही

प्रत्येकाचे जगणे असते कथा अनोखी
आपुलकीने परंतु कोणी वाचत नाही..!
***
आसावरी काकडे
४.११.२०१७