Saturday 24 March 2018

सुटला न दोर आहे


डोळ्यात भूक याच्या चारा समोर आहे
केव्हाच बांधलेला सुटला न दोर आहे..!

आला सुकाळ म्हणुनी ते नाचले परंतू
सत्यात काहि नाही चित्रात मोर आहे

'भिंती' असून उघडे सारे लुटे कुणीही
त्या फेसबूकचाही प्राणास घोर आहे

बाजार मुक्त त्यांचा काही कुठून घ्यावे
सर्वास सर्व दिसते अदृश्य चोर आहे

टाळ्या हव्यात त्यांना ते बोलती प्रभावी
आपापल्या मठातच प्रत्येक थोर आहे

ओसंडती दुकाने उपभोग खूप झाला
जगणे तरी रिकामे  आयुष्य बोर आहे..!
***
आसावरी काकडे
२३.३.२०१८

Wednesday 21 March 2018

पालवी

वाकल्या खोडास फुटली पालवी
सुंदराचे भान देई पालवी

कोणतेही ऊन येवो कुठुनही
वेदनेतुन जन्म घेई पालवी

मृत्युने नेला पिता ओढून पण
पोकळी मधुनी उगवली पालवी

बीज सात्विक, जमिनही होती सुखी
कोण जाणे का न रमली पालवी

लागली की ओढ जगण्याची पुन्हा
अन जुन्या स्वप्नात आली पालवी..!
***
आसावरी काकडे
२१.३.२०१८

Saturday 17 March 2018

कोणता सल


झाड केव्हाचे इथे हे स्तब्ध आहे
कोणता सल संयमी हृदयात आहे?

खूप काही साठलेले आत याच्या
केवढे संपृक्त नुसते पान आहे

कालच्या मातीत अस्सल स्वत्व होते
आजचे पण पीकही निःसत्व आहे

वाहणारे मॉल, इमले गगनचुंबी
ही सुबत्ता की अघोरी हाव आहे

माणसाने सोडला आहे किनारा
धावणे नावेस आता भाग आहे..!

पूर्ण झाले का चुकांचे शतक आता
कोवळ्या हाती सुदर्शन चक्र आहे..!
***
आसावरी काकडे
१५.३.२०१८