Thursday 11 February 2021

तुम्हाला माहिती असो नसो...

 

तुम्हाला माहिती असो नसो

तुमची इच्छा असो नसो

तुमच्याकडे कौशल्य असो नसो..

 

तुम्ही एका महाशिल्पाच्या निर्मिती-प्रक्रियेत

समाविष्ट केले गेलेले असता

 

तुम्ही शिल्पाच्या दगडातला एक कण असाल

किंवा छिन्नीचा अंश असाल

किंवा घडवणार्‍या हातातल्या

सर्जनकळांचे साक्षी

 

शिल्पाच्या निर्मिती-प्रक्रियेत

काढून टाकलेल्या दगडाच्या चुर्‍यात असाल तुम्ही

किंवा शिल्पाच्या डोळ्यातले भाव

दाखवणार्‍या कणात विराजमान असाल

 

कुठेही असलात तरी तुम्ही

त्या महाप्रक्रियेचा एक अविभाज्य भाग असता

स्वतःची गती नसलेल्या रेल्वेतील प्रवाशासारखे

प्रक्रियेच्या गतीबरोबर निमुट धावत असता

 

उत्पत्ती-स्थिती-लयाच्या आवर्तनातून

अखंड फिरत असते शिल्प

आणि 

तुम्हाला माहिती असो नसो

तुमची इच्छा असो नसो

तुमच्याकडे कौशल्य असो नसो

त्याच्या निर्मिती-प्रक्रियेतली

वाट्याला आलेली भूमिका

आजन्म निभावत असता तुम्ही...!


***

आसावरी काकडे

१२ २ २०२१