Tuesday 31 May 2016

अल्प शांती मिळावी..!

श्री समर्थांची माफी मागून

अनुदिनी अनुतापे
तापलो रामराया
सतत धरति हाती
त्रासलो रे विधात्या

घडि घडि विघडे हा
निश्चयो अंतरीचा
उठसुट उठवीती
शब्द, ओठी न वाचा

मननरहित रामा
सर्वही काळ गेला
भसभस उपसा रे
चालला, अल्प त्याचा

भरभर वर जाई
स्क्रीन जागी न थांबे
मुरत मुळि न काही
सर्व लोपून जाते

तन मन धन सारे
ओतती ते सुखाने
मजविण पण वाटे
सर्व संसार ओझे

कितितरि सुविचारा
रोज ते पाठवीती
सकळ स्वजन माया
लोटुनी दूर जाती

जळत हृदय माझे
भाजती कान त्यांचे
विज-बिल किति येई
भान नाही कशाचे

बघुन सकल सेल्फी
खंत वाटे कुणाला?
तळमळ निववी रे
घोर लागे जिवाला

तुजविण दुखणे हे
कोण जाणेल माझे
शिणत शिणत आहे
वेड जाईल का हे?

रघुपति मति माझी
आपुलीशी करावी
विकल जन तयांना
अल्प शांती मिळावी..!

***

आसावरी काकडे

३१ मे २०१६

Monday 30 May 2016

निमिषाच्या अंतरावर दिसतो


ब्रह्मांडाच्या
अतिप्रचंड आणि अतिसूक्ष्म स्वरूपाच्या
केवळ शब्द-दर्शनानंही
समूळ हदरतं मन
‘स्व’ चा परीघ
सैरभैर होतो
त्वचेवर शहारा उमटतो खोल प्राणांमधून
पायांखालची जमीन सरकते
‘घटाकाश’
घटाकारातून ओसंडू पाहते....
निमिषाच्या अंतरावर दिसतो
अद्वैताचा परीसस्पर्श...

पण
पण ‘दर्शन’ दृष्टिआड होताच
महाभरतीच्या या सगळ्या लाटा
माघारी वळतात
आणि मन
पूर्ववत गटांगळ्या खाऊ लागतं
स्व-भानाच्या खोल समुद्रात..!

***

आसावरी काकडे

३० मे २०१६

Sunday 29 May 2016

तिथेच नाही फक्त


तिथेच नाही फक्त
इथे, आतही होत असतात
पौर्णिमा-आमावस्यांची
आवर्तनं सतत....

तिथे ठराविक गतीने
ठरलेल्या वेळेवर
चंद्रकला उलगडतात
मिटत जातात
चुकत नाही कधीच
पौर्णिमा–आमावस्यांचा क्रम

पण इथे
केव्हाही हसतो पूर्ण चंद्र खुदकन
सागराला भरती येते आतल्या आत
आणि फक्‍कन विझून जातो अचानक
माघारी वळतात
आवेग ओसरलेल्या लाटा...

इथल्या चंद्राला नसतात कला
नसतात ठरलेल्या दिशा
उगवण्या-मावळण्याच्या
प्रतिपदा... द्वितीया... हा तिथला क्रमही
कळत नाही आतल्या भावपेशींना
आतल्या पौर्णिमांची मोजदाद
ठेवता येत नाही कुणाला

तिथल्या पौर्णिमांच्या हिशोबानंच
साजरा करतात लोक
सहस्रचंद्रदर्शन सोहळा थाटामाटात...
आतल्या आमावस्यांचा अंधार
निमुट सोसलेला असतो
ज्याचा त्यानं
हे माहित असतं फक्त
माघारी परतलेल्या लाटांनाच..!
***
आसावरी काकडे

२८ मे २०१६
कविता रती दि अंक)

Tuesday 24 May 2016

शब्दांचा आरसा


शब्दांचा आरसा अद्भुत असा की
पार्‍याची झिलई दोन्हीकडे..!

संकेत-वारसा पाठी सांभाळून
संस्कारांची खूण ठेवी पुढे

दाखवतो बिंबे कधी विस्तारून
कधी उसवून खोलातली..!

लिहिताना होई स्वरूप-दर्शन
लाभे आत्मभान लिहित्याला

आस्वादकालाही अक्षरांमधून
स्वरूपाची धून गवसते

बाह्य रंग रूप दावतोच पण
आतलीही वीण उलगडे..!

स्वरूप-दर्शन घडे डोळसाला
तसेच अंधाला उणे नाही

प्रत्येकाजवळ शब्दांचा आरसा
‘पाहण्याचा’ वसा सोपा नाही..!

***

आसावरी काकडे

२४ मे २०१६

Friday 20 May 2016

तरीही..


दर क्षणाला पडत राहतात
नवनवीन पोस्टस
आणि जुन्या दिसेनाशा होतात
मोबाइल स्क्रीनवरून
वर वर सरकत
जाऊन बसतात ‘ओल्डर’ घरात

क्वचित कधी
टक टक होते दारावर
आणलं जातं कौतुकानं त्यांना
उजेडाच्या स्क्रीनवर..
पण काम होताच लगेच मिटतं दार
त्या पुन्हा पडून राहतात अंधारात
अधांतरी.. तळ्यात-मळ्यात
काही काळ

आणि ‘क्लिअर चॅट’वर टच होताच
अनंतात विलीन होऊन जातात
पुन्हा कधीही न दिसण्यासाठी..!

चिमुटभर राखही उरत नाही मागे
हजारो लाइक्स...
शेकडो कॉमेंटस मिळालेल्या
कोणत्याही पोस्टची..
संपूर्ण ब्रह्मांडाचे सचित्र दर्शन
तिने घडवलेले असले
तरीही..!

***
आसावरी काकडे
१९ मे २०१६

Thursday 19 May 2016

प्रत्येक जिवाचे एक ऋतुचक्र


सर्प सांभाळती विष उदरात
दाह सोसतात अंतरंगी

पोळणे पिकता त्वचा निखळते
कात टाकुनी ते होती नवे

पुन्हा नवा दाह नवी सळसळ
जगण्याची कळ पुन्हा नवी

प्रत्येक जिवाचे एक ऋतुचक्र
त्वचेखाली सत्र चालू राही

सारे नियोजन असे जन्मजात
मृत्यू टाके कात आयुष्याची..!

***

आसावरी काकडे
१८ मे २०१६

Monday 16 May 2016

‘माझा’ शब्द हवा


एक दुःख ताजे एक मुरलेले
एक हरलेले सारे डाव

एक लोकमान्य एक कोंडलेले
एक सांडलेले रस्त्यावर

एक पोरकेसे नाव नसलेले
एक फसलेले नावामध्ये

एक शरीराचे एक काळजाचे
एक समाजाचे विश्वव्यापी

परोपरीने हे दुःख विलसते
कोणाचे कोणते जाणे जो तो..!

पण सांगायला ‘माझा’ शब्द हवा
कसा हाती यावा गाभ्यातून..?
***

आसावरी काकडे
१६ मे २०१६

Tuesday 10 May 2016

अक्षर माहेर


आकाशाचे तत्त्व ध्वनी माझा पिता
आशय नेणता बोलवितो

शब्द माझे बंधू अक्षरे भगिनी
भाषा ही जननी असे माझी..!

बोबड्या बोलांनी पाऊल टाकले
गूज मनातले सांगू पाहे

सांगता सांगता गूज विस्तारले
भारावू लागले अंतरंग..!

शब्दांमध्ये लय अक्षरांना छंद
आशयाला गंध अळुमाळू

लाभले प्रशस्त कविता आवार
अक्षर माहेर गवसले..!

***

आसावरी काकडे
११ मे २०१६

Monday 9 May 2016

गर्द मळभ आपण


कोणता हा पक्षी कुठे
साद घालतो कोणाला?
गर्द मळभ भोवती
त्यात अदृश्य की झाला

किती गळालीत पिसे
कोणी झटापट केली
त्याच्या असण्याच्या खुणा
कशा विखुरल्या खाली

साद कोणासाठी आहे
आणि संघर्ष कोणाशी?
अस्तित्वाच्या विवरात
कोण आहे त्याच्यापाशी?

सारे मनाचेच खेळ
साद, संघर्ष आपण
आपल्याला झाकणारे
गर्द मळभ आपण

सार्‍या गोतावळ्यामध्ये
कधी होतो निराधार
अशावेळी स्वतःसाठी
व्हावे आपण माहेर..!
***

आसावरी काकडे
९ मे २०१६ 

Saturday 7 May 2016

ऐल-पैल सर्वत्र तोच तर आहे


मायेनं कुरवाळत
बंद पापण्यांभोवती
काठोकाठ भरलेला होता तो
गर्भाशयात

एका परिपक्व आर्त क्षणी
असह्य टाहो फुटला
पाकळ्या अलग व्हाव्यात
तशा उघडल्या पापण्या
पण तो दिसला नाही
आजुबाजूला
कुरवाळणारे सगुण हात
जाणवले सर्वांगाला..

उजेडानं
वर्षांमागून वर्षे ओलांडली..
रात्री पापण्या मिटल्यावर
निद्राधीन होण्यापूर्वी
कधी कधी जाणवायचं त्याचं
भोवती घुटमळत असणं
पण कधीच दिसला नाही
ओळखू यावासा

नंतरच्या सुजाण वर्षांमधे
एकदा उजेडानंच सांगितलं कानात
की मायेनं कुरवाळणारा तो तिमिर
भेटत राहील पुन्हा पुन्हा...
ऐल-पैल सर्वत्र तोच तर आहे
मी आहे केवळ मधला नावाडी
इकडून तिकडे नेणारा..!
***
आसावरी काकडे

७ मे २०१६

Friday 6 May 2016

चुकल्या मुशाफिराला..


चुकल्या मुशाफिराला
विचारू नये त्याचं गाव
दिशा दाखवावी
नव्या स्वप्नांकडे नेणारी

शब्दांमधून खणून काढू नयेत
त्यांचे अर्थ
आपले पेरावेत
बेंबीच्या देठातून उगवतील असे

शोधू नयेत कारणं
अस्फुट स्मितांमागची
निमित्त पुरवावीत
खळखळून हसण्याला..

तहानलेल्याची भागवू नये तहान
लगेच पाणी देऊन
थोडी राहू द्यावी कंठात
त्याला त्याची विहीर मिळेपर्यंत

सरत्या आयुष्यावर
लादू नयेत ओझी जीवनेच्छांची
निर्मम होऊन म्हणावे
शुभास्ते पंथानः सन्तु..!
***

आसावरी काकडे
६ मे २०१६

Wednesday 4 May 2016

एका दृश्य...


हात जोडून डोळे मिटून
तो उभा आहे
एका मंदिरासमोर
मूर्ती गाभारा उंबरठा
मंडप दरवाजा पटांगण
आणि बंद असलेलं गेट
सगळ्याच्या बाहेर... रस्त्यावर

वाटलं, जाता जाता
रोमरोमात भिनलेल्या सवयीनं
जोडले असतील त्यानं हात
किंवा असेल मनात
न सुटणार्‍या प्रश्नांचा गुंता
असेल प्रार्थना स्वतःसाठी
किंवा मोठाही असेल आवाका
त्याच्या आर्ततेचा..

पण डोळे मिटून
शांत उभा आहे तो तिथं
एकटाच
मनात असेल कुटुंबकबिला
स्नेह्यांचा जथा
किंवा
आला असेल ओलांडून सगळं
असेल एकटाच मनातही
पायांनी थाबवलं म्हणून असेल उभा
किंवा त्याच्या रिकाम्या मनात
नसेल पुढे जाणारा रस्ता
दिशादर्शक पाटी.
गोंधळून असेल उभा

किंवा.. किंवा
गाभार्‍यातल्या मूर्तीनंच
घातली असेल त्याला आर्त साद
सोबतीसाठी
तिनंच थांबवलं असेल त्याला..!

तो ऐकत असेल तिचीच प्रार्थना
कदाचित्..!

***

आसावरी काकडे
४ मे २०१६