Sunday 22 September 2019

...नकोसा वाटतो


कोणताही बंध आता मज नकोसा वाटतो
सांजवेळी रडवणारा स्वर नकोसा वाटतो

अडकलेल्या पाखराला मोकळे सोडून द्या
पंख मिटल्या सानुल्याचा छळ नकोसा वाटतो

अक्षरांना जोडणारा शब्द तू देशीलही
स्पर्श त्याचा भावनांना पण नकोसा वाटतो

वेचले तारुण्य सारे माधवीने त्या युगी
अस्मितेला आजच्या तो वर नकोसा वाटतो

बरसतो तो एवढा की ध्वस्तता ओशाळते
गंधही ओला मृगाचा मग नकोसा वाटतो..!

आत्मरंगी रंगले मन भोवताली स्तब्धता
स्वस्थतेला डहुळणारा रव नकोसा वाटतो
***
आसावरी काकडे
२२.९.२०१९

Wednesday 1 May 2019

म्हणूनच..


कागद सहनशील असतात
आणि लेखणी आज्ञाधारक..
म्हणूनच
क्षणोक्षणी मनात धिंगाणा घालणारे
भावनांचे थैमान
विचारांचे काहूर
प्रश्नांचा गुंता
आणि कारण सापडत नसलेली
अस्वस्थता..
यांचे ओझे उतरवत राहते मी कागदावर
शब्दात साकारत जाते हे सारे
तसतशी मला मी सापडत राहाते..!

शब्दांना तर वरदानच असते
अखंड कौमार्याचे
कुणीही कितीही वापरले तरी
राहतात ते कोरे.. ताजे टवटवीत

म्हणूनच
अनाकलनीयतेच्या वादळात हरवायला होतं
कासावीस होतो जीव
त्या प्रत्येक वेळी मी साद घालते त्यांना
आणि ते धावून येतात होकायंत्र बनून..!
***
आसावरी काकडे
३०.४.२०१९

Tuesday 2 April 2019

अज्ञाताच्या हाका

आले आले विमान पण ते
गेले दिसण्यापूर्वी
प्रकाशरेखा टिपुन घेतली
नभात विरण्यापूर्वी..!

स्पर्श कुणाचा झाला नकळे
फुलले अंगोपांगी
आणि माळला मीच आपला
गजरा सुकण्यापूर्वी

कवितेला येतात कोठुनी
अज्ञाताच्या हाका
निःशब्दाच्या गुहेत शिरती
काही कळण्यापूर्वी

ज्योत दिव्याची तेवत असते
तोवर मंत्र म्हणावे
प्राशुन घ्यावे तेज त्यांतले
आशय विझण्यापूर्वी

गाढ तमाच्या गर्द रात्रिला
स्वप्ने सोबत करती
गूज तयांचे जाणुन घ्यावे
नेत्र उघडण्यापूर्वी

अढी घातली आहे नुकती
फळांस झाली घाई
जणू शब्द, जे मौन सोडती
काही सुचण्यापूर्वी

***
आसावरी काकडे
2.4.2019

Sunday 3 March 2019

गळून पडल्यावरती


किती देखणा बंध मिळाला
गळून पडल्यावरती
हवाहवासा सुखांत दिसला
गळून पडल्यावरती

बीज सानुले होते तेव्हा
निजले जमिनीखाली
परत जायचे तिथेच त्याला
गळून पडल्यावरती

जलाशयाच्या स्तब्धतेतही
तरंग उठले होते
नेत्रकडांना थांग लागला
गळून पडल्यावरती

बहराचीही तमा न केली
वसंत होता तेव्हा
फुलण्यामधला कैफ उमगला
गळून पडल्यावरती

सूर्य येइतो करीन सोबत
चंद्र म्हणाला होता
स्मरले एकाकी शिशिराला
गळून पडल्यावरती

ग्रहण ग्रासते बिंबाला पण
तेज अबाधित असते
देह न झाके चैतन्याला
गळून पडल्यावरती
***
आसावरी काकडे
२२.१.२०१९