Saturday 26 November 2016

पळभर पण..

पळभर पण काही नित्य राहात नाही
सतत बदल होणे हेच की नित्य राही

सकलजन परंतू वागती का असे की
अमरपद मळाले त्यांस येथे जसे की

पळभर पण त्यांच्या धीर नाही जिवाला
सतत अधिर होती गाठण्या धावत्याला

मनन भजन सारे व्यर्थ वाटे तयांना
मिरवत जनलोकी साद देती सुखांना

भरभर क्षण जाई काळ थोडा न थांबे
सुख सुख करताना मागणी नित्य लांबे

पळभरच जरासे नेत्र घ्यावे मिटूनी
सुख मृगजळ आहे हेच येईल ध्यानी..
***
आसावरी काकडे
२६.११.१६

निमंत्रण

स्थल-कालाच्या
कोण्या एका अनाम संधीवर
अनाहूतपणे मिळालं
आयुष्याचं निमंत्रण..!

न मागताच मिळाला
हा देह राहायला
रंग-रूपही नव्हतं सांगितलं
की असं हवं तसं नको..

अगणित पेशींच्या संयोगातून
मिळाले गूण.. अवगूण
आरोग्य अनारोग्य..

जन्मदात्यांनी दिलं नाव
अनाहुताला 'मी'पण आलं
त्यांचं संचित अपसुक 'मी'चं झालं..
'मी'नं कमावलेलं
अहं जोपासू लागलं

माझं नसलेलं
न मागता मिळालेलंही
माझं माझं झालं..
प्रत्येक उच्छवासावर
लफ्फेदार सही करू लागलं..!!
***
आसावरी काकडे
२५.११.१६

Thursday 24 November 2016

तोच तारतो

रात्र संपली, समोर फाकली उषा
रेंगते तरी अजून अंतरी निशा

कोण या मनास रोज काय पाजते
झिंगुनी स्वतःसवेच नाचनाचते

रिक्ततेत ओतते नवीन वेदना
पोकळी भरावयास शोधते खुणा

हाच शाप मानवास नित्य भोवतो
व्यासस्पर्श, त्यास मात्र तोच तारतो..!
***
आसावरी काकडे
२४.११.१६

ठसा

कधीपासून आठवत नाही
रोज स्वप्न पाहाते आहे
पायातळी वाळू तरी
ठसा सोडून जायचे आहे

स्वप्नात एकदा आला कोणी
नभात तारा झालेला
हवा होता शब्द त्याला
रक्तामधे भिजलेला

स्वप्नामधेच कळले त्याला
स्वप्न माझ्या डोळ्यातले
अलगद पापण्या उघडून त्याने
अंजन घातले मातीतले

कळले आतून आली जाग
स्वप्न आले भानावर
दमदार असेल पाऊल तरच
ठसा उमटेल वाळूवर..!
***
आसावरी काकडे
२२.११.१६

*वनवास जन्मता..*

आदर्श असा तो राजा सर्वांसाठी
पण कुणी बोलले काही त्याच्या पाठी

आरोप ऐकुनी त्यजिली त्याने भार्या
ती दोन जिवांची, सुशील होती आर्या

फसवून धाडले वनात तिज राजाने
सोबतीस होतो आम्ही गर्भरुपाने

तो राजा देवच पिता आमुचा होता
परित्यक्ता झाली परंतु देवी माता

वनवास भोगला त्यांनी पित्राज्ञेने
वनवास जन्मता अम्हा काय न्यायाने?
***
आसावरी काकडे

भीती

भीती निष्क्रियतेची निर्मिती
भीती सोयरी सांगाती
भीती-भाव सावध करिती
प्रसंगोचित ।।

भीती अस्थिर करते
भीती बळ हिरावते
भीती स्वप्न दाखवते
अभासांचे ।।

भीतीस आपले म्हणावे
तिला तिचे घर द्यावे
आपण निवांत राहावे
आपल्या घरी ।।
***
आसावरी काकडे
२३.१०.१६