Sunday 25 April 2021

गे कविता म्हणजे..


गे कविता म्हणजे केवळ
कोलाज एक शब्दांचे
अप्राप्य क्षितीजावरल्या
संदिग्ध सांज रंगांचे

एकेक शब्द त्यामधला
'क्ष' बीजगणितामधला
वांछीत उत्तरासाठी
कुठलीही संख्या घाला

हे कुठले कुठले संचित
उतरले रिक्त शब्दांत
गोठले प्रवाही होउन
अर्थाच्या चिर मौनात

हे गोंदण असेच असते
कवितेच्या भाळावरले
डोळ्यांना दिसती केवळ
आकार खोल रुतलेले..!
*
आसावरी काकडे 
१६.४.२०२१

प्रतिसाद...


जन्मोजन्मी महाभूते
भेटती जिवाला
देहादारी धाव घेई
वारा निवाऱ्याला

खडकाच्या डोळा कधी
येत नाही पाणी
आपलेच निळे आर्त
दिसते पाषाणी

जन्मक्षणी होतो सुरू
सृजन-प्रवास
उमलणे हा कळ्यांचा
सुगंधी कळस

पैलतीरी गेली सांज
दिस मालवून
खुणेसाठी धूळ थोडी
गात्रांत ठेवून..!

संभ्रमांचे फूल सदा
खांद्यावर डोले
मनातल्या पाखराशी
बावरून बोले

आयुष्याच्या वाटेवर
संचिताचे झाड
पोपटांनी पिंजऱ्याचे
लावले कवाड

संभोगाचा खेळ चाले
आंधळ्या तळ्यात
सृजनाचा रुद्ध टाहो
गोठतो गळ्यात

काळोखाच्या उगमाशी
उन्मळती वेणा
जन्मगंध शोधायला
धावतोय मेणा

अवसेचे भय दाटे
सोबतीला काळा
उगमाला धीर देई
जन्माचा सोहळा..!
**
आसावरी काकडे
१९.४.२०२१

ती तू आहेस..!



बाहेर पाऊस कोसळतोय
गडगडतंय... वारंही सुटलंय
विजा चमकतायत...

आणि आत
मी बसलेय हे सगळं बघत
धडधडतंय... अस्वस्थ झालंय मन..

आणि हा आत-बाहेरचा खेळ
बघतीय आणखी कुणीतरी...

तिनं म्हटलं, तू ती नाहीस
धडधडत आत बसलेली...
बाहेर कोसळतेय
गडगडतेय
चमकतेय
ती तू आहेस..!
***
१२.४.२०२१

तो जिवांचा सोयरा..



कोणतीही खूण नाही
तर्कही ना चालतो
पण कुणाला वाटते तो
नित्य सोबत चालतो

तो दयाळू सर्वसाक्षी
तीर्थक्षेत्रे त्रिभुवनी
चालणे यात्राच होते
चालवीता तो धनी

विश्व-पालक तो अनादी
तो जिवांचा सोयरा
खोल तृष्णा मानवाची
अमृताचा तो झरा

व्यापकाला, सानुल्याशा
बांधती नामामध्ये
आळवीता अन पुन्हा, तो
फाकतो प्राणामध्ये..!

***

आसावरी काकडे

२५.३.२०२१