Wednesday 31 August 2016

झुला झुलतो मनात

एक अनामिक धून
गुणगुणते कानात
तिच्या स्पंदनांचा नित्य
झुला झुलतो मनात

स्वरांसवे अनाहूत
काय निनादत येते
ओठमिटल्या प्रश्नांशी
असेल का त्याचे नाते?

जन्मसावलीसारखी
सोबतीला आहे धून
स्वराशय कसा शोधू
अमूर्ताच्या मुशीतून

केव्हापासून उत्सुक
सूर अस्पर्श तळाशी
वर आशय कोरडा
खेळ खेळतो शब्दांशी..!
***
आसावरी काकडे
३०.८.२०१६

घेऊ पाहे ठाव

धरेवर माणसाचे
असे इवलेसे गाव
निराकार आकाशाचा
तरी घेऊ पाहे ठाव

पोकळीचे करी भाग
आणि नावे देई त्यांना
जगण्यात जागा देई
राशी तारे नक्षत्रांना

दूर अगम्य ब्रह्मांड
त्याशी जोडू पाही नाते
तम तेज गती सारे
त्याला आत जाणवते

येते भाळावर कोर
कृष्णविवर मनात
दिक्कालास भेदून, ये
तेजोनिधी अंगणात

अणूरेणूत मानवी
भूमी आकाश नांदते
जाणिवेच्या ऐलपैल
शून्य-अनंत वसते..!
***
आसावरी काकडे
२९.८.२०१६

Sunday 28 August 2016

कोणत्याही क्षणी

थेंब थेंब थेंब
गळतेय पाणी
संपणार धार
कोणत्याही क्षणी

कोणत्याही क्षणी
दाटतील मेघ
आणि विस्तारेल
काळोखाची रेघ

काळोखाची रेघ
लोपेल जराशी
वीजेचा कल्लोळ
घुमेल आकाशी

घुमेल आकाशी
नाद सावळासा
दाखवेल मोर
दिमाख निळासा

दिमाख निळासा
नाच नाचणार
वाजत गाजत
पाऊस येणार

पाऊस येणार
भरणार पाणी
झरणार धार
कोणत्याही क्षणी..!
***

आसावरी काकडे
२७.८.२०१६

Saturday 27 August 2016

काही क्षणांचे माहेर

रोज भेटायचो सखी
बागेतल्या बाकावर
सांगायचो वाचलेले
हर्ष खेद अनावर

रोज कातर वेळेला
बोलायचो निरोपाचे
पण मनातून असे
उद्या पुन्हा भेटायचे

एकमेकींसाठी होते
काही क्षणांचे माहेर
दु:खानेही हसणारा
तिथे नाचायचा मोर

चाल मंदावली होती
तरी गेलीस तू पुढे
तुझ्याविना सुना बाक
सुनी तुझी प्रिय झाडे

सखी फिरताना रोज
येते तुझी आठवण
हसायचे ठरलेय
तरी गलबले मन..!
***
आसावरी काकडे
२६.८.२०१६

Thursday 25 August 2016

अद्वैत एकदा

अद्वैत एकदा
विनटले द्विधा
एक झाले राधा
दुजे कृष्ण..!

एकमेकातून
विस्तारले द्वैत
विविधा अनंत
रूपे ल्याली

पाच इंद्रियांचे
विषय ती झाली
त्रिगुणी रमली
मीलनात

परंतू राधेला
खेळ उमगेना
विरह सोसेना
पार्थिवाला

कृष्णमय जरी
सारे चराचर
राधेला विसर
अद्वैताचा

जनमानसाला
कळे हीच राधा
आणि कृष्ण साधा
देहधारी..!
***
आसावरी काकडे
२५.८.२०१६

मन मथुरा

मन मथुरा
तन कारागृह
मिट्ट अंधार
साखळदंड
सगळे दरवाजे
कुलूपबंद

पाहारेकरी
जागोजाग
वेदनांचा चक्रव्युह
नसानसात अनिश्चिती
पावसाचा थरार
विजांची दहशत...

दिवस भरले का?
वेणा शीगेला पोचल्या का?
या वेळी तरी
होणार का सुटका?
तुटणार का साखळदंड?
फिटणार का अंधार?
मन मथुरा
तन कारागृह
करणार का यमूनापार..?
***
आसावरी काकडे
२४.८२०१६

असे वेडे तण

अपसुक उगवते
नको खत पाणी
नको प्रशस्त वावर
नको निगराणी

उगवते फटीतून
दऱ्याखोऱ्यातून
पायातळी अंथरते
जगण्याची धून

त्यांचे हिरवे लाघव
नेत्रसूख देते
जीवसृष्टीचे निश्वास
पदरात घेतेे

त्यांनी घेतलाय वसा
नित्य फुलण्याचा
किती छाटले तरीही
खोल रुजण्याचा

जन्म घेई पुन्हा पुन्हा
असे वेडे तण
जणू होते अनावर
भुईलाही मन..!
***
आसावरी काकडे
२३.८.१६

Monday 22 August 2016

क्षणचित्रे-

उभी केळ दारात भारावलेली
वरी सावली गर्द पानांमधूनी
मुळांना मिठी गच्च ती मृत्तिकेची
हवा भोवताली अडोसा धरूनी
***

तुरे कोवळे डोलुनी गीत गाती
फुले गोजिरा गंध श्वासास देती
ढगांनी नभाला कळू ना दिले ते
निळे गूज कानात सांगेल माती
***

किती सूख दाटून आलेय गात्री
तरी धून का ही मनी भैरवीची
झरे सावळी आस मेघांमधूनी
पिसे का गळाली तरी पाखरांची
***

आसावरी काकडे
१८.८.१६

Sunday 21 August 2016

पण तरंग नाहीत

प्रश्न निवलेत सारे
गुंता उरलेला नाही
कोलाहल मंदावला
डोळ्यांमधे अश्रू नाही

अथांगच जलाशय
पण तरंग नाहीत
खडे पडले तरीही
थेट पोचती तळात

याचसाठी होता खरा
सारा अट्टहास केला
मख्ख स्वस्थतेत पण
जीव रमेनासा झाला

संघर्षांच्या पैलतीरी
पोचण्याची किती घाई
म्हणताही येत नाही
रितेपणाला विठाई..!
***
आसावरी काकडे
२०.८.२०१६

Friday 19 August 2016

रक्षाबंधन

हात उंचावून झाडे
रोज करीती प्रार्थना
पाय रोवून मातीत
धीर देतात मुळांना

आर्त प्रार्थना ऐकून
सूर्य प्रतिसाद देतो
सोनकिरणांची राखी
रोज झाडांना बांधतो

सण असेल नसेल
रक्षाबंधन होतेच
नित्य आधाराची हमी
चराचरा मिळतेच

एका एका झाडातून
जणू बहीण बाहते
भावाकडे रक्षणाचे
दान मागत असते

धाव घ्यावी तिच्याकडे
हाक ऐकून भावांनी
सगळ्याच मुलीबाळी
कुणाकुणाच्या बहिणी..!
***
आसावरी काकडे
१९.८.२०१६

Wednesday 17 August 2016

एक दिवस

माझ्या भोवती
हात पाय नाक डोळे त्वचा...
आणि त्यांचे रंगीबेरंगी विभ्रम
यांचं एक रिंगण

आई भाऊ पती शेजार स्नेही
आणि त्यांच्यातले अतोनात गुंतलेपण
यांचं एक रिंगण

अन्न वस्त्र निवारा भाषा कला
आणि त्यासाठी चाललेला रियाज आत-बाहेरचा
यांचं एक रिंगण

समाज देश विदेश पृथ्वी विश्व
आणि त्यांच्याशी अव्याहत होणारी देवघेव
यांचं एक रिंगण...

'खुर्ची का मिर्ची जाशील कैसी..'
म्हणत
मी शोधलेली प्रत्येक फट
बुजवत
प्रत्येक रिंगण
मला आत आत ढकलतं राहातं...

पण यांचा पराभव अटळ आहे..!
यांच्या डोळ्यासमोर
यांना ओलांडून
बाहेर पडेन मी एक दिवस
कुणाला कळणारही नाही..!
***
आसावरी काकडे
१७.८.१६

Tuesday 16 August 2016

वर्तुळे निराळी प्रत्येकाची

जन्मासवे जन्मे  नात्यांचे वर्तूळ
अनेकधा खेळ  सुरु होई

कित्येक नावांनी  वेटाळतो जीव
रोज नवा डाव  भूमिकांचा

आत पेशीचक्र  फिरत राहाते
बाहेर फिरते  ऋतूचक्र

एक दुष्टचक्र  ज्याच्या त्याच्या भाळी
वर्तुळे निराळी  प्रत्येकाची

आपापल्या त्रिज्या  घेऊन नांदती
नाव वल्हविती  परीघात..!
***
आसावरी काकडे
१६.८.१६

झोका

मुली असोत नसोत
झोका झुलत असतो
मुली धावत येण्याची
वाट बघत बसतो

मुली पाहतात झोका
रोज शाळेत जाताना
त्यांना आठवतो झोका
वर्गामध्ये शिकताना

सुट्टी मिळताच साऱ्या
धाव घेती झोक्याकडे
ओझे दप्तराचे देती
शेजारच्या खांबाकडे

मनसोक्त खेळ होता
भाग पडतेच जाणे
मुली गेल्या तरी झोका
त्यांचे जपतो झुलणे..!
***
आसावरी काकडे
१३.८.२०१६

शोधण्याचा खेळ

किती ऋचा मंत्रातून
समजावले ऋषींनी
पण निर्गुणाचा वसा
नाही घेतला लोकांनी

आर्त भक्तांचा आकांत
आला फळाला अखेरी
निराकार 'असणे'च
साकारले विटेवरी..!

त्याला ठाऊक सगळे
तरी शोधण्याचा खेळ
धावूनिया आईलाच
जसे खेळविते बाळ

निरागस नजरेने
पाहतोय घटाकडे
जणू बाहेर येऊन
आत्मा पाही तनुकडे

***
आसावरी  काकडे
१२.८.२०१६

Thursday 11 August 2016

ओली आस

मेघ पांढरे कोरडे
पाणी शोधत फिरती
जलाशय आटताना
ओली आस जागविती

तप्त उन्हाची काहिली
मुरवून अंतरंगी
निळा दिलासा देतात
स्वतः असून निरंगी

मग तुडुंब भरते
आर्द्रतेने अवकाश
तेव्हा शोषून घेतात
त्याचा भार सावकाश

गच्च भरलेपणाने
मेघ होतात ते काळे
शुभ्र वर्षावात दिसे
रूप कृष्णाचे सावळे..!
***
आसावरी काकडे
११.८.२०१६

Tuesday 9 August 2016

निरंग

दोन प्राणात असते
फक्त त्वचेचे अंतर
बाहेरचा प्राणवायू
प्राण आत आल्यावर

असे सर्वांचा बाहेर
कोट्यवधी शोषतात
आत नेऊन त्यालाही
नाव आपले देतात

करू पाहतात बंद
देहघरात आपल्या
करतात रोषणाई
आत लावून दिवल्या

तोही नांदतो सुखाने
लकाकतो डोळ्यांतून
तेज जिवंतपणाचे
निथळते रंध्रांतून

ये-जा चालूच अखंड
नित्य खेळतो स्पर्शात
रक्तामध्ये मिसळून
भिरभिरतो गात्रांत

आत-बाहेर सर्वत्र
कणाकणात व्यापला
रंग प्राणाचा तरीही
नाही कुणाला कळाला..!
***
आसावरी काकडे
९.८.२०१६

Monday 8 August 2016

कळेना मलाही..

कळेना मलाही कुठे राहते मी
कसे बंध येथे उन्हाशी जुळाले

जरी रांधले शब्द प्राणांत सारे
मला मीच नाही अजूनी कळाले..!

किती लोक येतात भेटावयाला
जुने स्पर्श ठेवून जातात वेगे

कसे सोबती काय बोलून जाती
कळेना तयांना घडे काय मागे

अता होउदे बोलणे आतल्याशी
जरा बाजुला व्हा नको व्यर्थ माया

कुडी वृद्ध झालीय संपेल यात्रा
असे वेळ थोडाच गाडी सुटाया

***

आसावरी काकडे
८.८.२०१६

Friday 5 August 2016

ती एक अनाम भिल्लिण

ती एक अनाम भिल्लिण
आपल्या पाच तरुण मुलांसह
लाक्षागृहात जळालेली..!

त्यांचा अपराध नव्हताच काही
त्यांना केलेली शिक्षाही नव्हती ती
एका कटाला काटशह देण्यासाठी
आखलेली केवळ एक योजना होती..!

दूर्योधनाला आगीत होरपळलेले
सहा देह दिसले
आणि पाची पांडव कुंतीसह सुखरूप निसटले
पुढे मोठे महाभारत घडले...
वर्षानुवर्षे त्याचे गोडवे गायले गेले..!

कुणाला कळलंही नाही की
त्यासाठी एका निरपराध कुटुंबाचा बळी गेला...
क्रौर्य असं घरंदाज की
अत्याचाराचा मागमूसही लागला नाही कुणाला
आजतागायत...!

किती कथांमधल्या किती फटी
अशा बेमालूम बुजवल्या असतील कथाकारांनी
ज्यात कित्येक स्त्रिया.. आदिवासी
गाडले.. चिरडले.. होरपळले असतील..!
***
आसावरी काकडे
३.८.२०१६

काय माझा गुन्हा..

काय माझा गुन्हा रामा
मला तुझा मोह झाला
मन उघडे मी केले
राग आला सौमित्राला

लंकापती भ्राता माझा
मीही सामान्य नव्हते
गेले असते माघारी
नाही म्हणायचे होते

पण उठला त्वेशाने
कुलवंत राजपुत्र
नाक छेदून बाणाने
मला केले विटंबित

काय आदर्श घातला
त्रेतायुगात भावांनी
स्त्रीला विद्रुप करणे
गिरविले पुढीलांनी

प्रेम मागितले तरी
विद्रुपता स्त्रीच्या भाळी
प्रेम अव्हेरीले तरी
तिच्यावर हीच पाळी..!
***
आसावरी काकडे