Saturday 17 September 2016

शब्द-समाधी

साद एक शोधीत मनस्वी
शब्दांमागुन गेले चालत
आर्त कोवळा आशय त्यांचा
ओंजळीमधे बसले झेलत

मृद्गंधासम बरेच काही
ह्रृदयामध्ये भरुन घेतले
आकाशाचे निळे गूढ पण
शब्दांना नाहीच गवसले

अल्प अल्पसा अर्थ समजला
जरी निसटले क्षितीज धूसर
आनंदाची कुपी मिळाली
दु:खाचेही तिच्यात अत्तर

देणे घेणे सरले सारे
खेळ खेळुनी झाला पुरता
नको आणखी वेडी वणवण
शब्द-समाधी घ्यावी आता..!
***
आसावरी काकडे
१७.९.१६

निरोपावे आता

आहेस आहेस माझ्या आसपास
नाहीस नाहीस का मी म्हणे?

त्वचाबंद देह वर्ततो निखळ
आहे नाही खेळ मनाचाच

निराकार साहे 'आहे'चा आकार
'नाही'ला नकार देती संत

विठोबाची सोय केली आहे त्यांनी
त्याला ध्यानी मनी आठवावे

बुद्धीने घेतला ध्यास अनिवार
शब्दांना अपार कष्टविले

थकले सांगाती धावता धावता
निरोपावे आता शब्दज्ञान..!
***
आसावरी काकडे
१७.९.१६

माय कधीची..

इवल्या देहा कष्टणे काय असे हा भोग
माता की ही बालिका असे निरागस 'योग'?

एका देहा राबणे एका कळते भूक
वणवण पाहुन कोवळी रस्ता झाला मूक..!

माथी मोळी टांगली झोळीमध्ये पोर
मनास तुडवत चालली आता कसला घोर

रस्ता मागे राहिला पुढे निघाली बाय
पुढचा रस्ता चालवी कितिही थकले पाय

नभास ठाउक चांदणी भूमीला विस्फोट
माय कधीची पाजते तिला कळाले पोट..!
***
आसावरी काकडे
१५.९.१६

Tuesday 13 September 2016

नसे समारोप..

किती कळ्या या देठात
किती खोल श्वास
रंग सोनसळी त्याला
जगण्याचा ध्यास

रोज उकलून देठ
कळी डोकावते
आणि कळी विलगून
फूल उमलते

होते अर्पण असणे
थोडे उजळून
मग निर्माल्य देखणे
पडते गळून

पुन्हा तरारते देठ
खोलते भांडार
पुन्हा कळ्या फुलण्याचा
नवीन बहर

सृजनाच्या खेळाला या
नसे समारोप
नित्य रुजणे फुलणे
चाले आपोआप..!
***
आसावरी काकडे
१३.९.१६

कोणी...

सूर मारुन पोकळीचा अर्थ कोणी लावतो
क्षणिकतेने भरुन कोणी पोकळीला झाकतो

वेदनेवर स्वार होउन पार कोणी जातसे
आपुल्या परिघात कोणी वेदना कुरवाळतो

देह नेइल त्या दिशेने धावती सारे इथे
दावतो पण मार्ग त्याला काळ वेसण घालतो

झाकुनी प्रेतास कोणी पेरणी करती परी
फसवुनी त्याना कुणी ते आयते बळकावतो

कैक असती रंग-रेषा कैक त्यांच्या आकृत्या
कैक स्वार्थी गुंतलेले पैल कोणी पाहतो..!
***
आसावरी काकडे
१२.९.१६

Monday 12 September 2016

निरोप...

मी निरोप घेउन दूर निघाले होते
सोबतीस कोरे एक निमंत्रण होते

पोचले परंतू ठिकाण ते ते नव्हते
उतरून घ्यायला कुणीच आले नव्हते

मग भूल उतरली एकाकी यात्रेची
अन ऐकू आली गाज निळ्या श्वासांची

नभ तसेच होते दिशा आपल्या जागी
डोळ्यात कुणाच्या नव्हती धून विरागी

नव्हतेच निमंत्रण समारोप तो नव्हता
शेकडो भ्रमातिल मोहक विभ्रम होता..!
***
आसावरी काकडे
११.९.१६

Sunday 11 September 2016

मुखवटा

कोणताही घ्या मुखवटा
मोल नाही वेगळे
रंग वरचा वेगळा पण
तेच गारुड आतले

देव कोणी कोण विदुषक
रंगलेल्या बाहुल्या
रंगकर्मी एक आहे
भूमिका जरि वेगळ्या..!

रंग निवडा कोणताही
लाल हिरवा जांभळा
लाभतो रक्तास लालस
सावलीला सावळा
***
आसावरी काकडे
१०.९.१६

Thursday 8 September 2016

पोकळी

पोकळीमधूनी
जन्म पोकळी घेई

ती क्षणाकणाने
पूर्ण भरुनिया जाई

मग हळूहळू ती
पुन्हा पोकळी होते

पोकळीस पण का
नवी पोकळी छळते..?
***

पोकळी भराया
वणवण करती सारे

साहित्य शिल्प अन
मोकळे भराया तारे

गूढार्त पोकळी
तहान संपत नाही

देठात कळी पण
फूल पोकळी होई..!
***

आसावरी काकडे
८.९.१६

जन्म नवा लाभला

तांबुस हिरवी सळसळ कोरी
जन्म नवा लाभला

भविष्य सांगू नका कुणी मज
रेषा ठाउक मला

येइल तो तो क्षण सोनेरी
नित्य नवा सहवास

आत जेवढे श्वास कोरले
तेवढेच निश्वास..!
***

एकेक करत नुरली
गंगाजळीत नाणी

ओढून घेत आहे
परिघास आत कोणी

धावून सर्व वाटा
जाती घराकडे पण

गर्भाशयात फिरुनी
उपजे नवीन पाणी..!
***
आसावरी काकडे
७.९.२०१६

आरती तेजसा

आरती तेजसा
तुझीच रे तेजाने

अन पूजा करती
तुझी लाल पुष्पाने

तू पोषणकर्ता
तुलाच रे नैवेद्य

जणु तुझेच अर्पण
तुला अर्घ्यदानाने..!
***

उन्माद कोणता हा
प्राणास नाचवीतो

बडवून ढोलताशे
देहास झिंग देतो

सण साजरा करी की
दु:खास वाट देई

थकुनी अखेर बहिऱ्या
मूर्तीस बोळवीतो..!
***
आसावरी काकडे
६.९.२०१६

पण इथेच रमते...

लावून आपला
नामफलक दारावर

मी उभी कधीची
देहाच्या काठावर

पण इथेच रमते
कधी धावते क्षितिजी

वाटतो भाबडा
शब्द मला तो नश्वर..!
***

इथलेच कुणी रे
होउन येते त्राता

दु:खाला नसतो
वेळ थांबण्यापुरता

धावतो काळही
पुसुन टाकतो सारे

मोक्षाची लालुच
निष्प्रभ झाली आता..!
***

आसावरी काकडे
६.९.२०१६

Monday 5 September 2016

दोन प्रहर

*लागली तोरणे*

लागली तोरणे
किरणांची दारांवर

उमलत्या कळ्यांचे
गंध-गूज वाऱ्यावर

पक्ष्यांची किलबिल
जाग आणते दिवसा

माणूस चढवतो
स्वप्न-वेल काळावर..!
***

*ही वरात कसली*

ही वरात कसली
लग्न कुणाचे आहे

मेण्यात रात्रिच्या
वधू कोणती आहे

हा जथा विलक्षण
ताऱ्यांचाही मागे

साऱ्यांना घेउन
रात्र निघाली आहे..!
***

आसावरी काकडे
३.९.२०१६

Thursday 1 September 2016

प्रतिबिंब

बिंब रूपे वर
कमळ सगूण
खालती निर्गूण
प्रतिबिंब

स्पर्श रूप गंध
बिंब उधळते
निवांत राहते
प्रतिबिंब

साहतसे बिंब
वर्षा ऊन वारा
पाहते पसारा
प्रतिबिंब

पाण्याच्या वरती
भोक्ता बिंब डुले
साक्षी रूपे हले
प्रतिबिंब..!

विरताच पाणी
द्वैत मावळते
बिंबात मुरते
प्रतिबिंब..!
***
आसावरी काकडे
१.९.२०१६

कधी जीवनाशी पैजा

कधी जीवनाशी पैजा
कधी मृत्यूला हाकारे
कधी इंद्रधनू तर
कधी उन्हाचे निखारे

वर खाली नाचविती
मनातले हेलकावे
नाव तरते बुडते
किनाऱ्यास काय ठावे

वर एक आत एक
मूर्त-अमूर्ताचा खेळ
सगळ्याला साक्षी आहे
नित्य असणारा काळ

अनाहत नादासम
एक कविता मौनात
शब्दातून मिरवते
दुजी कविता जनात..!
***
आसावरी काकडे
३१.८.१६