Thursday 12 August 2021

मीही आहे त्या खेळात


भोवती कशाकशाचा
हाहाकार माजलेला असताना
आयुष्याच्या तिन्हीसांजेला
मी शांत बसले आहे
खिडकीच्या चौकटीतून दिसणार्‍या
आपल्या वाटच्या
एक तुकडा आकाशाकडे पाहत...

मन प्रसन्न आहे
त्याला उमगलंय
आनंद.. संताप.. वेदना.. क्लेष.....
हे सर्व भिडू आहेत
एका विराट खेळातले
मीही आहे त्या खेळात
आता भोज्या बनून पाहते आहे

बाहेर सगळं पूर्ववत चालू आहे
अधिकच भयकारी..
खचवणारं झालंय आता

पण दुरून पाहताना वाटतंय
सृष्टीच्या आरंभापासून सुरू आहे
हे नवरसांचं संमेलन..
आणि आपला जन्म म्हणजे
जीवनाच्या या संमेलनात
सहभागी होण्यासाठी
मिळालेलं निमंत्रण आहे..!

मी आता रंगमंचावर नाही
नवनवीन खेळ पाहात
श्रोत्यात बसले आहे..
समोरच्या नाट्याला आणि
माझ्या इथं असण्याला दाद देत..!

***

आसावरी काकडे २५.७.२०२१

Tuesday 13 July 2021

क्षणिका-



गर्द हिरवा गर्द पिवळा रंग त्यांनी प्राषिला
कोवळासा गंध सात्त्विक अंतरंगी उगवला
बी कवींचा सोनचाफा मौन धरतो गूढसे
उगवलेला गंध तरिही हसत राही गोडसे..!
***
आसावरी काकडे
२९.५.२०२१

दिवसभराचे चित्र स्मरावे निजताना रात्री
चितारायचे काहि नुरावे निजताना रात्री
अहोरात्र त्या नक्षत्रांच्या चमचमती दिवल्या
दिवे घरातिल मंद करावे निजताना रात्री..!
***
आसावरी काकडे
२८.५.२०२१

मी पाठीवरती मलाच वाहत असते
अन अक्षरांमधे मलाच कोरत असते
प्रत्येक ऋतूचा रंग वेगळा सुंदर
एकेक लेउनी मलाच सजवत असते..!
 *** 
११.७.२०२१

आयुष्य न केवळ...

आयुष्य न केवळ इथे, जन्मते-मरते
ते विश्व-पटाची वीण सावरित असते

कोसळतो पाउस ऊन अचानक पडते
खेळातुन त्यांच्या इंद्रधनू अवतरते

पाखरू सानुले दाणे टिपुनी उडते
धरतीवर नकळत वृक्षारोपण होते

एकांती कोणी आर्त मनी जागवते
नि:शब्द प्रार्थना कुठे धाउनी जाते..!

**
आसावरी काकडे 
१३.७.२०२१

तो मी नव्हेच


हे दुख ते दुख म्हणून जो लक्ष वेधून घेतोय,
चित्ताला अस्वस्थ करतोय तो मी नव्हेच

हवा कुंद झालीय, आकाश काळवंडलंय
म्हणून ज्याचं हृदय धडधडतंय तो मी नव्हेच

आनंदानंही विचलित करणारं मन
ज्याला बिथरवतंय तो मी नव्हेच

अस्तित्वाच्या एकेका चेहऱ्याला 'तो मी नव्हेच' म्हणत
पुढं जाता जाता प्रत्येक वेळी लक्षात येतं

की 'तोच मी' चा मुक्काम
मृगजळासारखा आणखी थोडा दूर गेलाय..!

***
आसावरी काकडे
८.६.२०२१
 ५.४०

Monday 5 July 2021

भूमिका


मी आता भूमिका बदलली आहे
फक्त भूमिका नाही
हावभाव आणि नेपथ्यही..!

बांधलेलं सामान सोडून जागच्याजागी सजवून ठेवलंय

गाडी चुकली नव्हती... आलीच नाही
वाट बघत होते तयार होऊन
सहर्ष
पण गाडी आलीच नाही
मग वाट पाहणं सोडून
'आता-इथं'च्या स्थानकावरून उठले
आणि 'जिजीविषेत शतं समा:'चं
बोट धरून परतले स्वगृही
सहर्षच

आवराआवरी झालेलीच आहे
पण आता मी भूमिका बदलली आहे
मी 'एक्झिटची वाट पाहणारी' नाही
'नाट्यात रंगलेली' झाले आहे..!

***
आसावरी काकडे
३.७.२०२१

चेहरा हसरा सदा ठेवू चला


चेहरा हसरा सदा ठेवू चला
रंग दुःखाचा जरा बदलू चला

तोंड झाकुन राहणे आता पुरे
श्वास थोडा मोकळा घेऊ चला

देह असते बाळ आईने दिले
खेळ त्याचा रंगुनी पाहू चला

अप्राप्यसे क्षितिज मृगजळ वाटते
पण खरे मानून ते धावू चला

वाचला इतिहास तो झाला जुना
सत्य आता त्यातले शोधू चला

दहशती अदृश्य साऱ्या भोवती
भेदुनी त्यांना पुढे जाऊ चला

***

आसावरी काकडे
२.७.२०२१

दाही दिशांना..


केंद्रबिंदू ठाव सोडुन धावतो दाही दिशांना
प्रसवणारा परिघ होउन फाकतो दाही दिशांना

वंचना घेऊन पदरी भटकती रस्त्यावरी ते
सांत्वनाचे दान कोणी मागतो दाही दिशांना

वेगळाले कैक रस्ते साद देती माणसांना
मोह सगळ्याचाच त्यांना पळवतो दाही दिशांना

स्वत्व अर्पुन बीज इवले सत्व मातीला पुरवते
गंध त्यातुन उगवलेला पसरतो दाही दिशांना

छाटल्यावर सर्व फांद्या रिक्त झाले झाड माझे
कैफ जगण्याचा तरीही बहरतो दाही दिशांना..!

मंच हा अवकाश सारा काळ असतो पार्श्वभूमी
रंगकर्मी रचुन नाट्ये दावतो दाही दिशांना..!!

***

आसावरी काकडे

३०.६.२०२१

Thursday 24 June 2021

असणे इथले

क्षणा-कणाने विलीन होते

अनंतामध्ये असणे इथले

 

या असण्यातच पुन्हा जन्मते

क्षणा-कणाने असणे इथले

 

ये जा त्याची पाहत बसतो

जीव मुशाफिर सागर-तीरी

 

'ये-जा'मधल्या संधिक्षणाला

बहाल करतो असणे इथले..!

*

आसावरी काकडे

२३.६.२०२१ 


Monday 21 June 2021

गात्रांच्या उंबरठ्यावर..

गात्रांच्या उंबरठ्यावर

लावीन रोज मी पणती

दारावर बांधुन तोरण

सजवीन मृण्मयी नाती

 

मी गाइन त्यांच्यासाठी

साजिरी गोजिरी गाणी

लागता स्वरांच्या दिवल्‍या

उजळेल आतली ग्लानी

 

गात्रातिल रात्र सरावी

जगण्याचा उत्सव व्हावा

शिव सुंदर जे जे त्याचा

जीवास वेध लागावा..

 

हा देह कुणी ना परका

सोबती जन्मजन्मीचा

'मी'रूप रहाया येते

शोधीत आसरा त्याचा

***

आसावरी काकडे

१६.६.२०२१ 


Tuesday 25 May 2021

मुक्तके

 ही उलथापालथ तशी अचानक नाही

एकटा कुणीही समुद्र ढवळत नाही
पारडे होतसे अविरत वरती खाली
वर जाते कोणी, कुणी खालती राही..!
***
आसावरी काकडे 
२१.५.२०२१

हे जीवन केवळ अर्घ्यदान की असते
कोणाला कळते, कुणी नकळता करते 
जन्मते चराचर पूर्णामधुनी सारे 
एकेक अखेरी पूर्णा अर्पण होते
***
आसावरी काकडे
२१.५.२०२१

निष्पर्ण एकटी फांदी नभात घुसली
अन तहान तीवर अलगद येउन बसली
वासली चोच जणु पदर पसरला कोणी
आर्तता त्यातली नभास भेदुन गेली..!
****
आसावरी काकडे
२६.५.२०२१

Saturday 1 May 2021

मावळत्या दर क्षणात



मावळत्या दर क्षणात
उगवतसे बिंब नवे
पण दिव्यास मालवत्या
स्नेहाचे तेल हवे

देहस्वी ऐहिकास
नवनवीन श्वास हवा
घरभिंती सजवाया
जगण्याचा कैफ हवा

भोवळले जग सगळे
भीतीने गारठले
अन तशात एक मोर
पावसात नाचतसे

विस्कटते स्वप्न एक
तोच दुजे अवतरते
सळसळती उंच लाट
वेगाने ओसरते 

आवर्तन हे असेच
चाललेय नेमाने
या विराट योजनेस 
अर्पावे हे 'असणे'..!
***
आसावरी काकडे
३०.४.२०२१

सूप्तावस्थेतील संवाद

 

Talking in their sleep
by Edith M . Thomas या कवितेचा अनुवाद

सूप्तावस्थेतील संवाद

‘तुम्हाला वाटतं मी मृत झालोय’

सफरचंदाचं झाड म्हणालं,

कारण माझ्याजवळ एकही पान नाहीए दाखवायला

मी काहीसा झुकलोय

माझ्या फांद्या वाकल्यायत

माझ्या अंगावर सुस्त, निर्जीव शेवाळं पसरलंय

पण मी जिवंत आहे बुंध्यात.. कोंबात

येत्या मे महिन्यातल्या कळ्या

मी सध्या झाकून ठेवल्यायत..

 

पण मला कींव येते

माझ्या पायाशी पसरलेल्या वाळलेल्या गवताची’

 

‘तुला वाटतं मी मृत झालोय’

वाळलेलं गवत तत्परतेनं म्हणालं,

कारण देठ आणि पाती मला सोडून गेलीयत

पण मी आहे जमिनीखाली

भक्कम आणि सुरक्षित.

बर्फाची रजई पांघरलेली आहे वरून

पूर्ण जिवंत आहे मी आत

आणि नव्यानं उगवायला तयार आहे.

या वर्षीचा वसंत नृत्य करत येण्याचाच अवकाश आहे.

 

पण मला फांदीवरून गळून पडलेल्या,

देठ नसलेल्या या फुलाची दया येतेय’

 

‘तुला वाटतं मी मृत झालोय’

एक नाजुक आवाज बोलला,

‘कारण फांदी आणि मुळं नाहीएत माझ्या सोबतीला.

पण मी कधीच नाहीसा झालो नाही.

फक्त मी वार्‍यानं पेरलेल्या

मृदू मधूर बीजांमधे मला लपवून ठेवलंय.  

आणि शिशिराच्या दीर्घ घटकांमधे

मी धीरानं वाट पाहातोय...

 

तुम्ही मला परत पाहाल

तेव्हा मी हसेन तुम्हाला

शेकडो फुलांच्या डोळ्यांमधून..!

***

मराठी अनुवाद : आसावरी काकडे

पक्ष्याचे चित्र रेखाटणे...

 

To paint the portrait of a bird
by Jacques Prevert या कवितेचा अनुवाद

पक्ष्याचे चित्र रेखाटणे...

आधी एक पिंजरा रंगवा

दार उघडं असलेला..

मग रंगवा

काहीतरी मोहक

काहीतरी साधं

काहीतरी सुंदर

काहीतरी उपयोगी

पक्ष्यासाठी..

 

मग कॅनव्हास झाडाच्या समोर ठेवा

एखाद्या बागेत

रानात

किंवा जंगलात

झाडामागे दडून बसा

आवाज न करता

हालचाल न करता

 

कधी पक्षी लगेच येतो

पण कधी तो कैक वर्षे घेतो

कधी यायचं ते ठरवायला

पण धीर सोडू नका

वाट पहा

वर्षानुवर्षे, गरज पडली तर

पक्षी लगेच येणं किंवा त्यानं वेळ घेणं

याचा चित्राशी काही संबंध नाही

पक्षी आला तर, येईल तेव्हाच्या

निगूढ शांततेचं निरीक्षण करा

पक्षी पिंजर्‍यात प्रवेश करेपर्यंत वाट पाहात राहा

आणि जेव्हा तो आत येईल

तेव्हा ब्रशनं हळूच पिंजर्‍याचं दार लावून घ्या

पक्ष्याच्या पिसाला धक्का न लागेल याची काळजी घेत

एकेक गज रंगवत जा

 

मग झाडाचं चित्र रंगवा

पक्ष्यासाठी सर्वात सुंदर फांद्यांची निवड करून..

मग हिरवळ रंगवा आणि झुळझुळ वाराही वाहूदे

सूर्यप्रकाशातली धूळ दिसूदे

उन्हाळ्यातल्या कीटकांची गुणगुण उमटूदे

मग पक्षी गाण्याचं मनावर घेईपर्यंत वाट पाहा

 

जर पक्षी गायला नाही तर

ते अवलक्षण

चित्र चांगलं न उतरल्याचं..

आणि जर तो गायला तर ते शुभ लक्षण

चित्रावर सही करायचा क्षण

तेव्हा अगदी नाजूकपणानं पक्ष्याचं एक पीस काढा

आणि चित्राच्या एका कोपर्‍यात आपलं नाव रेखा..!

**

- Jacques Prevert

मराठी भावानुवाद : आसावरी काकडे

Pursuit of Truth is the end of Art . That may be equal to unison with God . Here bird stands for divine knowledge

कलेतील परिपूर्णता म्हणजे सत्याचा पाठपुरावा. तेच ईश्वराशी एकरूप होणं असेल. इथं तो पक्षी म्हणजे ते सत्य... ईश्वरीय ज्ञान..!

Sunday 25 April 2021

गे कविता म्हणजे..


गे कविता म्हणजे केवळ
कोलाज एक शब्दांचे
अप्राप्य क्षितीजावरल्या
संदिग्ध सांज रंगांचे

एकेक शब्द त्यामधला
'क्ष' बीजगणितामधला
वांछीत उत्तरासाठी
कुठलीही संख्या घाला

हे कुठले कुठले संचित
उतरले रिक्त शब्दांत
गोठले प्रवाही होउन
अर्थाच्या चिर मौनात

हे गोंदण असेच असते
कवितेच्या भाळावरले
डोळ्यांना दिसती केवळ
आकार खोल रुतलेले..!
*
आसावरी काकडे 
१६.४.२०२१

प्रतिसाद...


जन्मोजन्मी महाभूते
भेटती जिवाला
देहादारी धाव घेई
वारा निवाऱ्याला

खडकाच्या डोळा कधी
येत नाही पाणी
आपलेच निळे आर्त
दिसते पाषाणी

जन्मक्षणी होतो सुरू
सृजन-प्रवास
उमलणे हा कळ्यांचा
सुगंधी कळस

पैलतीरी गेली सांज
दिस मालवून
खुणेसाठी धूळ थोडी
गात्रांत ठेवून..!

संभ्रमांचे फूल सदा
खांद्यावर डोले
मनातल्या पाखराशी
बावरून बोले

आयुष्याच्या वाटेवर
संचिताचे झाड
पोपटांनी पिंजऱ्याचे
लावले कवाड

संभोगाचा खेळ चाले
आंधळ्या तळ्यात
सृजनाचा रुद्ध टाहो
गोठतो गळ्यात

काळोखाच्या उगमाशी
उन्मळती वेणा
जन्मगंध शोधायला
धावतोय मेणा

अवसेचे भय दाटे
सोबतीला काळा
उगमाला धीर देई
जन्माचा सोहळा..!
**
आसावरी काकडे
१९.४.२०२१

ती तू आहेस..!



बाहेर पाऊस कोसळतोय
गडगडतंय... वारंही सुटलंय
विजा चमकतायत...

आणि आत
मी बसलेय हे सगळं बघत
धडधडतंय... अस्वस्थ झालंय मन..

आणि हा आत-बाहेरचा खेळ
बघतीय आणखी कुणीतरी...

तिनं म्हटलं, तू ती नाहीस
धडधडत आत बसलेली...
बाहेर कोसळतेय
गडगडतेय
चमकतेय
ती तू आहेस..!
***
१२.४.२०२१

तो जिवांचा सोयरा..



कोणतीही खूण नाही
तर्कही ना चालतो
पण कुणाला वाटते तो
नित्य सोबत चालतो

तो दयाळू सर्वसाक्षी
तीर्थक्षेत्रे त्रिभुवनी
चालणे यात्राच होते
चालवीता तो धनी

विश्व-पालक तो अनादी
तो जिवांचा सोयरा
खोल तृष्णा मानवाची
अमृताचा तो झरा

व्यापकाला, सानुल्याशा
बांधती नामामध्ये
आळवीता अन पुन्हा, तो
फाकतो प्राणामध्ये..!

***

आसावरी काकडे

२५.३.२०२१

Thursday 11 February 2021

तुम्हाला माहिती असो नसो...

 

तुम्हाला माहिती असो नसो

तुमची इच्छा असो नसो

तुमच्याकडे कौशल्य असो नसो..

 

तुम्ही एका महाशिल्पाच्या निर्मिती-प्रक्रियेत

समाविष्ट केले गेलेले असता

 

तुम्ही शिल्पाच्या दगडातला एक कण असाल

किंवा छिन्नीचा अंश असाल

किंवा घडवणार्‍या हातातल्या

सर्जनकळांचे साक्षी

 

शिल्पाच्या निर्मिती-प्रक्रियेत

काढून टाकलेल्या दगडाच्या चुर्‍यात असाल तुम्ही

किंवा शिल्पाच्या डोळ्यातले भाव

दाखवणार्‍या कणात विराजमान असाल

 

कुठेही असलात तरी तुम्ही

त्या महाप्रक्रियेचा एक अविभाज्य भाग असता

स्वतःची गती नसलेल्या रेल्वेतील प्रवाशासारखे

प्रक्रियेच्या गतीबरोबर निमुट धावत असता

 

उत्पत्ती-स्थिती-लयाच्या आवर्तनातून

अखंड फिरत असते शिल्प

आणि 

तुम्हाला माहिती असो नसो

तुमची इच्छा असो नसो

तुमच्याकडे कौशल्य असो नसो

त्याच्या निर्मिती-प्रक्रियेतली

वाट्याला आलेली भूमिका

आजन्म निभावत असता तुम्ही...!


***

आसावरी काकडे

१२ २ २०२१