Tuesday 28 February 2017

सुरुवात केली तूच

सुरुवात केली तूच
पसारा हा घालावया
दोष मलाच देऊन
सांगतोस आवराया

त्रिगुणांचा हा डोलारा
वाढतोय अनावर
किती कललाय बघ
आता तूच तो सावर

मर्यादांचेच पैंजण
घालूनिया पाठविसी
दोर हातात ठेवून
मुभा नाचायची देसी

ओढ लावून जिवाला
केसरिया क्षितिजाची
घालतोस पावलांना
ओली शपथ मातीची

देह देऊन पार्थिव
सोडलेस माझे बोट
आवर्तनांचा आता या
तूच कर ना शेवट..!
***
आसावरी काकडे
१.३.२०१७

झालो आम्ही फक्त

रोज येतो रोज  रोज उगवतो
आणि मावळतो  रोज रोज

येणे जाणे घडे  क्षितिजावरती
ठरलेली गती  पाळायची

ठरलेल्या भुका  साद घालतात
पाय धावतात  त्यांच्यामागे

त्याच किनाऱ्याशी  पोचतात लाटा
आतला बोभाटा  फेस होतो

नका पुसू आम्हा  जन्म कशास्तव
भुकांचा विस्तव  धाववितो

पाहिले न कधी  पालखीत कोण
येई तो तो क्षण  वाहतोय

झालो आम्ही फक्त  पालखीचे भोई
आयुष्याची राई  पाहिली ना..!
***
आसावरी काकडे
२८.२.२०१७

Wednesday 22 February 2017

ऐल पैल सावरीत दोघे

अव्यक्ताच्या काठावरती
राधा मोहन बसले गं
ऐल पैल सावरीत दोघे
प्रीतीमध्ये बुडले गं

ऐल राधिका पार्थिव प्रतिमा
पैल श्रीहरी निर्गुणसा
ओढ विलक्षण दोघांनाही
अद्वैताचा ध्यास असा

सगूण होतो कधी श्रीहरी
कधी विदेही हो राधा
अंतर मधले मिटते तेव्हा
मीलनास कुठली बाधा

ज्याला त्याला भुरळ घालते
युगुल सनातन रुजलेले
अव्यक्ताच्या काठावरती
प्रतीक होउन बसलेले
***
आसावरी काकडे
२२.२.२०१७

अन आता म्हणती..

अव्यक्तच होता जीव पाच तत्त्वांत
पण जन्म अवांछित लाभलाच देहात
तो आला रमला 'त्याच्या' सृष्टीमध्ये
अन आता म्हणती रमू नको व्यक्तात

गुंतला तरीही अनेक व्यापांमध्ये
अन हरवुन गेला शरीर-रानामध्ये
किलबिलती पक्षी अविरत की इच्छांचे
तो थकून गेला धावुन देहामध्ये

फिरवून पाठ मग उलटा धावू लागे
इच्छांचे शेपुट तसेच लोंबत मागे
तो डोळे मिटुनी व्यक्ता झाकू पाही
पण अव्यक्ताच्या काठी कुणी न जागे..!
***
आसावरी काकडे
२२.२.२०१७

Tuesday 21 February 2017

कठीण आहे चढ..!

अव्यक्तातून फुटून
जन्मा आलो देहात
उलट प्रवास माझा
अव्यक्तातून व्यक्तात

अद्वैतातच होतो आधी
पण रमून गेलो द्वैतात
उलट प्रवास माझा
एकातून अनेकात

'स्व'गृही परतून जाणे
आता वाटते अवघड
उतार होता सोपा
कठीण आहे चढ..!
***
आसावरी काकडे
२१.२.२०१७

कळेना...

कसा चंद्र पृथ्वीस आधार देतो
कसा कोणत्याही क्षणी घात होतो
कशी अंतरिक्षात चाले भ्रमंती
गुरू धूमकेतू कसे आडवीतो

कशी योग्य स्थानी वसे सूर्यमाला
कशी रोखते भू स्वतःच्या गतीला
कशी आग ठेवून दूरात तेथे
हवी तेवढी राखते ती स्वतःला

कळेना इथे खेळ व्यक्तातलाही
कळेना कसे चालते विश्व तेही
इथे सर्व आपापल्या वर्तुळात
कसे ज्ञात होणार अव्यक्त काही?
***
आसावरी काकडे
२१.२.२०१७

Saturday 18 February 2017

अवचित कधी

अवचित कधी
मन फुलझडी होते
सूर्योदयाआधी
आत उजाडू लागते

गंधांचा काफिला
येतो विचारत वाट
अनोखी भूपाळी
गाऊ लागतात भाट

नसताना सण
होते दिवाळी साजरी
भेटला की काय
कुठे राधेला श्रीहरी?

गोंदून ठेवावा
अशा मीलनाचा क्षण
विरहात यावी
फुलझडी आठवण..!!
***
आसावरी काकडे
१८.२.२०१७

निराकार आदीम वासना

प्रणयाच्या या किती परी अन
किती रंग असती त्याचे
भक्तीचे घे रूप कधी तर
कधी मागणे देहाचे

कधी धुंद श्रुंगार विलासी
कधी चोरट्या स्पर्श-खुणा
कधी लाजरे लाडिक नखरे
कधी असे व्यवहार सुना

बलात्कार कधि हीन पशूहुन
ओरबाडुनी घेणारे
सम-भोगाचे सूखही कधी
असतातच की देणारे

युगायुगांचे समुद्र लंघुन
शोधत देहांना येते
निराकार आदीम वासना
विविधा ही रूपे घेते..!
***
आसावरी काकडे
१६.२.२.१७

Tuesday 14 February 2017

साक्षी कितीजणांना...

काही मने गुलाबी काही दुखावलेली
काही अपार थकली काही विझून गेली
दिन-रात राबती जे त्यांना कशी कळावी
नाती तनामनाची ज्यांना मने न उरली

प्रेमात जीव घेती प्रेमात जीव देती
प्रेमाविना सुनेसे कोणी जगून जाती
हो देवदास कोणी मीरा कुणी दिवाणी
देवास वाहिलेल्या कित्येक झिजुन मरती

संसार थाटलेले श्रृंगार आखलेले
तृप्तीत धुंद काही, काही दुरावलेले
साक्षी कितीजणांना तू राहिलास चंद्रा
कित्येक भोग नुसते उपचार राहिलेले..!
***
आसावरी काकडे
१४.२.२०१७

हवे भिजलेले मन

हवे भिजलेले मन
किंवा दुःख सोसलेले
तेव्हा फुटतात शब्द
आत अधीर झालेले

सूर मारून तळाशी
स्वर लावतात असा
कवितेने वेदनेचा
जणू घेतलाय वसा

युगायुगांचेच आहे
नाते वेदनेशी तिचे
क्रौंच-दुःखाला मिळाले
छंद, शब्द वाल्मिकींचे

कवितेच्या ओठी येता
दुःख इवले कुणाचे
ओलांडून स्थल-काल
होते अवघ्या विश्वाचे..!
***
आसावरी काकडे
१२.२.२०१७

Sunday 12 February 2017

अनोखेच नाते

सारे एकाकार  गाढ अंधारात
दिवसाची रात  होते तेव्हा

उजाडता सारे  आकार जागती
अस्तित्व जपती  आपापले

उजेड पेरतो  स्वत्व वस्तूंमध्ये
चराचरामध्ये  नाम-रूपे

फोफावत जाते  अस्तित्वांचे रान
येतसे उधाण  उजेडाला

ओसरत जाते  उसळती लाट
दिवसाची रात  होई पुन्हा

तमाच्या कुशीत  मिटून आकार
पुन्हा चराचर  झोपी जाई

अनोखेच नाते  विश्वाचे तमाशी
असे उजेडाशी  वेगळेच..!
***
आसावरी काकडे
११.२.२०१७

Saturday 11 February 2017

लकाकते काही..

लकाकते काही
विरतही नाही
ठरतही नाही
मनामध्ये

खोल तळातले
उसळत नाही
मावळत नाही
मनामध्ये

कवितेचा मेघ
ओसरत नाही
झरतही नाही
मनामध्ये

दिसलेसे होते
मिटतही नाही
उमटत नाही
कवितेत..!
***
आसावरी काकडे
१०.२.२०१७

Wednesday 8 February 2017

अटळ..

रेशीम-किड्यांना मारुन रेशिम बनते
कुस्करुनी सुमने अत्तर ते घमघमते
सौंदर्य-निर्मिती अटळ विनाशामधुनी
या वृक्षासाठी कोण कोण खत होते..!
***

आक्रमणे होती पोटातुन भीतीच्या
अन भीती उपजे मोहातुन स्वार्थाच्या
भावना गुंतल्या अशा एकमेकीत
हा दिवस जन्मतो गूढातुन रात्रीच्या
***

फुत्कार विषारी सोडुन अंगावरती
ती क्रूर श्वापदे दहशत पेरुन जाती
क्रूरता न केवळ युद्धभूमीवर दिसते
बघणारी भीती तिचे लेकरू असते
***

आसावरी काकडे
८.२.२०१७

Sunday 5 February 2017

एकलेपणाला वाटले आतून

(ज्ञानेश्वरी उपमा ८)

एकलेपणाला  वाटले आतून
अनेक होऊन  व्यक्त व्हावे

एकलेच बीज  गच्च कोंदाटले
अनेकत्व ल्याले  उगवून

प्रसवल्या भाषा  एकाक्षरातून
आशयामागून  निघाल्या त्या

कोट्यावधी जीव  एका पेशीतून
एका थेंबातून  सप्तसिंधू

स्वेच्छेनेच त्याने  सारे निर्मियेले
वेगळे काढले  स्वतःतून

प्रत्येका वेगळे  नाम रूप दिले
स्वत्व देऊ केले  ज्याचे त्याला

आणि आता म्हणे  अनेकत्व खोटे
एकत्व गोमटे  सत्य आहे

असूदेत एक  तरंग नि पाणी
सोने आणि लेणी  असो एक

वेगळेपणाने भेटू पुन्हा पुन्हा
सोबत निर्गुणा  असूदेना..!
***
आसावरी काकडे
३.२.२०१७

शेवटी जाण येते..!

रडत बुडत जो तो
हात मागे तराया
सकल विकल येथे
कोण ये सावराया

खळबळ अति आहे
भोवती माजलेली
निवविल कळ ऐसा
कोण ना येथ वाली

दरवळ जरि येथे
गंध कोठे दिसेना
दहशत कसली ही
वाटते या फुलांना

बिलगुन मन राही
देहभावास नित्य
इकडुन तिकडे त्या
येरझाऱ्याच फक्त

जवळ जवळ जाता
शून्य हातात येते
अन मृगजळ सारे
शेवटी जाण येते..!
***
आसावरी काकडे
२.२.२०१७

Thursday 2 February 2017

read more चे ब्रेक

जगण्याचं वर्तूळ
आक्रसत चाललंय..

कोऱ्या डायऱ्या
सदासज्ज laptop
शब्दकोश.. संदर्भ ग्रंथ.. पुस्तकांनी
गच्च भरलेली शेल्फस..
सगळं एका मोबाईल मधे
जाऊन बसलंय..

जगण्याचं वर्तूळ
आक्रसत चाललंय..
विश्व.. जग.. देश.. आक्रसत
'मी'च्या डी पी मधे सामावलंय..!

त्यातून वर काढून
आपल्या जगण्याचं पुस्तक
वाचताना read more चे
ब्रेक पार करताना दमछाक होतेय

पण राहिलेला मजकूर डिलीट
करण्याची सोय नाहीए..
लिहिणाराची सही दिसेपर्यंत
वाचत राहायचंय..

जगण्याचं वर्तूळ
कितीही आक्रसलं तरी
त्यातून सुटका नाही..!
***
आसावरी काकडे
१.२.२०१७

Wednesday 1 February 2017

झाडं जखडलेली असतात..

झाडं जखडलेली असतात
जमिनीशी..
निमुट सोसत राहतात
पक्ष्या-प्रण्यांचा अंगावरचा
मनसोक्त वावर
निसर्गाची मनमानी
माणसांचे प्रेम.. अत्याचार

वाटलं तरी
धावून जाता येत नाही त्यांना
कुणाच्या अंगावर..
कुणाला जवळ घेता येत नाही..

त्यांना व्यक्त करता येत नाही
आतून उमलण्याचा आनंद
की कृतघ्न घावांविषयीचा
अनावर संताप..

आतल्या आत साचत राहतात
भावनांचे उद्रेक
निबर खोडाला मग फुटतात डोळे
जागोजाग..

झाडांना बोलता आलं नाही
म्हणून काय झालं?
जागोजागी फुटलेले त्यांचे
डोळे बोलतात ना..!

ऋतूचक्रानुसार
प्रत्येक पान.. फूल.. फळ
उगवतं उत्कटतेनं
आणि
ऐकणाराची वाट पहात
ओघळत राहातं..!
***
आसावरी काकडे
३१.१.२०१७