Monday 27 March 2017

योजना?

संंदर्भ : ज्ञानेश्वरीतील क्षेत्र-क्षेत्रज्ञ संकल्पना (क्षेत्र - पार्थिव देह, क्षेत्रज्ञ - त्यास जाणणारा. दुसऱ्या भाषेत प्रकृती-पुरूष)

कितीतरी वर्षे झाली
पत्ता तोच आहे
रंग रूप तेच सारे
नाव तेच आहे

जीव रमलाय पुरा
देहाच्या घरात
आत बाहेर वावर
चाले अविरत

क्षेत्र म्हणती घराला
जीव रहिवासी
नित्य नांदतो घरात
तरी परदेसी

सांगतात वसतसे
अंतरी क्षेत्रज्ञ
क्षेत्रवासी असूनही
जीव अनभिज्ञ

येणे-जाणे नित्य आणि
क्षेत्रज्ञ सोबत
तरी जिवा कसे काही
नाही उमगत?

कळू नये अशीच का
असेल योजना
नाहीतर कोण त्याच्या
लागेल भजना?
***
आसावरी काकडे
२६.३.२०१७

Saturday 18 March 2017

साद' म्हणे..!

(ज्ञानेश्वरी उपमा १४)

भवसागराचे
गूढ आहे पाणी
कैवल्याचा धनी
पैलतीरी

जन्मासोबतच
तोच देतो नाव
‘पल्याड’चा गाव
गाठावया

रमलेल्या जीवा
नाव ना दिसते
खोली ना कळते
पाण्याचीही

मूढपण असे
तरी घेते उडी
आतला नावाडी
बाहतसे

पण बुडणेच
नाही उमगत
बसे गोते खात
अंतावेरी

सज्ज आहे नाव
जिवा तारणारी
जाग आता तरी
'साद' म्हणे..!
***
आसावरी काकडे
१७.३.२०१७

Friday 17 March 2017

आदिशून्य होते आधी

(ज्ञानेश्वरी उपमा ११)

आदिशून्य होते आधी
अनादि अनंत
अहंकाराने नटता
झाले अंतवंत

मग उत्पत्ती लयाची
झाली त्याला बाधा
सगुणाच्या सोबतीला
हवी झाली राधा

सुरू झाली टांकसाळ
जिवांच्या नाण्यांची
चराचर सृष्टीतल्या
नित्य सृजनाची

पार्थिवात जाणिवेचा
रुजला अंकुर
आदिशून्य गाभाऱ्यात
घुमला ॐकार..!
***
आसावरी काकडे
१६.३.२०१७

Thursday 16 March 2017

कोण ऐनवेळी..

चालते नाटक  रंगमंचावर
नटांचा वावर  ठरलेला

कोणी केव्हा कसे  बाहेर यायचे
विंगेत जायचे  कोणी केव्हा

सारे लिहिलेले  तेच बोलायचे
कधी हसायचे  रडायचे

अचानक कधी  शेवटच्या क्षणी
मिळे कलाटणी  संहितेस

कुणी कोसळते  पडदा पडतो
निःशब्दच होतो  नाट्यकर्मी

कुणा न कळते  कोण ऐनवेळी
अकल्पित खेळी  करतसे..!
***
आसावरी काकडे
१४.३.२०१७

Friday 10 March 2017

रोज

माणसे रोज ही कुठुन कुठे जातात
सामान भरूनी परत घरी येतात
आवर्तन चाले रोज त्याच फेर्‍यांचे
उतरंड रचूनी रोज तेच गातात
***
रंगते रोज जे क्षितीज मृगजळ असते
भंगते तरीही स्वप्न रोज धडपडते
धावती पावले परंतु त्यांच्या मागे
सरड्यांना कुंपण रोज ओढुनी नेते
***
तो सांज सकाळी रोज प्रार्थना करतो
पुटपुटतो काही जसा थेंब टपटपतो
वाचतो माणसे कधी वाचतो पोथ्या
जागीच बसूनी क्षितीज लंघुन जातो
***
आसावरी काकडे
९.३.२०१७

Wednesday 8 March 2017

नाही ‘भरला’ म्हणून..

पाणी ओतले परंतू
पालथ्याच घड्यावर
एक थेंब तरी त्यात
मग कसा भरणार..?

पण नसतो तो रिता
जरी पालथा असला
‘असण्या’चा ताल आत
असतो ना भरलेला

स्वर-साधक भणंग
त्याला हवी होती साथ
त्याच्या तृषेला दिसला
ताल पालथ्या घटात

बोटे पडता, आतला
गाभाराच थरारला
त्याला हवा तसा ताल
घटामधून घुमला

असण्याचे झाले गाणे
स्वर तालाशी जुळून
घट झाला ताल-वाद्य
नाही ‘भरला’ म्हणून
***
आसावरी काकडे
७.३.२०१७

Saturday 4 March 2017

त्रिगुणांचा काला

संकल्प केलास ‘बहुस्याम’ असा
त्रिगुणांचा फासा  टाकलास

सत्वाचा थेंबुटा  रजाची उसळी
तमाची काजळी  विस्तारली

खेळ सुरू झाला  विश्वनाट्याचा या
उगवून लया  जात राही

माजले सर्वत्र  विकारांचे रान
स्वार्थाचेच भान  बाळावले

अमर्याद हाव  धावे सैरावैरा
सद्गुणास थारा  राहिला ना

कोण थांबवेल  सत्तेचे तांडव
न्यायाचे ‘गांडीव’ गळालेय

आणि तू खुशाल  ‘यात मी नाहीच’
म्हणत हा नाच  पाहतोस

बराच होतास  शून्यात एकला
त्रिगुणांचा काला  माघारी ने

***
आसावरी काकडे
४.३.२०१७