Friday 26 May 2017

कसे व्हावे जिणे वाहणारे पाणी

माळी नेतो तसे  सुखे जाते पाणी
पेरणी रुजणी  माळी जाणे

असे पाणी कधी  होता येईल का?
चिंता मिटेल का  भविष्याची?

कड्या कुलुपात  जिणे बंद केले
काळाला बांधले  वर्षांमध्ये

भाव अक्षरात  अक्षरे सुरात
सूर बंदिशीत  बंद केले

नावांमध्ये, सर्व  नात्यांना बांधले
देवाला कोंडले  मंदिरात

कसे व्हावे जिणे  वाहणारे पाणी
माळ्याची पेरणी  जाणणारे..?
***
आसावरी काकडे
२५.५.२०१७

No comments:

Post a Comment