Sunday, 1 May 2016

जन्मक्षणीच


जन्मक्षणीच
देहनामक एक पॅकेज मिळतं तुम्हाला
आणि त्यासोबत
तुमचा असा एक टाइमझोन
ज्यात राहून
तुम्ही समृद्ध करू बघता तो..
आपापल्या मगदुरानुसार

कर्तृत्व सिद्ध करता.. पदव्या मिळवता
मानमरातब कीर्ती संपत्ती
प्राप्त करता यश विविध क्षेत्रांत
तेव्हा तुम्ही गृहीत धरता शरीर
त्वचेआड जागच्याजागी वेळच्यावेळी
निर्माण होऊन उत्सर्जीत होणार्‍या द्रावांकडे
सहज करता दुर्लक्ष
तुच्छ लेखता त्यांना
त्यांचे उच्चारही अश्लील बीभत्स वाटतात तुम्हाला

जन्मक्षणीच परीक्षेसाठी नेमलेला
‘समग्र अस्तित्व’ हा विषय
पार विसरून जाता तुम्ही
पण शरीराला बसावंच लागतं या परीक्षेला
कधी ना कधी
तेव्हा कळतं महत्त्व
प्रत्येक श्वासाचं.. एकेका हलचालीचं..
एरव्ही क्षुल्लक वाटणार्‍या
आतल्या सूक्ष्म घडामोडींचं..

परीक्षा सुरू झाली की गरजेनुसार
नेमलेल्या यंत्रांमधे घातले जातात
शरीरातले एकेक द्राव
एकेक अवयव
किंवा अख्खं शरीरच..!
तेव्हा यंत्रं तुम्ही केलेल्या
शरीराच्या अपमानाचा बदला घेत
निर्घृण दुर्लक्ष करतात
तुम्ही कमावलेल्या तुमच्या कर्तृत्वाकडे
त्यांच्या लेखी नगण्य असतं
तुम्ही गायक चित्रकार कवी असणं
गौण असतात जात धर्म राष्ट्रियत्वाची बिरुदं
तुम्ही असता केवळ
तुमच्या नावाचं लेबल असलेलं एक शरीर..

यंत्रांच्या मायक्रोस्कोपिक नजरेलाही
दिसत नाही रक्तातला त्वेष.. आवेश
हाडांमधला द्वेष.. मत्सर
हृदयातलं प्रेम.. करुणा
मेंदूतली विद्वत्ता.. विवेक
किंवा
शरीराच्या कानाकोपर्‍याला लगडलेली जिजीविषा

त्यांना कळतात फक्त पार्थीव तपशील
तटस्थपणे ती टिपतात
अवयवांची आरपार छायाचित्रं
आखतात आलेख उसळणार्‍या रक्ताचा
काढतात व्हिडिओ हृदयाच्या स्पंदनांचा
मोजतात वेग रंग गुण विविध द्रावांचे

आणि ठेवतात तुमच्यासमोर
तुमच्या मार्कांची यादी.. तुमची कुंडली
जिच्या कुठल्याही घरातून
डोकावत नाही
जगण्याला कवटाळून बसलेलं तुमचं मन..!

***

आसावरी काकडे

३० एप्रिल २०१६ 

No comments:

Post a Comment