Tuesday 27 December 2016

अक्षरांचा होतो मोर

आपापल्या पिंजऱ्यात
बंद असती माणसे
दरवाजांना आतून
कड्या घालती माणसे

पुस्तकांचे तसे नाही
असतात ती समोर
हाती उचलून घेता
अक्षरांचा होतो मोर

होतो तत्पर नाचाया
अंगोपांगी अर्थछटा
नाचनाचतो घेऊन
साऱ्या संचिताचा वाटा

फट शोधत शोधत
दारी येती कवडसे
तेवढ्यात पुस्तकांची
पाने मिटती माणसे..!
***
आसावरी काकडे
२७.१२.१६

रात्र जिवाचे माहेर

रात्र जिवाचे माहेर
रोज कुशीत घेणारे
आणि दिवस सासर
राबायला लावणारे

रात्र सजवते स्वप्न
गाढ निजल्या नेत्रात
रुजवते बळ नवे
क्षीण झालेल्या गात्रात

दिस उजाडता लख्ख
सय कर्तव्यांची होते
घड्याळाच्या काट्यांंसवे
जिवा धावावे लागते

दिस मावळतो तेव्हा
रात्र होते पुन्हा आई
नव्या पाठवणीसाठी
गाते नवीन अंगाई
***
आसावरी काकडे
२४.१२.१६

Friday 23 December 2016

असू दे (ज्ञानेश्वरी उपमा १७४/४)

विश्व अमूर्ताचा । असे कवडसा
चैतन्य विलासा । पार नाही

कवडसे छाया । जल-ओघ माया
आकाशाची काया । दिसते ना

असू दे भ्रामक । असू दे क्षणिक
किती हे मोहक । फूल, पान

सगुणाचे मोल । कथिले संतांनी
कवितेचा धनी । केले त्याला

अनाहतातून । प्रकटते धून
शाश्वतामधून । अशाश्वत

पार्थीव नेत्रही । नाहीत शाश्वत
आनंद अ-मृत । होऊ दे रे..!
***
आसावरी काकडे

खेळ..

पार्श्वभूमी सज्ज आहे जंगलाची भोवती
मांडलेला डाव आहे आसनेही सज्ज ती

वाट एकाकीच चाले राहिली ती का सुनी
येत नाही जात नाही आत बाहेरी कुणी

फूल, पाने गाळताना शोक नाही फारसा
सर्व आहे स्तब्ध येथे हा कुणाचा वारसा

एक साक्षी पाहतो हे भोगतो कोणी न का?
कोणता हा देह आहे मुक्त झाल्यासारखा..?
***
आसावरी काकडे
२२.१२.१६

Thursday 22 December 2016

सारखी येथे परीक्षा

रोजचे जगणेच शाळा
बंद ना भिंतीत जी
झाडही येथे शिकवते
घ्या फुलांची काळजी

वाट बोले घाट दावी
नवनवे दृश्यार्थ ते
संथशा श्वासात आहे
जीवनाचे स्थैर्य ते

माणसांच्या वागण्यातुन
रोज मिळतो ना धडा
चालताना ठेच लागे
शिकवुनी जाई तडा

पूर्ण सृष्टी ही गुरू अन
शिष्य हे आयुष्य रे
सारखी येथे परीक्षा
प्रश्न-व्याधी ना सरे..!
***
आसावरी काकडे
२१.१२.१६

Wednesday 21 December 2016

आतून अचानक तेव्हा.

भरसभेत त्यांनी माझ्या
वस्त्रास घातला हात
पाचही समोरच होते
एकाकी पडले आत

आक्रंदुन विनवित होते
पण कोणी आले नाही
येईल कुणी सोडवण्या
नाहीच मिळाली ग्वाही

आतून अचानक तेव्हा
मज ऐकू आला वेणू
पंच प्राण जागे झाले
चेतले सर्व अणुरेणू

मी उघडी पडले नाही
झाकले मला स्वत्वाने
जन म्हणती कृष्ण सखा तो
सोडवले मजला त्याने..!
***
आसावरी काकडे
२०.१२.१६

Monday 19 December 2016

नको होऊस कातर

रित्या कातरवेळेला
नको होऊस कातर
खोल रुजलेली बीजे
असतात रे आतुर

असूदेत रापलेला
दे ना हातामध्ये हात
ओरखड्यांमधे आहे
निळी-सावळी सोबत

थोडी ओली थोडी सुकी
स्वप्ने आहेत चुलीशी
उभी अधीर कधीची
नाते त्यांचेही जाळाशी

ऊर्जा त्यांचीच घेऊन
राबू दोघेही एकत्र
लावू सर्वस्व पणाला
जरी थकतील गात्रं

होऊ डोलणारे पीक
किंवा मिसळू मातीत
कुणासाठी कुणीतरी
व्हावे लागते ना खत..?
***
आसावरी काकडे
१८.१२.१६

Saturday 17 December 2016

प्रिय,

प्रिय,
आयुष्याच्या या कातरवेळी
अंगडी टोपडी घालून
पुन्हा नव्यानं उगवायला लागूया
मुळं जेवढी उतरली असतील खाली
तेवढं चढायचं आहे वर..

मी हात धरून
सांभाळीन तुझा तोल
तू माझी मान सावर..

धडपडणं
हट्ट करणं
बोबडे बोल... भूक
हसणं.. रडणं
हे सगळं
नव्यानं समजून घ्यायची
वेळ आलीय...

कातरवेळच्या या नव्या बाळपणात
आपणच एकमेकांची आई होऊया
अंगडी टोपडी घालून
पुन्हा उगवायला लागूया..!!
***
आसावरी काकडे
१७.१२.१६

Monday 12 December 2016

*वाट*

एक साधीशी
पाऊलवाट होती ती
बैलगाडीच्या चाकांनी रुंदावून
तिला चाकोरी केलं

फुफाट्याची डांबरी झाली
मग काँक्रीटची
दुपदरी.. चौपदरी.. सहापदरी झाली
जमीन पोखरून भुयारी झाली
मग उड्डाणपूल झाली

पंख लावून आकाशगामी झाली
कधी शीड कधी इंजिन लावून
अथांग जलाशय पार करू लागली
प्राणवायूच्या नळकांड्या घेऊन
सागरतळ धुंडू लागली

महाकाय डोंगरांना
वळसे घालत घाट झाली
पोखरून काढत बोगदा झाली

वाट सर्वगामी झाली..

पण तिला कळेनासं झालंय आता..
ती पोचतेय मुक्कामी
की नुसतीच फिरतेय गोल गोल..!
***
आसावरी काकडे
९.१२.१६

Sunday 11 December 2016

थांब थांब...

थांब थांब वेड्या मनुजा
नको घालु घाव
किती वेदना होती ते
मुळांनाच ठाव

किती स्वार्थ साधुन घेसी
पहा जरा दूर
वृक्षतोड करुनी अंती
बडवशील ऊर

इमारती रस्ते... सारी
अर्थशून्य ठेव
मुला-लेकरांना थोडा
प्राणवायु ठेव..!
***
आसावरी काकडे
८.१२.१६

Friday 2 December 2016

आता..

आधी दूर होतो तेव्हा
माझ्या मनात रुजायचं
आणि तुझ्या मनात उगवायचं
न सांगताच कळायचं तुला..

मग मी या खोलीतून विचारायची
तू त्या खोलीतून उत्तर द्यायचास
प्रश्न तुला कळलेला असायचा..

आता ऐकू येत नाही नीट
सांगण्या-ऐकण्यासाठी जवळ यावं लागतं..
तरी समजतच नाही नेमकेपणानं..

कसलं असेल हे अंतर?

देहाबरोबर समजही गेलीय थकून
की
आपापल्या परतीच्या वाटेवर
प्रस्थान सुरू झाले आहे आतून?
***
आसावरी काकडे