Saturday 15 July 2017

मुक्तके



आकाश निळे वर सांगत असते काही
पण वस्ती खाली काही ऐकत नाही
हा पूल मधोमध देहासम की आहे
जो जिवा-शिवाच्या मध्ये आडवा येई..!
***

हे रंग गंध रस सारे स्वप्नी हसते
येतात कोठुनी निद्रेला ना कळते
सौंदर्य निरामय स्वप्न असे की भास
जागत्या जिवाला याचे गारुड छळते
***

वा जन्मच झाला दोहोंच्या सीमेवर
निद्रेत स्वप्न अन जागा भास अनावर
हे स्वप्न असे जर जाग न येवो केव्हा
अन भास असे तर अंत न त्याचा व्हावा
****
आसावरी काकडे
१५.७.१७

आगळा जिव्हाळा


एकाकी डोहाला
लाभला आगळा
फुलांचा जिव्हाळा
मौनरंगी..!

मग आकाशही
उतरले त्यात
अक्षरे मौनात
पेरावया

इथून तिथून
वाऱ्याने आणला
गंध लपेटला
त्याच्या भोती

लाभला मधूर
आनंदाचा स्पर्श
डोहामध्ये हर्ष
मावेनासा..!
***
आसावरी काकडे
१५.७.२०१७

म्हणे हा विठोबा..


पाषाणात शिल्प शिल्पात चैतन्य
जागला अनन्य भाव त्यात

शून्य निरसून एकाला दिसला
त्याने वर्णियेला भाव त्याचा

म्हणे हा विठोबा देवांचाही देव
निवारितो भेव तोच सारे

भक्ताच्या भक्तांनी पाहिला श्रद्धेने
काया वाचा मने पूजियेले

पाषाणाचा झाला देव मंदिरात
तोच अंतरात बिंबविला

भारावून मीही गेले दर्शनाला
मला न दिसला देव कुठे

पाहा पाषाणाचे कसे हे प्राक्तन
चैतन्य निधान सापडले

पण जन्मजात चैतन्य असून
मीच की पाषाण झाले आहे..!


***

आसावरी काकडे
१२.७.२०१७

Monday 10 July 2017

सुटू लागले देठ...

नका ना पिकांनो पुन्हा साद घालू
नका मोह पाडू पुन्हा पाखरा
मनस्वी उडूनी नभा भोगणेही
पुरे जाहले जाउद्या ना घरा

समाधान आहे पुरेपूर गात्री
पुन्हा खालती झेप घेणे नको
सुटू लागले देठ कोषामधूनी
पुन्हा लाघवी तो बहाणा नको

रवी-तेज येता उजाडेल तेव्हा
मिटू लागते रातराणी जशी
तसे वाटते गंध वाटून जाता
मिटू दे मनातील ती उर्वशी
***
आसावरी काकडे
८.७.२०१७

झेपावून झाले..

झेपावून झाले
पुन्हा पुन्हा किती
फेऱ्यांची गणती
कोण करी?

किती शेतेभाते
चवीने भोगली
खोलवर झाली
तृप्ती आता

नका ना पिकांनो
साद घालू पुन्हा
चोचीमध्ये दाणा
धरवेना

फिरवा रे कोणी
आता ती गोफण
उडण्याचा क्षण
पंखी येवो..!
***
आसावरी काकडे
८.७.२०१७

Thursday 6 July 2017

ऐल वाटे पैल..

आकाशाला कोणी
घातले कुंपण
बावरले मन
पाखराचे..!

जणू क्षितिजच
खेचून आणले
मूर्तीत कोंडले
निराकारा

अनिर्वचनीय
त्याला नाव दिले
तिष्ठत ठेवले
विटेवर

विठ्ठल विठ्ठल
नामाचा गजर
करून जागर
चालविला

पण नावातच
मन अडकले
झेप विसरले
अंतराळी

ऐल वाटे पैल
आता पाखरास
दिगंताची आस
उरली ना..!
***
आसावरी काकडे
५.७.२०१७