Friday 30 June 2017

जन्मदुःख

(ज्ञानेश्वरीतील उपमा)

हा कितवा देह
जाणिवेनं परिधान केलाय?

स्वयंभू निराकार ज्ञानाला
का पडला मोह व्यक्त होण्याचा?

सर्वव्याप्त अणुरेणूंमध्ये
विखुरलेलं असणेपण
गोळा करत
त्यानंच निर्मिल्या
चौर्‍यांशी लक्ष प्रजाती

प्रत्येक दर्शनबिंदूतून घेतलं
असतेपणाचं दर्शन परोपरीनं
आणि तृप्त झाल्यागत
आता सुटू पाहतेय
पार्थिव आकारांमधून...
असह्य होतंय त्याला जन्मदुःख..!

पण नको नको म्हटलं तरी
फुटतातच आहेत पानं
आदिम इच्छेत रुजलेल्या
बुंध्याच्या रंध्रांमधून
कळ उठतेच आहे
जगण्याची पुन्हा पुन्हा..
प्रवाह वाहतोच आहे अखंड
दुःखकालिंदीचा..!!
***
आसावरी काकडे
२९.६.२०१७

Wednesday 28 June 2017

देहऋण...

तिने जन्म दिला  नाव रूप दिले
पूर्ण घडविले  देहशिल्प

माझे माझ्या हाती  देऊन म्हणाली
सांभाळ दिवली  देहातली

स्वामित्व लाभता  राबविले खूप
करविले तप  जगण्याचे

त्याच्याच साथीने  भोगले बहर
कित्येक शिशिर  पचविले

अखंड चालले  सुखे अग्निहोत्र
पण आता गात्र  शिणलीत

रोज नवे काही  चाले रडगाणे
नवे ढासळणे  इथे तिथे

नको जीव होतो  चिडाचिड होते
नको ते बोलते  देहालाच

सोपविले होते  तिने तिचे बाळ
त्याची मी आबाळ  करू नये

शिणल्या देहाची  मीच आई व्हावे
प्रेमाने फेडावे  देहऋण..!

***
आसावरी काकडे
२७.६.२०१७

Friday 23 June 2017

परोपरीने सांगसी..

परोपरीने सांगसी
किती उकल करून
ज्ञानी कसा असे स्थिर
जरी सामान्य वरून

पाजतोस ज्ञानामृत
तुझा पसा कनवाळू
पण देह-भूमीत ते
झिरपते अळुमाळू

स्थिर काठाशी असेतो
वाटे सहज तरणे
नाव पाण्यात घालता
कळे हेलकावे खाणे

जन्म चिखलात पण
आहे व्हायचे कमळ
कळो येईल तेवढे
मिळो जगण्याचे बळ..!
***
आसावरी काकडे
२३.६.२०१७

Tuesday 20 June 2017

नावाडी वल्हवतोय..

वाट्याला आलेल्या
कॅनव्हासच्या मर्यादांचे भान असूनही
रंग गोळा केले
मनातला अथांग जलाशय
पसरवला त्यावर
पार्श्वभूमीसारखा

एक नाव रेखली इवलीशी
उभी ऐल किनाऱ्याशी
दोन वल्ही रंगवली
एक नावाडी काढला

सुरू झाली नाव
नावाडी वल्हवत राहिला
कीती दूर, कुठे जायचंय..
पल्याड काय आहे...
नावाड्याला कळेना..

रंगही गोंधळले
कुठे रंगवायचा पैल किनारा
या प्रश्नाशी ते थबकलेत केव्हाचे..!
***
आसावरी काकडे
२०.६.२०१७

Saturday 17 June 2017

स्वप्न म्हणालं, ऐक

एकदा माझं स्वप्नं
मेण्यातून मिरवत मिरवत
दिमाखात क्षितिजापार गेलं
पण असीम आसमंतात भरकटून
थकून गेलं पार
नि जमिनीवर आलं..

मातीचा किनारा लागताच
टक्क भानावर येत
मेण्यातून उतरून चालू लागलं
एकेक पाऊल टाकत..

पहाटेनं मंद उजेडाच्या हातानं
वास्तवावरचं रात्रीचं पांघरूण
अलगद बाजूला केलं
तसं खडबडून जागं झालं ते

मनाला म्हणालं, 'ऐक
ही हार नाहीए माझी...
मृगजळ असलं तरी
समजून घ्यावं लागतं क्षितिज
तेव्हा कुठं जरा जरा उमगतं
आकाशाचं संगीत
लाटांची गाज ओसरते
हेलकावणारं गलबत स्थिरावतं
सत्वाचे पैंजण आत्मविश्वासानं
रुणझुणू लागतात
आणि समोर अंथरली जाते
एक अनवट पायवाट
बोधीवृक्षाकडे नेणारी..!'
***
आसावरी काकडे
१७.६.२०१७

Thursday 8 June 2017

दिलासा

मृत्यूच देतो अखेरी दिलासा
मृत्यूच मागे तरीही दिलासा

आजन्म वाहून नेतोय जन्म
मृत्यू मला का न देई दिलासा?

काहीच नव्हते तरी विश्व झाले
शून्यास दिसला विलासी दिलासा

वाऱ्यासवे फूल गेले उडूनी
गंधास लाभे विदेही दिलासा

तेव्हा न होती मुभा बायकांना
शाळेत गवसे विचारी दिलासा
***
आसावरी काकडे
६.६.२०१७

Tuesday 6 June 2017

गुड न्यूज

सकाळी सकाळी
दारावरची बेल वाजली
कोण असेल? म्हणत
दार उघडलं...

उत्साहानं निथळत
ती आत आली, म्हणाली
'गुड न्यूज'
'अरे वा.. काय ती? '
' आपण भेटलो.. ! हीच '
' हा.. हा.. खरंच की '
गुड वाटेल ती गुड न्यूज..!

आली तशी वाऱ्यासारखी
निघूनही गेली ती..

तिची गुड न्यूज
दरवळत राहिली दिवसभर..

संध्याकाळी तू भेटलीस
धावपळीचा दिवस पर्समध्ये बंद करून
परतत होतीस अॉफिसमधून
दिवसभराचा वृत्तान्त ऐकवत
निघताना दुखावलेल्या स्वरात म्हणालीस
' पाहावं.. ऐकावं.. वाचावंं.. ते अंगावर शहारे आणणारं..  कुठे काही बरं घडतंच नाही का..! '

बाय करताना
तुझ्या हातात संक्रमित केला मी
माझ्यात भरून राहिलेला
सकाळच्या गुड न्यूजचा दरवळ..
तेवढाच दिलासा तुलाही
दिवस संपता संपता..!
***
आसावरी काकडे
६.६.२०१७

Monday 5 June 2017

कणिका

रात्रीच्या अंधाराला
काजवा घालतो कोडे
किति विचार केला तरिही
त्याला न उमगते थोडे

उगवतो सूर्य पण जेव्हा
किरणांतुन उत्तर येते
तो स्वयंप्रकाशी आहे
त्याचे न जराही अडते..!
***

झाड होऊनिया  भूमी उगवते
नभाला बाहते  आलिंगाया

पाखरू होऊन  झेपावते नभ
सोहळा दुर्लभ  नाही मुळी..!

पाहणारे नेत्र  हवेत मनाला
दिसेल सोहळा  क्षणोक्षणी..!
***
आसावरी काकडे
४.६.२०१७

Saturday 3 June 2017

तसे मन..

खाली नाही तळ
वर नाही काठ
नुसता रहाट
तसे मन?

ऐल ना किनारा
पैल ना क्षितिज
नुसतीच गाज
तसे मन?

पंखही नाहीत
पायही नाहीत
तरीही प्रवास
तसे मन?

नाही काळ-भान
न ही अवकाश
फक्त चाले श्वास
तसे मन?

आर नाही त्याला
पारही न दिसे
तरी भान कसे
असण्याचे..?

आभासी निलीमा
दिसे आकाशात
तसे शरीरात
म्हणे मन..!
***
आसावरी काकडे
१.६.२०१७

Thursday 1 June 2017

करकरूनी विचार

करकरूनी विचार
अखेरी कळाले
पाणी सारेच शेवटी
सागरा मिळाले

करकरूनी विचार
कळाले शेवटी
नाही बदल गाभ्यात
नुसतीच दाटी

करकरूनी विचार
पिकलीत मने
हलक्याशा चाहुलीने
गळतील पाने

करकरूनी विचार
थकले काळीज
कशी सोसेल, विदग्ध
विचारांची वीज?
***
आसावरी काकडे
३१.५.२०१७