लाल फुलांनी पूर्ण
बहरलेल्या
पक्व गुलमोहरासारखे पसरलेले
ठेवावेत
आपण आपले बाहू सदैव
काय सांगता येतं
दूर कुणी उभं असेल कड्यावर
स्वतःला ढकलून देण्याच्या टोकावर..
दुरून दिसेल त्याला अंधुक
आधार
बुडणार्याला किनारा दिसावा
तसा..
आधाराच्या दर्शनानंच
मागं फिरेल तो
परतेल स्वतःत सुखरूप..!
जमिनीवर गालिचा रेखत
विखरून पडलेल्या त्याच्या
फुलांसारखं
आपण अंथरून ठेवावं आपलं मन
काय सांगता येतं
कोसळण्याचा क्षण कधी येईल
आणि झेलायला नसेल कुणी
आसपास
तेव्हा तेच
अलगद सावरेल आपल्याला
वरच्यावर..
सदैव सज्ज असावं आपण
उन्हाच्या झळा सोसूनही
बहरणार्या गुलमोहरासारखं
व्हावं एक गर्द सावली
दुसर्यासाठी
आणि स्वतःसाठीही..!!
***
आसावरी काकडे
३० एप्रिल २०१६
No comments:
Post a Comment