चुकल्या मुशाफिराला
विचारू नये त्याचं गाव
दिशा दाखवावी
नव्या स्वप्नांकडे नेणारी
शब्दांमधून खणून काढू नयेत
त्यांचे अर्थ
आपले पेरावेत
बेंबीच्या देठातून उगवतील
असे
शोधू नयेत कारणं
अस्फुट स्मितांमागची
निमित्त पुरवावीत
खळखळून हसण्याला..
तहानलेल्याची भागवू नये
तहान
लगेच पाणी देऊन
थोडी राहू द्यावी कंठात
त्याला त्याची विहीर
मिळेपर्यंत
सरत्या आयुष्यावर
लादू नयेत ओझी जीवनेच्छांची
निर्मम होऊन म्हणावे
शुभास्ते पंथानः सन्तु..!
***
आसावरी काकडे
६ मे २०१६
No comments:
Post a Comment