दिवस मावळलाय
रात्र उगवायचीय...
पूर ओसरलाय
ओहोटीला आरंभ नाही झालेला
अवशेष जागीच टाकून निघालेला
पूर
मागे वळून बघतोय..
रात्र उगवण्याच्या क्षणाची
चाहूल घेतेय..
मधे निवांत वाहतोय
एक विलक्षण संधीकाल
अंतर्मुख..
असे कितीदा येतात आणि जातात
दोघं
आळीपाळीनं
तो आला की भरून जायचं आरपार
आणि ती येईपर्यंत मोकळं
व्हायचं जिवापाड
अनुभवलंय त्यानं
वर्षानुवर्षे..
पण आज या विलक्षण
मध्यसंधीवर
अचानक दिसलं त्याला
भरती-ओहोटीशिवायचं
दिवस-रात्रविरहित
निखळ स्वतः असणं
आणि वाटून गेलं..
आणि वाटून गेलं..
हेच असेल का ते निजरूप..?
***
आसावरी काकडे
२ मे २०१६
No comments:
Post a Comment