हात जोडून डोळे मिटून
तो उभा आहे
एका मंदिरासमोर
मूर्ती गाभारा उंबरठा
मंडप दरवाजा पटांगण
आणि बंद असलेलं गेट
सगळ्याच्या बाहेर...
रस्त्यावर
वाटलं, जाता जाता
रोमरोमात भिनलेल्या सवयीनं
जोडले असतील त्यानं हात
किंवा असेल मनात
न सुटणार्या प्रश्नांचा
गुंता
असेल प्रार्थना स्वतःसाठी
किंवा मोठाही असेल आवाका
त्याच्या आर्ततेचा..
पण डोळे मिटून
शांत उभा आहे तो तिथं
एकटाच
मनात असेल कुटुंबकबिला
स्नेह्यांचा जथा
किंवा
आला असेल ओलांडून सगळं
असेल एकटाच मनातही
पायांनी थाबवलं म्हणून असेल
उभा
किंवा त्याच्या रिकाम्या मनात
नसेल पुढे जाणारा रस्ता
दिशादर्शक पाटी.
गोंधळून असेल उभा
किंवा.. किंवा
गाभार्यातल्या मूर्तीनंच
घातली असेल त्याला आर्त साद
सोबतीसाठी
तिनंच थांबवलं असेल त्याला..!
तो ऐकत असेल तिचीच प्रार्थना
कदाचित्..!
***
आसावरी काकडे
४ मे २०१६
No comments:
Post a Comment