Tuesday, 31 May 2016

अल्प शांती मिळावी..!

श्री समर्थांची माफी मागून

अनुदिनी अनुतापे
तापलो रामराया
सतत धरति हाती
त्रासलो रे विधात्या

घडि घडि विघडे हा
निश्चयो अंतरीचा
उठसुट उठवीती
शब्द, ओठी न वाचा

मननरहित रामा
सर्वही काळ गेला
भसभस उपसा रे
चालला, अल्प त्याचा

भरभर वर जाई
स्क्रीन जागी न थांबे
मुरत मुळि न काही
सर्व लोपून जाते

तन मन धन सारे
ओतती ते सुखाने
मजविण पण वाटे
सर्व संसार ओझे

कितितरि सुविचारा
रोज ते पाठवीती
सकळ स्वजन माया
लोटुनी दूर जाती

जळत हृदय माझे
भाजती कान त्यांचे
विज-बिल किति येई
भान नाही कशाचे

बघुन सकल सेल्फी
खंत वाटे कुणाला?
तळमळ निववी रे
घोर लागे जिवाला

तुजविण दुखणे हे
कोण जाणेल माझे
शिणत शिणत आहे
वेड जाईल का हे?

रघुपति मति माझी
आपुलीशी करावी
विकल जन तयांना
अल्प शांती मिळावी..!

***

आसावरी काकडे

३१ मे २०१६

Monday, 30 May 2016

निमिषाच्या अंतरावर दिसतो


ब्रह्मांडाच्या
अतिप्रचंड आणि अतिसूक्ष्म स्वरूपाच्या
केवळ शब्द-दर्शनानंही
समूळ हदरतं मन
‘स्व’ चा परीघ
सैरभैर होतो
त्वचेवर शहारा उमटतो खोल प्राणांमधून
पायांखालची जमीन सरकते
‘घटाकाश’
घटाकारातून ओसंडू पाहते....
निमिषाच्या अंतरावर दिसतो
अद्वैताचा परीसस्पर्श...

पण
पण ‘दर्शन’ दृष्टिआड होताच
महाभरतीच्या या सगळ्या लाटा
माघारी वळतात
आणि मन
पूर्ववत गटांगळ्या खाऊ लागतं
स्व-भानाच्या खोल समुद्रात..!

***

आसावरी काकडे

३० मे २०१६

Sunday, 29 May 2016

तिथेच नाही फक्त


तिथेच नाही फक्त
इथे, आतही होत असतात
पौर्णिमा-आमावस्यांची
आवर्तनं सतत....

तिथे ठराविक गतीने
ठरलेल्या वेळेवर
चंद्रकला उलगडतात
मिटत जातात
चुकत नाही कधीच
पौर्णिमा–आमावस्यांचा क्रम

पण इथे
केव्हाही हसतो पूर्ण चंद्र खुदकन
सागराला भरती येते आतल्या आत
आणि फक्‍कन विझून जातो अचानक
माघारी वळतात
आवेग ओसरलेल्या लाटा...

इथल्या चंद्राला नसतात कला
नसतात ठरलेल्या दिशा
उगवण्या-मावळण्याच्या
प्रतिपदा... द्वितीया... हा तिथला क्रमही
कळत नाही आतल्या भावपेशींना
आतल्या पौर्णिमांची मोजदाद
ठेवता येत नाही कुणाला

तिथल्या पौर्णिमांच्या हिशोबानंच
साजरा करतात लोक
सहस्रचंद्रदर्शन सोहळा थाटामाटात...
आतल्या आमावस्यांचा अंधार
निमुट सोसलेला असतो
ज्याचा त्यानं
हे माहित असतं फक्त
माघारी परतलेल्या लाटांनाच..!
***
आसावरी काकडे

२८ मे २०१६
कविता रती दि अंक)

Tuesday, 24 May 2016

शब्दांचा आरसा


शब्दांचा आरसा अद्भुत असा की
पार्‍याची झिलई दोन्हीकडे..!

संकेत-वारसा पाठी सांभाळून
संस्कारांची खूण ठेवी पुढे

दाखवतो बिंबे कधी विस्तारून
कधी उसवून खोलातली..!

लिहिताना होई स्वरूप-दर्शन
लाभे आत्मभान लिहित्याला

आस्वादकालाही अक्षरांमधून
स्वरूपाची धून गवसते

बाह्य रंग रूप दावतोच पण
आतलीही वीण उलगडे..!

स्वरूप-दर्शन घडे डोळसाला
तसेच अंधाला उणे नाही

प्रत्येकाजवळ शब्दांचा आरसा
‘पाहण्याचा’ वसा सोपा नाही..!

***

आसावरी काकडे

२४ मे २०१६

Friday, 20 May 2016

तरीही..


दर क्षणाला पडत राहतात
नवनवीन पोस्टस
आणि जुन्या दिसेनाशा होतात
मोबाइल स्क्रीनवरून
वर वर सरकत
जाऊन बसतात ‘ओल्डर’ घरात

क्वचित कधी
टक टक होते दारावर
आणलं जातं कौतुकानं त्यांना
उजेडाच्या स्क्रीनवर..
पण काम होताच लगेच मिटतं दार
त्या पुन्हा पडून राहतात अंधारात
अधांतरी.. तळ्यात-मळ्यात
काही काळ

आणि ‘क्लिअर चॅट’वर टच होताच
अनंतात विलीन होऊन जातात
पुन्हा कधीही न दिसण्यासाठी..!

चिमुटभर राखही उरत नाही मागे
हजारो लाइक्स...
शेकडो कॉमेंटस मिळालेल्या
कोणत्याही पोस्टची..
संपूर्ण ब्रह्मांडाचे सचित्र दर्शन
तिने घडवलेले असले
तरीही..!

***
आसावरी काकडे
१९ मे २०१६

Thursday, 19 May 2016

प्रत्येक जिवाचे एक ऋतुचक्र


सर्प सांभाळती विष उदरात
दाह सोसतात अंतरंगी

पोळणे पिकता त्वचा निखळते
कात टाकुनी ते होती नवे

पुन्हा नवा दाह नवी सळसळ
जगण्याची कळ पुन्हा नवी

प्रत्येक जिवाचे एक ऋतुचक्र
त्वचेखाली सत्र चालू राही

सारे नियोजन असे जन्मजात
मृत्यू टाके कात आयुष्याची..!

***

आसावरी काकडे
१८ मे २०१६

Monday, 16 May 2016

‘माझा’ शब्द हवा


एक दुःख ताजे एक मुरलेले
एक हरलेले सारे डाव

एक लोकमान्य एक कोंडलेले
एक सांडलेले रस्त्यावर

एक पोरकेसे नाव नसलेले
एक फसलेले नावामध्ये

एक शरीराचे एक काळजाचे
एक समाजाचे विश्वव्यापी

परोपरीने हे दुःख विलसते
कोणाचे कोणते जाणे जो तो..!

पण सांगायला ‘माझा’ शब्द हवा
कसा हाती यावा गाभ्यातून..?
***

आसावरी काकडे
१६ मे २०१६