Wednesday, 26 April 2017

बूट म्हणे..

हरवली जोडी  एकटा उरलो
निकामी ठरलो  बूट म्हणे...

जोडी होती तेव्हा  काय शान होती
केवढी ती मस्ती  चालण्यात

सदा मागे पुढे  जरी चालताना
घरी असताना  गळाभेट

मॉलमध्ये तर  अशी सजावट
जणू मखरात  मूर्ती कुणी

पण अचानक  हरवता जोडी
सोलली कातडी  आठवली

सोलणारे हात  हात शिवणारे
घाम गाळणारे  अंधारात..

दुःख भोगताना  कासाविस प्राण
तेव्हा येई भान  दुःखितांचे..!
***
आसावरी काकडे
२६.४.२०१७

Sunday, 23 April 2017

एक दीर्घ निःश्वास तिथे ठेवून

त्यानं
केव्हापासून बंद असलेल्या
ग्रंथालयाची कुलुपं काढली
आतल्या पुस्तकांवरची
वातानुकुलित धूळ झटकली

पुस्तकांना सोडवलं
रांगांच्या कैदेतून,
मुखपृष्ठांच्या चकचकीत वेष्टनांमधून..!

लेखक..प्रकाशक..प्रस्तावना..ब्लर्बच्या
ताफ्यामधून
बाजूला काढला अलगद
मधला मजकूर

मग संहितेमधून सोडवले परिच्छेद
परिच्छेदांमधून मुक्त केली वाक्यं
वाक्यांमधून सुटे करून वेगळे काढले शब्द..

अलगद उतरवली
त्यांच्यावर जमा झालेली आवरणं
आणि बारदानात भरून
घेऊन गेला उंच डोंगरावर

एकमेकांवर घासून घासून
टरफलं निघाली शब्दांची
आतल्या आत...
त्यानं ओतलं.. रिकामं केलं बारदान

बघता बघता
टरफलं उडून गेली दूर वार्‍यावर
आणि
केव्हापासून कशाकशात अडकलेलं
शब्दाकाश मुक्त झालं..!

एक दीर्घ निःश्वास तिथे ठेवून
तो माघारा वळला..!
***
आसावरी काकडे
२३.४.२०१७

Saturday, 22 April 2017

थांबव हा मुरलीरव

थांबव हा मुरलीरव
साद अशी घालु नको
विरहाचे दुःख निळे
पुन्हा पुन्हा देउ नको..

निर्गुण तू पार्थिव मी
ओळखले ऐल पैल
आठवात भिजलेली
राहूदे मज सचैल

भेटीची आस जुनी
रुजवलीय आत प्रिया
येइल रे उमलुन ती
नीलकमल होउनिया

त्यात तूच असशिल ना
विरहाचे भय न मला
पण नकोच मुरलीरव
सगुणाचा ध्यास खुळा..!
***
आसावरी काकडे
२२.४.२०१७

Wednesday, 19 April 2017

तो कैक योजने..

तो कैक योजने दूर तळपतो तेथे
अन अर्घ्य तयाला आम्ही देतो येथे
पोचते काय ते? प्रश्न कुणाला पडतो
त्या काव्यामधले ओज कुणी ओळखतो..!
***

तो कैक योजने दूर तळपतो तेथे
अन सूर्यफूल डौलात डोलते येथे
तो तप्तगोल हे रंग तयाचा लेते
दोघांत नाकळे असे कोणते नाते..!
***

तो कैक योजने दूर तळपतो तेथे
अन उदयास्ताचा खेळ रंगतो येथे
ही भ्रमते पृथ्वी गमे तोच मावळतो
होताच मान वर गमते तोच उगवतो..!
***
आसावरी काकडे
२०.४.२०१७

पडून असते बीज

जमिनीखालच्या ओल्या अंधारात
पडून असते बीज
अनिमिष वाट पाहात..

अचानक उकलते
निरगाठ
उजेड घुसतो आत
बीज छेदत होतो आरपार
आणि
त्याचे सत्व घेऊन
पडतो बाहेर कोंभ बनून..!

स्वतःतून फुटून
बाहेर पडता येण्याच्या
त्या एका क्षणासाठी
पडून असते बीज
जमिनीखाली
जतन करत
आतली वीज..!
***
आसावरी काकडे
१८.४.२.०१७

Saturday, 15 April 2017

एकांत

( भूपतीवैभव )

एकांत शोधण्या गेला दूर वनात
पण सारे गुंते तसेच खोल मनात
हिंडतो घेउनी सवे पिंजरा वेडा
अन म्हणत रहातो मजला सोडा सोडा
***

रे बंद करा रे दार उघडले कोणी
एकांत हवा तर नको यावया कोणी
बाहेरुन सारे बंद करत तो गेला
मग दान अनाहुत पडले त्याच्या द्रोणी..!
***

एकांत कुणाचा नका हिरावू केव्हा
देवाशी बोलत असतो रे तो तेव्हा
तो भोगत असतो एकांताचे देणे
घडलेले असते एक स्वयंभू लेणे..!
***
आसावरी काकडे
१५.४.२०१७

Friday, 14 April 2017

ओतप्रोत फक्त देहभान..!

शेंदून घेतले आशयाचे पाणी
ऐकली विराणी ज्ञानेशाची

तरी आजवर काही न साधले
कोरडे राहिले शब्दज्ञान

घिरट्या घालून मंद झाला श्वास
टक्क जागा ध्यास जगण्याचा

अखंड उपसा चालला प्राणाचा
आलेख जिण्याचा खालावला

तरी ओहोटी ना विकार-सागरा
पार्थिव निवारा खरा वाटे

'गंध जाई दूर फूल उरे मागे
देठामध्ये जागे आत्मभान'

असा भक्त होणे किती दुरापास्त
ओतप्रोत फक्त देहभान..!
***
आसावरी काकडे
१४.४.२०१७

स्थायी न काहि येथे

वैराण भोवताली
सारे असे परंतू
नाही मनात त्याच्या
आता मुळीच किंतू

त्याला पुरे कळाले
स्थायी न काहि येथे
बहरेल ना उद्याला
वैराण आज जे ते?

इतुके विराट विश्व
बदले क्षणाक्षणाला
गेले घडून काल
येणार ना उद्याला

हातात या क्षणी जे
भोगून घेइ पुरते
चलचित्र धावणारे
सगळे क्षणात विरते..!
***
आसावरी काकडे
१३.४.२०१७

रस्ते

रस्त्यांना नसती दिशा न कुठला मुक्काम गाठावया
ते खाली असतात केवळ तुम्हा आधार की द्यावया

लाखो लोक प्रवास रोज करती त्यांच्यावरूनी किती
त्यांना भान नसे मुळीच अवघे वेड्यापरी धावती

खाली ते असती पडून नुसते कोणास सांगायचे
खोदा वा उखडा निमूट सगळे जाणून सोसायचे

जेव्हा वर्दळ हो अनावर कुणी खोदून ने खालती
किंवा बांधुन खांब त्यांस वरती टांगून की ठेवती

झाडांचा सहवास दूर करुनी त्या एकटे पाडतो
स्वार्थी माणुस हा किती पदतळी त्यांना असे डांबतो..!
***
आसावरी काकडे
१२.४.२०१७

Wednesday, 12 April 2017

ओझे या प्रश्नांचे..!

अविश्रांत चालला प्रवासी
स्वजन राहिले दूर
केली क्षितिजे पार परंतू
गवसलाच ना सूर

जन्मापासुन पायपीट ही
जुन्याच प्रश्नांसाठी
उत्तर म्हणुनी होत राहती
नव प्रश्नांच्या भेटी

जन्म हवा का? विचारले ना
दिले ढकलुनी देही
पार्थिवामधे भरून जाणिव
प्रश्न पेरले काही

कुठून आला कुठे निघाला
नाव कुणाला ‘मी’चे
अनाहूत जन्माला झाले
ओझे या प्रश्नांचे..!
***
आसावरी काकडे
११.४.२०१७

Monday, 10 April 2017

सुवर्ण झुंबर

नवा मुलामा नव बहराचा
खोड खालती तसेच आहे
सुवर्ण झुंबर हृदयामध्ये
नवीन ऊर्जा पेरत आहे

किती आजवर फांद्यांनी या
सृजनाचे सुख तना माखले
पानगळीची गुटी पाजुनी
असणे वैभवशाली केले

किती ऋतुंचे बहर कोरले
बुंध्यामध्ये माहित नाही
किती खोलवर मुळे पसरली
तहानेसही ठाउक नाही

प्राणवायुचे देणे जोवर
तोवर सळसळ करतिल पाने
झाडावरती रोज येउनी
पक्षी गातिल सुरेल गाणे
***
आसावरी काकडे
९.४.२०१७

Friday, 7 April 2017

देव-भक्त नाते

(ज्ञा. उपमा १७)

विश्वाच्या मंदिरी त्याची प्रतिकृती
सोहं ही प्रचिती नाही तिला

प्रतिकृतीमध्ये असे पूर्ण विश्व
शब्दामधे भाव असे जसा

विस्तार वडाचा असे बीजामध्ये
आणि वडामध्ये वसे बीज

पण त्याचे भान बीजाला नसते
पडून असते स्वतःमध्ये

मनुष्य-रूपात घेई अवतार
सगूण ईश्वर भक्तांसाठी

बीजरूप भक्ता सोहंज्ञान होते
वटवृक्ष होते एखादेच

बीजाला दिसतो स्वरूप विस्तार
स्वतःच्या बाहेर वृक्षरूपी

देव-भक्त नाते एकमेकी लीन
जरी रुपे दोन दिसतात..!
***
आसावरी काकडे

७.४.२०१७

भागू नयेच तहान

भागू नयेच तहान
जन्म वेटाळावा तिने
घरी-दारी रुणझुण
तिची वाजावी पैंजणे

आहे अनेकधा सृष्टी
तिचे अपार लावण्य
भोगावया पंचेंद्रिये
त्यांची तहान नगण्य

विश्वपसार्‍याएवढी
माझी तहान वाढूदे
भोगायचे बळ किती
आहे अपुरे कळूदे

तृप्ती होईल वा नाही
असो तहान विशाल
तीच फिरवून जिवा
ऐलपैल दाखवेल..!
***
आसावरी काकडे

६.४.२०१७

काय असते तहान?

काय असते तहान
किनार्‍याला विचारावे
त्याचे कठोर प्राक्तन
कुणा कसे उमगावे?

पाणी अथांग समोर
कसे उतरावे त्यात
पाठ फिरवून दूर
कुठे नाही जाता येत

सार्‍या इच्छांचा समुद्र
आत कोंडून घ्यायचा
आणि पाहायचा फक्त
खेळ दोन्ही समुद्रांचा

काय असते तहान
किनार्‍यालाच कळावे
असे प्राक्तन कुणाच्या
कधी वाट्याला न यावे..!
***
आसावरी काकडे

६.४.२०१७

निघून जावे

वाळूवरती इमले रचुनी निघून जावे
श्वासांवरती कविता लिहुनी निघून जावे

हरितद्रव्य आतले संपुनी होता पिवळे
पानफुटीला छिद्र ठेवुनी निघून जावे

क्षणाक्षणाला ज्योत बदलते निरांजनाची
विझता विझता तूप घालुनी निघून जावे

रेंगाळावे उगा कशाला गाडीमध्ये
आल्यावरती गाव, उतरुनी निघून जावे

शहरांमध्ये झगमगाट पण दिपती डोळे
उजेड गावा जरा देउनी निघून जावे

रंगांचा कल्लोळ माजला चित्रामध्ये
चित्रावरची सही पाहुनी निघून जावे
***
आसावरी काकडे
५.४.२०१७

मुक्तके

पिवळ्या पानांकडेच जाते लक्ष अताशा
हसता हसता ओठी ये मरणाची भाषा
येइल तेव्हा येउदेत त्या कोण थांबवी
तोवर जीवा गोंजारावे लावुन आशा
***

पीस क्षुद्रसे फुंकेनेही उडून जाते
कुणा न कळते अवचित काही का कोसळते
कुठे शिंकते माशी इकडे कार्य नासते
क्षुद्र असे या विश्वामध्ये काही नसते
***

किती बायका येती रमती पाणवठ्यावर
कामांसोबत गप्पा होती पाणवठ्यावर
एक समांतर घरकुल असते बिनभिंतींचे
माहेराची सुखे भेटती पाणवठ्यावर..!
**
आसावरी काकडे
४.४.२०१७

Tuesday, 4 April 2017

मुक्तके (साकी वृत्त)


डोळ्यांमध्ये भूक भय किती एकलीच दारात
कुलुपबंद खोपटे उदासिन प्रतिक्षाच नजरेत

गळ्यात उसनी माळ तुझ्या अन पायी नाजुक चाळ
तुला न ठाउक माय राबते पोटी घेउन जाळ
***

ओलेत्या तव देहावरती थेंब-फुलांच्या माळा
मेघ भिजवुनी गेला की तो कृष्णच होता काळा

कसे साहशील ओलेपण हे त्याच्या स्पर्शासाठी
डोकावुन बघ तुझ्याच हृदयी असेल तो जगजेठी
***
आसावरी काकडे

४.४.२०१७ 

Sunday, 2 April 2017

मुक्तके (पृथ्वी वृत्त)

तहान कुणि ओतली मनतळी अशी साचली
कुणी न शमवी मुळी झळ तिची सुखे साहिली

तिच्याच समिधा तिला बिलगुनी असे राहती
पुरे न मनकामना मृगजळी तरी नाहती..!
***

निरंजन जरी वसे सगुणरूप देहामधे
विलक्षण किती तृषा सहज त्यास ओलांडते

चिरंतन तरी हरे दरक्षणी फसे तो कसा
नवीन वसने नवा सलग जन्म नी लालसा..!
***

पुढे ढकलुनी असे मरण काय साधायचे?
उगाच तन लिंपुनी झुरत काय थांबायचे?

सुकून गळली फुले सहज पाहुनी हासली
हिशोब चुकता करा खत बना म्हणू लागली..!
***
आसावरी काकडे
२.४.२०१७

पर्णकाफिला

संपली पानगळ पानफुटी अवतरली
पण पांनांआधी फुलेच बहरुन आली
डौलात उभे हे झाड माळुनी गजरे
पानांची आतुन लगबग चालू झाली..!

मग तहान शोधे बिंदू बुंध्यामधला
डोकावे ज्यातुन हिरवा प्रकाश ओला
आतल्या तमाने मार्ग मोकळा करता
तो पर्ण काफिला चैत्रपालवी झाला..!
***
आसावरी काकडे
१.४.२०१७

तेवढे देवपण कळले

तो सगूण रूपा अखंड पूजित होता
पण पाषाणाचा भाव कोरडा होता
मग विवेक त्याचा आत पेटुनी उठला
त्या संघर्षाग्नित देव जळूनी गेला

संपले सान्तपण अनन्त अवगत झाले
जेवढा पसारा देव तेवढा, कळले
लाखात असा तो एकच जन्मा येतो
जो देव होउनी माणसात वावरतो..!
***
आसावरी काकडे
३१.३.२०१७