क्षणा-कणाने विलीन होते
अनंतामध्ये असणे इथले
या असण्यातच पुन्हा जन्मते
क्षणा-कणाने असणे इथले
ये जा त्याची पाहत बसतो
जीव मुशाफिर सागर-तीरी
'ये-जा'मधल्या संधिक्षणाला
बहाल करतो असणे इथले..!
*
आसावरी काकडे
२३.६.२०२१
नव्या पावालांनी । सजे पुन्हा भुई । भेटे नवी राई । नव्या जीवा ॥
क्षणा-कणाने विलीन होते
अनंतामध्ये असणे इथले
या असण्यातच पुन्हा जन्मते
क्षणा-कणाने असणे इथले
ये जा त्याची पाहत बसतो
जीव मुशाफिर सागर-तीरी
'ये-जा'मधल्या संधिक्षणाला
बहाल करतो असणे इथले..!
*
आसावरी काकडे
२३.६.२०२१
गात्रांच्या उंबरठ्यावर
लावीन रोज मी पणती
दारावर बांधुन तोरण
सजवीन मृण्मयी नाती
मी गाइन त्यांच्यासाठी
साजिरी गोजिरी गाणी
लागता स्वरांच्या दिवल्या
उजळेल आतली ग्लानी
गात्रातिल रात्र सरावी
जगण्याचा उत्सव व्हावा
शिव सुंदर जे जे त्याचा
जीवास वेध लागावा..
हा देह कुणी ना परका
सोबती जन्मजन्मीचा
'मी'रूप रहाया येते
शोधीत आसरा त्याचा
***
आसावरी काकडे
१६.६.२०२१
ही उलथापालथ तशी अचानक नाही
Talking in their sleep
सूप्तावस्थेतील संवाद
‘तुम्हाला वाटतं मी मृत झालोय’
सफरचंदाचं झाड म्हणालं,
कारण माझ्याजवळ एकही पान नाहीए दाखवायला
मी काहीसा झुकलोय
माझ्या फांद्या वाकल्यायत
माझ्या अंगावर सुस्त, निर्जीव शेवाळं पसरलंय
पण मी जिवंत आहे बुंध्यात.. कोंबात
येत्या मे महिन्यातल्या कळ्या
मी सध्या झाकून ठेवल्यायत..
पण मला कींव येते
माझ्या पायाशी पसरलेल्या वाळलेल्या गवताची’
‘तुला वाटतं मी मृत झालोय’
वाळलेलं गवत तत्परतेनं म्हणालं,
कारण देठ आणि पाती मला सोडून गेलीयत
पण मी आहे जमिनीखाली
भक्कम आणि सुरक्षित.
बर्फाची रजई पांघरलेली आहे वरून
पूर्ण जिवंत आहे मी आत
आणि नव्यानं उगवायला तयार आहे.
या वर्षीचा वसंत नृत्य करत येण्याचाच अवकाश आहे.
पण मला फांदीवरून गळून पडलेल्या,
देठ नसलेल्या या फुलाची दया येतेय’
‘तुला वाटतं मी मृत झालोय’
एक नाजुक आवाज बोलला,
‘कारण फांदी आणि मुळं नाहीएत माझ्या सोबतीला.
पण मी कधीच नाहीसा झालो नाही.
फक्त मी वार्यानं पेरलेल्या
मृदू मधूर बीजांमधे मला लपवून ठेवलंय.
आणि शिशिराच्या दीर्घ घटकांमधे
मी धीरानं वाट पाहातोय...
तुम्ही मला परत पाहाल
तेव्हा मी हसेन तुम्हाला
शेकडो फुलांच्या डोळ्यांमधून..!
***
मराठी अनुवाद : आसावरी काकडे
To paint the portrait of a bird
पक्ष्याचे चित्र रेखाटणे...
आधी एक पिंजरा
रंगवा
दार उघडं असलेला..
मग रंगवा
काहीतरी मोहक
काहीतरी साधं
काहीतरी सुंदर
काहीतरी उपयोगी
पक्ष्यासाठी..
मग कॅनव्हास
झाडाच्या समोर ठेवा
एखाद्या बागेत
रानात
किंवा जंगलात
झाडामागे दडून
बसा
आवाज न करता
हालचाल न करता
कधी पक्षी लगेच
येतो
पण कधी तो कैक
वर्षे घेतो
कधी यायचं ते
ठरवायला
पण धीर सोडू नका
वाट पहा
वर्षानुवर्षे, गरज पडली तर
पक्षी लगेच येणं
किंवा त्यानं वेळ घेणं
याचा चित्राशी
काही संबंध नाही
पक्षी आला तर, येईल तेव्हाच्या
निगूढ शांततेचं
निरीक्षण करा
पक्षी पिंजर्यात
प्रवेश करेपर्यंत वाट पाहात राहा
आणि जेव्हा तो आत
येईल
तेव्हा ब्रशनं
हळूच पिंजर्याचं दार लावून घ्या
पक्ष्याच्या
पिसाला धक्का न लागेल याची काळजी घेत
एकेक गज रंगवत जा
मग झाडाचं चित्र
रंगवा
पक्ष्यासाठी
सर्वात सुंदर फांद्यांची निवड करून..
मग हिरवळ रंगवा आणि
झुळझुळ वाराही वाहूदे
सूर्यप्रकाशातली
धूळ दिसूदे
उन्हाळ्यातल्या
कीटकांची गुणगुण उमटूदे
मग पक्षी
गाण्याचं मनावर घेईपर्यंत वाट पाहा
जर पक्षी गायला
नाही तर
ते अवलक्षण
चित्र चांगलं न
उतरल्याचं..
आणि जर तो गायला
तर ते शुभ लक्षण
चित्रावर सही
करायचा क्षण
तेव्हा अगदी
नाजूकपणानं पक्ष्याचं एक पीस काढा
आणि चित्राच्या
एका कोपर्यात आपलं नाव रेखा..!
**
मराठी भावानुवाद : आसावरी काकडे
Pursuit
of Truth is the end of Art . That may be equal to unison with God . Here bird
stands for divine knowledge
कलेतील
परिपूर्णता म्हणजे सत्याचा पाठपुरावा. तेच ईश्वराशी एकरूप होणं असेल. इथं तो पक्षी
म्हणजे ते सत्य... ईश्वरीय ज्ञान..!