Friday, 22 June 2018

...आहे काही

त्यांना सुद्धा सांगायाचे आहे काही
दुःखाखाली सुखासारखे आहे काही

झाडाने या किती भोगले बहर तरीही
बुंध्यामध्ये हिरमुसलेले आहे काही

बघता बघता कितीक स्वप्ने विरून गेली
तरी मनाला पहावयाचे आहे काही

काल विदेही धुके भेटले आणि उमगले
मुक्ततेतही भोगावेसे आहे काही

नैराश्याने ग्रासुन गेले गुरूच त्यांचे
प्रश्न पडावा असे यामधे आहे काही

ईश्वर म्हणुनी काही नसते म्हणती कोणी
त्या नसण्यातच कुणा वाटते आहे काही..!

आवरले सामान परंतू पाय निघेना
इथे अजूनी थांबावेसे आहे काही
***
आसावरी काकडे
२०.६.२०१८

Saturday, 24 March 2018

सुटला न दोर आहे


डोळ्यात भूक याच्या चारा समोर आहे
केव्हाच बांधलेला सुटला न दोर आहे..!

आला सुकाळ म्हणुनी ते नाचले परंतू
सत्यात काहि नाही चित्रात मोर आहे

'भिंती' असून उघडे सारे लुटे कुणीही
त्या फेसबूकचाही प्राणास घोर आहे

बाजार मुक्त त्यांचा काही कुठून घ्यावे
सर्वास सर्व दिसते अदृश्य चोर आहे

टाळ्या हव्यात त्यांना ते बोलती प्रभावी
आपापल्या मठातच प्रत्येक थोर आहे

ओसंडती दुकाने उपभोग खूप झाला
जगणे तरी रिकामे  आयुष्य बोर आहे..!
***
आसावरी काकडे
२३.३.२०१८

Wednesday, 21 March 2018

पालवी

वाकल्या खोडास फुटली पालवी
सुंदराचे भान देई पालवी

कोणतेही ऊन येवो कुठुनही
वेदनेतुन जन्म घेई पालवी

मृत्युने नेला पिता ओढून पण
पोकळी मधुनी उगवली पालवी

बीज सात्विक, जमिनही होती सुखी
कोण जाणे का न रमली पालवी

लागली की ओढ जगण्याची पुन्हा
अन जुन्या स्वप्नात आली पालवी..!
***
आसावरी काकडे
२१.३.२०१८

Saturday, 17 March 2018

कोणता सल


झाड केव्हाचे इथे हे स्तब्ध आहे
कोणता सल संयमी हृदयात आहे?

खूप काही साठलेले आत याच्या
केवढे संपृक्त नुसते पान आहे

कालच्या मातीत अस्सल स्वत्व होते
आजचे पण पीकही निःसत्व आहे

वाहणारे मॉल, इमले गगनचुंबी
ही सुबत्ता की अघोरी हाव आहे

माणसाने सोडला आहे किनारा
धावणे नावेस आता भाग आहे..!

पूर्ण झाले का चुकांचे शतक आता
कोवळ्या हाती सुदर्शन चक्र आहे..!
***
आसावरी काकडे
१५.३.२०१८

Wednesday, 7 February 2018

या रस्त्याने..

किती धावले या रस्त्याने
क्षितिज गाठले या रस्त्याने

वळणावरती वेग रोखुनी
घात टाळले या रस्त्याने

इथून गेले त्या प्रत्येका
वळण दावले या रस्त्याने

डोंगर खणुनी जन्मा येता
अश्रु ढाळले या रस्त्याने

मोडुन पडल्या झाडांचेही
शाप ऐकले या रस्त्याने

रोज धावती चाके त्यांचे
चरे झेलले या रस्त्याने

सारे जीवन उघड्यावरती
पणा लावले या रस्त्याने
***
आसावरी काकडे
७.२.२०१८

आज पाण्याच्या मनी काहूर नाही

फूल होणे का तुला मंजूर नाही?
उमल बाळे काळ इतका क्रूर नाही..!

हे खरे की भोवती आहे प्रदूषण
सत्व मातीचे मुळी कणसूर नाही..

दिसत नाही उगवलेला सूर्य अजुनी
शांत आहे दिवसही मग्रूर नाही..!

खूप लाटा उसळल्या अन शांत झाल्या
आज पाण्याच्या मनी काहूर नाही

कैक दिसती मंदिरे अन गोपुरे पण
जळत कोठे भक्तिचा कापूर नाही

माणसाची हाव तैसे माजता तण
नष्ट होणे पीक काही दूर नाही
***
आसावरी काकडे
३१.१.२०१८

Friday, 5 January 2018

उपाधी त्याच्याच

आकाश ‘ते’ नाही
नाही क्षितिजही
रस्ता, घाट.. काही
नाहीच ते

घर-दार नाती
गाड्या नि इमले
वृक्ष फळे फुले
हेही नाही

प्राणी पक्षी मासे
भाषा ग्रंथ ज्ञान
मानवी विज्ञान
तेही नाही

ग्रह तारे वायू
आकाशगंगाही
कृष्णविवरही
नाहीच ते

‘नेती नेती’ पण
आहे ते ते ‘ते’च
उपाधी त्याच्याच
असण्याच्या..!

***

आसावरी काकडे

१ सप्टे. २०१७