Wednesday, 4 May 2016

राहूदे छत्री घरातच..


चल
विसरलीय तर राहूदे छत्री घरातच
आतापर्यंत
कितीदा परतलोय तिच्यासाठी
आता पुरे

ऊन वारा पावसापासून
खूप झालं जपून कपड्यांना
आणि त्याच्या आतल्या शरीराला
हे जपताना
आकाश दुरावलं किती काळ
आलं का तुझ्या लक्षात?

चल, आता तरी मोकाळा श्वास घेऊ
मुक्त होऊ जपण्याच्या तगाद्यातून
पाऊस माखून घेऊ अंगाला
उन्हात करपून बघू
वार्‍यावर उडूदेत केस.. हेलपाटूदे शरीर..
थेट पाहू आकाशाकडे

चल, घाबरू नकोस
ऊन.. पाऊस.. विजेला
पायाखाली आहे ना जमीन
या पाचांनीच तर घडलोय आपण
यांना का घाबरायचं?

अडसर दूरच राहूदे छत्रीचा
अंतर मिटवत जाऊ हळूहळू
आतल्या आणि बाहेरच्या पाचांमधलं
आणि
महाभारतातल्या
महाप्रस्थानाच्या कथेतल्यासारखं
गुंफलेले हात सोडून
निःसंगपणे चालत राहू
जवळ.. आणखी जवळ जात
मिसळून जाऊ त्यांच्यात..!

चल
राहूदे छत्री घरातच..

***

आसावरी काकडे

४ मे २०१६

Sunday, 1 May 2016

एक विलक्षण संधीकाल


दिवस मावळलाय
रात्र उगवायचीय...

पूर ओसरलाय
ओहोटीला आरंभ नाही झालेला

अवशेष जागीच टाकून निघालेला पूर
मागे वळून बघतोय..
रात्र उगवण्याच्या क्षणाची चाहूल घेतेय..

मधे निवांत वाहतोय
एक विलक्षण संधीकाल
अंतर्मुख..
असे कितीदा येतात आणि जातात दोघं
आळीपाळीनं
तो आला की भरून जायचं आरपार
आणि ती येईपर्यंत मोकळं व्हायचं जिवापाड
अनुभवलंय त्यानं वर्षानुवर्षे..

पण आज या विलक्षण मध्यसंधीवर
अचानक दिसलं त्याला
भरती-ओहोटीशिवायचं
दिवस-रात्रविरहित
निखळ स्वतः असणं
आणि वाटून गेलं..

हेच असेल का ते निजरूप..?
***

आसावरी काकडे
२ मे २०१६

जन्मक्षणीच


जन्मक्षणीच
देहनामक एक पॅकेज मिळतं तुम्हाला
आणि त्यासोबत
तुमचा असा एक टाइमझोन
ज्यात राहून
तुम्ही समृद्ध करू बघता तो..
आपापल्या मगदुरानुसार

कर्तृत्व सिद्ध करता.. पदव्या मिळवता
मानमरातब कीर्ती संपत्ती
प्राप्त करता यश विविध क्षेत्रांत
तेव्हा तुम्ही गृहीत धरता शरीर
त्वचेआड जागच्याजागी वेळच्यावेळी
निर्माण होऊन उत्सर्जीत होणार्‍या द्रावांकडे
सहज करता दुर्लक्ष
तुच्छ लेखता त्यांना
त्यांचे उच्चारही अश्लील बीभत्स वाटतात तुम्हाला

जन्मक्षणीच परीक्षेसाठी नेमलेला
‘समग्र अस्तित्व’ हा विषय
पार विसरून जाता तुम्ही
पण शरीराला बसावंच लागतं या परीक्षेला
कधी ना कधी
तेव्हा कळतं महत्त्व
प्रत्येक श्वासाचं.. एकेका हलचालीचं..
एरव्ही क्षुल्लक वाटणार्‍या
आतल्या सूक्ष्म घडामोडींचं..

परीक्षा सुरू झाली की गरजेनुसार
नेमलेल्या यंत्रांमधे घातले जातात
शरीरातले एकेक द्राव
एकेक अवयव
किंवा अख्खं शरीरच..!
तेव्हा यंत्रं तुम्ही केलेल्या
शरीराच्या अपमानाचा बदला घेत
निर्घृण दुर्लक्ष करतात
तुम्ही कमावलेल्या तुमच्या कर्तृत्वाकडे
त्यांच्या लेखी नगण्य असतं
तुम्ही गायक चित्रकार कवी असणं
गौण असतात जात धर्म राष्ट्रियत्वाची बिरुदं
तुम्ही असता केवळ
तुमच्या नावाचं लेबल असलेलं एक शरीर..

यंत्रांच्या मायक्रोस्कोपिक नजरेलाही
दिसत नाही रक्तातला त्वेष.. आवेश
हाडांमधला द्वेष.. मत्सर
हृदयातलं प्रेम.. करुणा
मेंदूतली विद्वत्ता.. विवेक
किंवा
शरीराच्या कानाकोपर्‍याला लगडलेली जिजीविषा

त्यांना कळतात फक्त पार्थीव तपशील
तटस्थपणे ती टिपतात
अवयवांची आरपार छायाचित्रं
आखतात आलेख उसळणार्‍या रक्ताचा
काढतात व्हिडिओ हृदयाच्या स्पंदनांचा
मोजतात वेग रंग गुण विविध द्रावांचे

आणि ठेवतात तुमच्यासमोर
तुमच्या मार्कांची यादी.. तुमची कुंडली
जिच्या कुठल्याही घरातून
डोकावत नाही
जगण्याला कवटाळून बसलेलं तुमचं मन..!

***

आसावरी काकडे

३० एप्रिल २०१६ 

Saturday, 30 April 2016

व्हावं एक गर्द सावली..


लाल फुलांनी पूर्ण बहरलेल्या
पक्व गुलमोहरासारखे पसरलेले ठेवावेत
आपण आपले बाहू सदैव

काय सांगता येतं
दूर कुणी उभं असेल कड्यावर
स्वतःला ढकलून देण्याच्या टोकावर..
दुरून दिसेल त्याला अंधुक आधार
बुडणार्‍याला किनारा दिसावा तसा..
आधाराच्या दर्शनानंच
मागं फिरेल तो
परतेल स्वतःत सुखरूप..!

जमिनीवर गालिचा रेखत
विखरून पडलेल्या त्याच्या फुलांसारखं
आपण अंथरून ठेवावं आपलं मन
काय सांगता येतं
कोसळण्याचा क्षण कधी येईल
आणि झेलायला नसेल कुणी आसपास
तेव्हा तेच
अलगद सावरेल आपल्याला वरच्यावर..

सदैव सज्ज असावं आपण
उन्हाच्या झळा सोसूनही
बहरणार्‍या गुलमोहरासारखं
व्हावं एक गर्द सावली
दुसर्‍यासाठी
आणि स्वतःसाठीही..!!
***
आसावरी काकडे

३० एप्रिल २०१६ 

सदा असे तान्हा


ऐल पैल भाषा बोलतात तीर
मधे समांतर वाहे नदी

कधी खळाळत कधी संथ शांत
खोलात आकांत असे कधी

मिळेल ती वाट आपली म्हणते
वाहात राहाते काळासवे

भूत भविष्याची तमा नाही तिला
तिच्या सोबतीला वर्तमान

नित्य नवा जन्म तीच नसे पुन्हा
सदा असे तान्हा ओघ तिचा..!

***
आसावरी काकडे

३० एप्रिल २०१६

शब्द मिळेल शहाणा..!


कोण काठीला गाजर
बांधुनिया धावविते
धावण्याचे श्रेय सारे
उगा गाजराला जाते

पावलांना अमिषसे
कधी लागते गाजर
पण व्हावा आवेगांचा
नित्य आतून जागर

हळुहळु विसरावी
बाह्य प्रेरणांची साद
खोल जाऊन शोधावा
स्वत्व असलेला शब्द

तप असते कविता
कुणी म्हणे असे वीज
कसे कागदी शब्दांना
सोसेल हे तप्त बीज?

सारा दाह सोसणारी
व्हावे लागते जमीन
अंकुरांच्या जन्मासाठी
लागे फुटावे आतून

जन्म बाईचा लाभला
नाही अनोळखी वेणा
सोस त्याच कळा जरा
शब्द मिळेल शहाणा..!

***

२८ एप्रिल २०१६

Wednesday, 27 April 2016

कोकिळेच्या कूजनात


कोकिळेच्या कूजनात
कधी माधुर्य हसते
लपलेली आर्तताही
कधी कधी उसासते

किती पाने खत झाली
वसंताच्या स्वागताला
आठवे का आधेमधे
गाताना हे कोकिळेला?

पक्षी राईचे होऊन
बहरही भोगतात
तिच्या कुशीत शिरून
पानगळ स्मरतात

पक्षी राई भुई नभ
एकमेकांच्या भानात
श्रेष्ठ माणसे परंतू
त्वचेआड जगतात..!

***
२७ एप्रिल २०१६