Thursday, 11 February 2021

तुम्हाला माहिती असो नसो...

 

तुम्हाला माहिती असो नसो

तुमची इच्छा असो नसो

तुमच्याकडे कौशल्य असो नसो..

 

तुम्ही एका महाशिल्पाच्या निर्मिती-प्रक्रियेत

समाविष्ट केले गेलेले असता

 

तुम्ही शिल्पाच्या दगडातला एक कण असाल

किंवा छिन्नीचा अंश असाल

किंवा घडवणार्‍या हातातल्या

सर्जनकळांचे साक्षी

 

शिल्पाच्या निर्मिती-प्रक्रियेत

काढून टाकलेल्या दगडाच्या चुर्‍यात असाल तुम्ही

किंवा शिल्पाच्या डोळ्यातले भाव

दाखवणार्‍या कणात विराजमान असाल

 

कुठेही असलात तरी तुम्ही

त्या महाप्रक्रियेचा एक अविभाज्य भाग असता

स्वतःची गती नसलेल्या रेल्वेतील प्रवाशासारखे

प्रक्रियेच्या गतीबरोबर निमुट धावत असता

 

उत्पत्ती-स्थिती-लयाच्या आवर्तनातून

अखंड फिरत असते शिल्प

आणि 

तुम्हाला माहिती असो नसो

तुमची इच्छा असो नसो

तुमच्याकडे कौशल्य असो नसो

त्याच्या निर्मिती-प्रक्रियेतली

वाट्याला आलेली भूमिका

आजन्म निभावत असता तुम्ही...!


***

आसावरी काकडे

१२ २ २०२१


Sunday, 20 September 2020

चैतन्याची कळी

चैतन्याची कळी निथळते आहे
चैतन्यच पाहे सर्व ठायी ।

देहभान येता उमलू लागली
पूर्ण फूल झाली हळूहळू ।

उमटली नक्षी रंग उजळला
जीव सुखावला आत्मरंगी ।

देह गोळा केला पूर्णत्व भोगून
पाठ फिरवून निघाली ती ।

तिच्यामागे तिचा डोकावतो अंश
जीवनाचा वंश चालू राही..!

***
आसावरी काकडे

Saturday, 15 August 2020

माहित नाही...


माहित नाही कुठले पाणी
वाफ होउनी वरती गेले
आकाशाचे बिंब लेउनी
माझ्यासाठी खाली आले

कुणी सोसते ताप उन्हाचा
त्यातुन नकळत जन्मे पाणी
शुभ शकुनांचे दरवळणारे
पाउस-वैभव भोगे कोणी..!

कुणी न येथे असे एकटे
अखंड एकच आहे सारे
देहांचे आकार वेगळे
झाडे मुंगी माणुस तारे

अशा आतल्या एकपणाचे
रोज सकाळी स्मरण करावे
क्षणभर सोडुन कोष अहंचा
'सोहं'च्या ध्यानात स्थिरावे..!
***
आसावरी काकडे

Sunday, 22 September 2019

...नकोसा वाटतो


कोणताही बंध आता मज नकोसा वाटतो
सांजवेळी रडवणारा स्वर नकोसा वाटतो

अडकलेल्या पाखराला मोकळे सोडून द्या
पंख मिटल्या सानुल्याचा छळ नकोसा वाटतो

अक्षरांना जोडणारा शब्द तू देशीलही
स्पर्श त्याचा भावनांना पण नकोसा वाटतो

वेचले तारुण्य सारे माधवीने त्या युगी
अस्मितेला आजच्या तो वर नकोसा वाटतो

बरसतो तो एवढा की ध्वस्तता ओशाळते
गंधही ओला मृगाचा मग नकोसा वाटतो..!

आत्मरंगी रंगले मन भोवताली स्तब्धता
स्वस्थतेला डहुळणारा रव नकोसा वाटतो
***
आसावरी काकडे
२२.९.२०१९

Wednesday, 1 May 2019

म्हणूनच..


कागद सहनशील असतात
आणि लेखणी आज्ञाधारक..
म्हणूनच
क्षणोक्षणी मनात धिंगाणा घालणारे
भावनांचे थैमान
विचारांचे काहूर
प्रश्नांचा गुंता
आणि कारण सापडत नसलेली
अस्वस्थता..
यांचे ओझे उतरवत राहते मी कागदावर
शब्दात साकारत जाते हे सारे
तसतशी मला मी सापडत राहाते..!

शब्दांना तर वरदानच असते
अखंड कौमार्याचे
कुणीही कितीही वापरले तरी
राहतात ते कोरे.. ताजे टवटवीत

म्हणूनच
अनाकलनीयतेच्या वादळात हरवायला होतं
कासावीस होतो जीव
त्या प्रत्येक वेळी मी साद घालते त्यांना
आणि ते धावून येतात होकायंत्र बनून..!
***
आसावरी काकडे
३०.४.२०१९

Tuesday, 2 April 2019

अज्ञाताच्या हाका

आले आले विमान पण ते
गेले दिसण्यापूर्वी
प्रकाशरेखा टिपुन घेतली
नभात विरण्यापूर्वी..!

स्पर्श कुणाचा झाला नकळे
फुलले अंगोपांगी
आणि माळला मीच आपला
गजरा सुकण्यापूर्वी

कवितेला येतात कोठुनी
अज्ञाताच्या हाका
निःशब्दाच्या गुहेत शिरती
काही कळण्यापूर्वी

ज्योत दिव्याची तेवत असते
तोवर मंत्र म्हणावे
प्राशुन घ्यावे तेज त्यांतले
आशय विझण्यापूर्वी

गाढ तमाच्या गर्द रात्रिला
स्वप्ने सोबत करती
गूज तयांचे जाणुन घ्यावे
नेत्र उघडण्यापूर्वी

अढी घातली आहे नुकती
फळांस झाली घाई
जणू शब्द, जे मौन सोडती
काही सुचण्यापूर्वी

***
आसावरी काकडे
2.4.2019

Sunday, 3 March 2019

गळून पडल्यावरती


किती देखणा बंध मिळाला
गळून पडल्यावरती
हवाहवासा सुखांत दिसला
गळून पडल्यावरती

बीज सानुले होते तेव्हा
निजले जमिनीखाली
परत जायचे तिथेच त्याला
गळून पडल्यावरती

जलाशयाच्या स्तब्धतेतही
तरंग उठले होते
नेत्रकडांना थांग लागला
गळून पडल्यावरती

बहराचीही तमा न केली
वसंत होता तेव्हा
फुलण्यामधला कैफ उमगला
गळून पडल्यावरती

सूर्य येइतो करीन सोबत
चंद्र म्हणाला होता
स्मरले एकाकी शिशिराला
गळून पडल्यावरती

ग्रहण ग्रासते बिंबाला पण
तेज अबाधित असते
देह न झाके चैतन्याला
गळून पडल्यावरती
***
आसावरी काकडे
२२.१.२०१९