Sunday, 12 February 2017

अनोखेच नाते

सारे एकाकार  गाढ अंधारात
दिवसाची रात  होते तेव्हा

उजाडता सारे  आकार जागती
अस्तित्व जपती  आपापले

उजेड पेरतो  स्वत्व वस्तूंमध्ये
चराचरामध्ये  नाम-रूपे

फोफावत जाते  अस्तित्वांचे रान
येतसे उधाण  उजेडाला

ओसरत जाते  उसळती लाट
दिवसाची रात  होई पुन्हा

तमाच्या कुशीत  मिटून आकार
पुन्हा चराचर  झोपी जाई

अनोखेच नाते  विश्वाचे तमाशी
असे उजेडाशी  वेगळेच..!
***
आसावरी काकडे
११.२.२०१७

Saturday, 11 February 2017

लकाकते काही..

लकाकते काही
विरतही नाही
ठरतही नाही
मनामध्ये

खोल तळातले
उसळत नाही
मावळत नाही
मनामध्ये

कवितेचा मेघ
ओसरत नाही
झरतही नाही
मनामध्ये

दिसलेसे होते
मिटतही नाही
उमटत नाही
कवितेत..!
***
आसावरी काकडे
१०.२.२०१७

Wednesday, 8 February 2017

अटळ..

रेशीम-किड्यांना मारुन रेशिम बनते
कुस्करुनी सुमने अत्तर ते घमघमते
सौंदर्य-निर्मिती अटळ विनाशामधुनी
या वृक्षासाठी कोण कोण खत होते..!
***

आक्रमणे होती पोटातुन भीतीच्या
अन भीती उपजे मोहातुन स्वार्थाच्या
भावना गुंतल्या अशा एकमेकीत
हा दिवस जन्मतो गूढातुन रात्रीच्या
***

फुत्कार विषारी सोडुन अंगावरती
ती क्रूर श्वापदे दहशत पेरुन जाती
क्रूरता न केवळ युद्धभूमीवर दिसते
बघणारी भीती तिचे लेकरू असते
***

आसावरी काकडे
८.२.२०१७

Sunday, 5 February 2017

एकलेपणाला वाटले आतून

(ज्ञानेश्वरी उपमा ८)

एकलेपणाला  वाटले आतून
अनेक होऊन  व्यक्त व्हावे

एकलेच बीज  गच्च कोंदाटले
अनेकत्व ल्याले  उगवून

प्रसवल्या भाषा  एकाक्षरातून
आशयामागून  निघाल्या त्या

कोट्यावधी जीव  एका पेशीतून
एका थेंबातून  सप्तसिंधू

स्वेच्छेनेच त्याने  सारे निर्मियेले
वेगळे काढले  स्वतःतून

प्रत्येका वेगळे  नाम रूप दिले
स्वत्व देऊ केले  ज्याचे त्याला

आणि आता म्हणे  अनेकत्व खोटे
एकत्व गोमटे  सत्य आहे

असूदेत एक  तरंग नि पाणी
सोने आणि लेणी  असो एक

वेगळेपणाने भेटू पुन्हा पुन्हा
सोबत निर्गुणा  असूदेना..!
***
आसावरी काकडे
३.२.२०१७

शेवटी जाण येते..!

रडत बुडत जो तो
हात मागे तराया
सकल विकल येथे
कोण ये सावराया

खळबळ अति आहे
भोवती माजलेली
निवविल कळ ऐसा
कोण ना येथ वाली

दरवळ जरि येथे
गंध कोठे दिसेना
दहशत कसली ही
वाटते या फुलांना

बिलगुन मन राही
देहभावास नित्य
इकडुन तिकडे त्या
येरझाऱ्याच फक्त

जवळ जवळ जाता
शून्य हातात येते
अन मृगजळ सारे
शेवटी जाण येते..!
***
आसावरी काकडे
२.२.२०१७

Thursday, 2 February 2017

read more चे ब्रेक

जगण्याचं वर्तूळ
आक्रसत चाललंय..

कोऱ्या डायऱ्या
सदासज्ज laptop
शब्दकोश.. संदर्भ ग्रंथ.. पुस्तकांनी
गच्च भरलेली शेल्फस..
सगळं एका मोबाईल मधे
जाऊन बसलंय..

जगण्याचं वर्तूळ
आक्रसत चाललंय..
विश्व.. जग.. देश.. आक्रसत
'मी'च्या डी पी मधे सामावलंय..!

त्यातून वर काढून
आपल्या जगण्याचं पुस्तक
वाचताना read more चे
ब्रेक पार करताना दमछाक होतेय

पण राहिलेला मजकूर डिलीट
करण्याची सोय नाहीए..
लिहिणाराची सही दिसेपर्यंत
वाचत राहायचंय..

जगण्याचं वर्तूळ
कितीही आक्रसलं तरी
त्यातून सुटका नाही..!
***
आसावरी काकडे
१.२.२०१७

Wednesday, 1 February 2017

झाडं जखडलेली असतात..

झाडं जखडलेली असतात
जमिनीशी..
निमुट सोसत राहतात
पक्ष्या-प्रण्यांचा अंगावरचा
मनसोक्त वावर
निसर्गाची मनमानी
माणसांचे प्रेम.. अत्याचार

वाटलं तरी
धावून जाता येत नाही त्यांना
कुणाच्या अंगावर..
कुणाला जवळ घेता येत नाही..

त्यांना व्यक्त करता येत नाही
आतून उमलण्याचा आनंद
की कृतघ्न घावांविषयीचा
अनावर संताप..

आतल्या आत साचत राहतात
भावनांचे उद्रेक
निबर खोडाला मग फुटतात डोळे
जागोजाग..

झाडांना बोलता आलं नाही
म्हणून काय झालं?
जागोजागी फुटलेले त्यांचे
डोळे बोलतात ना..!

ऋतूचक्रानुसार
प्रत्येक पान.. फूल.. फळ
उगवतं उत्कटतेनं
आणि
ऐकणाराची वाट पहात
ओघळत राहातं..!
***
आसावरी काकडे
३१.१.२०१७