Saturday, 6 May 2017

सोसला वैशाख..

सोसला वैशाख
स्वजन-मोहाचा
वास अज्ञानाचा
रोमरोमी

तेव्हा तू झालास
जिवाचा सारथी
कर्मयोग हाती
ठेवलास

ग्लानीतल्या मना
जाग आणलीस
आणि पाजलेस
ज्ञानामृत

तहान वाढली
मनाच्या भुईची
विश्व-दर्शनाची
लागे ओढ

जीव झाला जणू
पक्व वर्षाऋतू
आणि मेघ रे तू
अमृताचा..!

बरस असा की
'विरक्ती' विरेल
हृदयी जागेल
संजीवन..!
***
आसावरी काकडे
६.५.२०१७

No comments:

Post a Comment