Monday, 20 June 2016

थकलेत भोई

माझ्या मनातील
आकाश म्हणाले
किती हे इवले
मन तुझे..!

ओलांड उंबरा
'मी'पण सोडून
रिकामी होऊन
धाव जरा..!

थकलेत भोई
नको तुझे माझे
पालखीत ओझे
नको काही..!

मागे सार भिंती
खिडक्या उघड
पायाचे दगड
मुक्त कर

विस्तारो जाणीव
नको क्षितिजही
नको मागे काही
हवे असे..!


***
आसावरी काकडे
१८ जून २०१६
तरुण भारत दि अंक 16

Friday, 17 June 2016

तो जन्माला आला

तो जन्माला आला
आणि भाषेत पाय रोवून उभा राहिला..!
निरर्थक हा एकच शब्द
त्याला अर्थपूर्ण वाटला..
मग एका प्रदीर्घ आत्महत्येच्या प्रक्रियेचा
अविभाज्य भाग बनून जगत राहिला..

निर्बुद्ध यातना
ओतप्रोत कंटाळा
प्रगाढ अज्ञान
विक्षिप्त प्रतिसाद
आक्षितिज निष्क्रियता..
आणि पावसाची निश्चेष्ट प्रतीक्षा
यांच्या अपूर्व गराड्यात
हेलपटत राहिला..

तो
एक नखशिखांत.. मूर्तिमंत थकवा..!

***

आसावरी काकडे
११ जून २०१६

वळून मागे पाहीलं तर..

मी माझ्या खिडकीतून पहात होते
रस्त्यावरून निघालेला हजारोंचा जत्था
त्यांच्या पायात
सुंदर रंगीबेरंगी पैंजण दिसत होते
त्यांना हसत नाचत चालताना पाहून
नकळत मी माझ्यातून उठले
आणि त्यांच्यात सामिल झाले..!

त्यांच्या सवे नाचताना कळलं नाही
माझ्या मलमपट्ट्यांचे कधी पैंजण झाले ते..
हस्तांदोलन करून परतताना
वळून मागे पाहीलं
तर सगळ्या पायांना
पट्ट्या बांधलेल्या होत्या..

पण माझ्या पैंजणांना
मी पुन्हा पट्ट्या होऊ दिलं नाही..!

***

आसावरी काकडे
मार्च २०१६

Friday, 3 June 2016

कोंब आतून येता

रणरणत उन्हाने
पेटवील्या मशाली
तडफड धरतीची
की शिगेला मिळाली

मग भणभण वारा
वादळी रूप ल्याला
निववुन भवताला
मेघ घेऊन आला

कडकड रव झाला
वीज भेदून गेली
सरसर झड येता
भू जरा शांत झाली

लवलव करणारे
कोंब आतून येता
हळुहळु धरतीही
विस्मरे तो फुफाटा

हिरवळ वर पाही
दूर सारून माती
किलबिल करणारी
पाखरे गीत गाती..!

***

आसावरी काकडे
२ जून २०१६

साप्ताहिक सकाळ 23 जुलै 16

म्हणून घडलं एवढं सगळं..!?

तिला माहीत नाही
कुणाच्या चोचीतून पडलं बी
उडता उडता..
तिनं विचारलं नाही नाव गाव
सहज सामावून घेतलं उदरात
इकडून तिकडून पाणी आलं
ऊन.. वारा.. आणि सर्वसाक्षी आकाशही
तरारली कर्दळ
इमारतीच्या आडोशाला
रानही उगवत राहिलं
तिला बिलगून...

त्याला माहीत नाही
ही कशाची फांदी.. कोणती पानं..फुलं..
उघड्यावरच बहरलेल्या
त्या झुडुपात
त्यानं शोधला आडोसा
पानांच्या आत आत जाऊन
निवांत घासत राहिला इवले पंख
इवल्या चोचीनं
तिथल्या तिथंच उडून पाहिलं जरासं
आणि किलबिलत उडून गेला..!

एका पक्षाला
क्षणभर आडोसा मिळावा
म्हणून घडलं
एवढं सगळं..!?

***


आसावरी काकडे 
१ जून २०१६

नको ते उखाणे..

कुठुन कुठुन येती
जीव एकत्र येथे
परत परत वारी
जातसे नित्य तेथे

अवतन तर कोणी
धाडते ना कुणाला
अविरत पण येथे
नांदते धर्मशाळा

कळत वळत नाही
काय येथे करावे
मिरवुन क्षणमात्रे
काळ येता मरावे

उगिचच जर येणे
भोगणे आणि जाणे
खळबळ सगळी का
का नको ते उखाणे?

***

आसावरी काकडे
१ जून २०१६