Tuesday, 19 July 2016

दुःख शहाणे असते

जेव्हा आतून बाहेरून
पोळत असते
दुःख वादळाच्या रूपात
वारा होऊन येते

आतली ज्योत थरथरू लागते
त्या झंझावातात
तेव्हा दुःख कंदिलाची काच
होऊन येते

सावध राहूनही
कडेलोट झालाच
तर दुःख बिछाना होते

मन काताऊ लागले
कुरकुरू लागले
तर दुःख मोठी रेष दाखवते

कधी ते भोगलेल्या सुखांची
किंमत वसूल करायला येते
तर कधी येणाऱ्या सुखांसाठी
पागडी मागायला येते

आधीच्या रेंगाळलेल्या भिडूला
खो द्यायला येते कधी
तर कधी रुचीपालट म्हणून
भेट द्यायला येते...

दु:ख शहाणे असते..
केवळ दु:ख नाही देत ते
प्रत्येक वेळी जाता जाता
थोडे शहाणपणही देते..!
***
आसावरी काकडे
१८.७.१६

Friday, 15 July 2016

परस्परावलंबन..

सांगितले त्यांनी तोच असे कर्ता
आणि करविता घडे त्याचा

शब्दांचे प्रामाण्य मानून तयांनी
तोच ध्यानी मनी चिंतियेला

अखंड आकांत मांडला तरीही
साक्षात कुणीही आले नाही

कळून चुकले कुणी नाही देव
आहे सर्व ठाव रिता रिता

मग नाही त्याला देऊ केले नाव
साकारला देव भक्तीसाठी

देवाचे निर्माते झाले सर्व संत
अनंत कवेत कवळले

देव-भक्त नाते एकमेकावीण
राहील अपूर्ण असे झाले..!
***
आसावरी काकडे

१५ जुलै २०१६

पण कधी कधी..

दरवर्षी एक कुलूप लागते
बंद होत जाते तळघर

वर्षे गाडतात काय काय किती
कराया गणती वेळ कोणा?

साऱ्या गराड्यात जाते हरवून
वेडे मूलपण प्रत्येकाचे

पण कधी कधी होते अनावर
पडते बाहेर उफाळून

आणि मनमुक्त लागते हुंदडू
उडवीत चेंडू प्रौढत्वाचा..!

***
आसावरी काकडे
१४ जुलै २०१६

Wednesday, 13 July 2016

दुःख म्हणावे दुःखाला

दुःख म्हणावे दुःखाला
आणि सुखालाच सूख
म्हणू नये तृप्त आहे
पोटी असताना भूक

येती प्रश्नातून प्रश्न
त्यांचा घालावा पसारा
गुंता सुटेना झाला की
जीव व्याकुळेल जरा

देह मन बुद्धी सारे
आधी पणाला लावावे
धाप लागेल इतके
प्रश्नांमगून धावावे

काही मिळणार नाही
झोळी रितीच राहील
उत्तरांचे मृगजळ
डोळ्यांतून पाझरेल

अशा निर्वाणीच्या क्षणी
स्वीकारावे निरुत्तर
अतृप्तीच्या पदरात
घ्यावा पार्थीव आहेर..!
***
आसावरी काकडे

१३ जुलै २०१६

हीच त्याची रीत

डोळ्यांच्या खिडक्या अशा सजलेल्या
आशा पालवल्या उत्सवाच्या

कोणता उत्सव प्रतीक्षा कोणाची
कोणत्या क्षणाची देहजाणे

परंतू दारांना कुलुपे किती ही
कुणीही कधीही येऊ नये

खिडक्या उघड्या दरवाजे बंद
आगळाच छंद अदृष्टाचा

असा महालात किंवा झोपडीत
हीच त्याची रीत सर्वांसाठी..!
***
आसावरी काकडे
१२ जुलै २०१६

Thursday, 7 July 2016

काही नको म्हणताना

काही नको म्हणताना
काही हवेच असते
पळणार्‍या मेघांमध्ये
रूप मनीचे दिसते

बोट सोडले तरीही
स्पर्श उरतोच मागे
फूल-गळल्या देठात
रंग असतात जागे

वर वर मौन जरी
गुंते असतात पोटी
एका अटळ क्षणाला
नकळत येती ओठी

मुळे रोवून खोलात
झाडे उभी एका जागी
उदासीन मन तेथे
जाई बनून बैरागी

झाडे काही न करती
पण ठेवतात लक्ष
बुद्ध खाली बसला की
एक होते बोधीवृक्ष..!

***
आसावरी काकडे
७ जुलै २०१६

Wednesday, 6 July 2016

तिजा कोण?

दोन जिवांची बाई मी
ओझे पेलवेना झाले
एक रमतो इथेच
चित्त दुजाचे उडाले

एक खेचतोय पाय
दुजा म्हणे आता पुरे
एक निरोपाला सज्ज
दुजा थंडीला घाबरे

दोन जिवांची अशी ही
ओढाताण सोसतेय
कधी ऐकते एकाचे
कधी थकून जातेय

कळेनासे झाले आहे
देहातले हे त्रिकुट
दोन जीव, तिजा कोण?
एक सनातन कूट..!

***

आसावरी काकडे
६ .७ .२०१६