Saturday, 28 July 2018

रांगोळी


रोज सकाळी उठल्यावर
दिनचर्या सुरू करताना
रात्री मनात रेखून ठेवलेली स्वगतं
मनातच ठेवून ती दार उघडते
झाडपूस करते आणि
दारात बसवून घेतलेल्या
कडाप्प्याच्या चौकोनाला
अभिव्यक्तीचं आंगण समजून
एकेका स्वगताचे ठिपके मांडत जाते..
मनात खोल रुतलेल्या
भावनांच्या बारीक रेषांनी
अलगद जोडून टाकते त्यांना..

आणि
तयार झालेल्या रांगोळीत
असे काही रंग भरते
की स्वगतांचे ठिपके दिसेनासे होतात
भावनांच्या रेषाही झाकल्या जातात..
छान जमून जाते रांगोळी
नकळत एक दीर्घ निःश्वास टाकत
ती आत जाते..
तिला घर निरामय.. प्रसन्न वाटू लागते..

रात्री मनात रोखून धरलेली स्वगतं
रांगोळीत मिसळून ती मुक्त झालेली असते
तिला कळतही नाही की रोज दारात  
ती रांगोळी नाही एक कविता रेखत असते..!
**
आसावरी काकडे
२८.७.२०१८

मुक्तके


का उगा सैराट झाले झाड हे
विद्ध की बेधुंद आहे झाड हे
विसरले की काय गगनाची दिशा
का असे इमल्यात घुसले झाड हे?
**

पाहिले परंतू दृश्य राहिले दूर
ऐकले परंतू दूर राहिले सूर
गात्रात त्यातले सत्व उतरले नाही
काढले चित्र पण तसे उमटले नाही..!
**

नेपथ्य कुणाचे त्याला ठाउक नाही
होणार कोणते नाटक माहित नाही
तो सज्ज होउनी वाट पाहतो आहे
उत्कंठा त्याची कुणास उमगत नाही..!
**

Thursday, 12 July 2018

रान


धुवांधार पाऊस पडून गेलाय
आणि लगेच लख्ख उघडलंय
सुस्नात रान सावरून बसलंय
मोर बाहेर पडलेयत पुन्हा
पक्षीही पंख झाडून झेपावलेत
असंख्य रंगाकार परतलेत
आपापल्या आकारात...
पण गाढ मौनात आहे परिसर अजून
इथे येऊन गेल्याच्या कैक पाऊलखुणा
वाहून गेल्यायत...
नवागतासारखी मी निरखतेय
आसपास नाहीए कुणी रानाशिवाय
अगदी शांत आहे सर्व
तरी असे का वाटतेय
की कुणीतरी घुसमटतंय
कुणीतरी कोंडी केलीय त्याची
एक शब्द फुटत नाहीए
रानाच्या ओठांतून...!

***

आसावरी काकडे
२६.६.२०१८

मुक्तके



टांगले कोणी हुकाला टांगु दे ना
मौज गिरक्यांची जराशी चाखु दे ना
गुंतणे की मुक्तता ही? काही असो
झिंग थोडी यातलीही घेउ दे ना..!
***
२२.६.२०१८

रात्र म्हणाली दिवसाला मी थकले आहे
तुला वाटते भाग्यवान मी निजले आहे
प्रत्येकाच्या स्वप्नांमागे रोज धावते
सोंगांसाठी तरी अपूरी ठरले आहे..!
***
२४.६.२०१८

चित्रकार की कवी कोण तो लपून असतो
कधी आकृत्या कधी अक्षरे ढाळत असतो..!
कुणास दिसते चित्र त्यामधे कुणास कविता
तो तर केवळ अव्यक्ताला झाकत असतो..!
***
२६.६.२०१८

Wednesday, 11 July 2018

आतला पूर

बयो,
किती बेफाम सुटलीयस
मागचे बंध तोडून..
पण जरा बघ
तुझ्या दोन्ही तीरांवर
कोण कोण उभं आहे...

तुझ्या संथ वाहण्यानं
रुजलेत..फुललेत..बहरलेत
किती रंग.. गंध.. किती आकार
तुझा अनावर आवेग त्यांना सोसवेल का?
आणि तुला तरी?
थांबल्यावर भोवळशील गं
सार्‍या भवतालासह..!

‘मला उद्‍ध्वस्त व्हायचंय’
ही बेभान करणारी झिंग
गळामिठी घालून बसलीय तुला
पण आवर बयो हा आतला पूर
सावर स्वतःला
बघ, तुझ्या दोन्ही तीरांवर
कोण कोण उभं आहे
पसरलेल्या बाहूंचे हार घेऊन
संथ होऊन परतलेल्या
तुझ्या स्वागतासाठी...!

पूर पचवशील तर
होशील एक समृद्ध डोह
आवेगांची कमळं फुलवणारा
आणि उद्‍ध्वस्त होशील
तर भवतालासह
फक्त उद्‍ध्वस्तच होशील बयो..!
**
आसावरी काकडे
११ ७ २०१८

Thursday, 5 July 2018

नव्या पर्वाच्या प्रतीक्षेत...


ऋतूंच्या वेळापत्रकानुसार 
पंचमहाभूते साजरी करत असतात 
आपली मर्दुमकी
आणि त्यांची री ओढत
सणासुदीचे दिवस लवथवत असतात घराघरात

उत्साहाचे घट ओसंडतात
मनामनातल्या गोपींच्या डोईवरचे
फुला-पानांच्या रांगोळ्या रेखल्या जातात 
रानावनात

संपूर्ण चराचरात आनंदाच्या सतारी झंकारत असताना 
एक वर्ज्य स्वर तारांवरून निखळतो
स्वतःला हरवून टाकावं म्हणून शोधतो
एक सुन्न काळवंडलेलंं मन..
तिथं दिसतो त्याला त्याच्याचसारखा निखळलेला
एक भरोसा
तो त्याचं बोट धरून चालत राहतो
ऋतूंचे नवे पर्व सुरू होण्याच्या
प्रतीक्षेच्या वाटेवरून...!
***
३०.६.२०१८