Tuesday, 9 August 2016

निरंग

दोन प्राणात असते
फक्त त्वचेचे अंतर
बाहेरचा प्राणवायू
प्राण आत आल्यावर

असे सर्वांचा बाहेर
कोट्यवधी शोषतात
आत नेऊन त्यालाही
नाव आपले देतात

करू पाहतात बंद
देहघरात आपल्या
करतात रोषणाई
आत लावून दिवल्या

तोही नांदतो सुखाने
लकाकतो डोळ्यांतून
तेज जिवंतपणाचे
निथळते रंध्रांतून

ये-जा चालूच अखंड
नित्य खेळतो स्पर्शात
रक्तामध्ये मिसळून
भिरभिरतो गात्रांत

आत-बाहेर सर्वत्र
कणाकणात व्यापला
रंग प्राणाचा तरीही
नाही कुणाला कळाला..!
***
आसावरी काकडे
९.८.२०१६

Monday, 8 August 2016

कळेना मलाही..

कळेना मलाही कुठे राहते मी
कसे बंध येथे उन्हाशी जुळाले

जरी रांधले शब्द प्राणांत सारे
मला मीच नाही अजूनी कळाले..!

किती लोक येतात भेटावयाला
जुने स्पर्श ठेवून जातात वेगे

कसे सोबती काय बोलून जाती
कळेना तयांना घडे काय मागे

अता होउदे बोलणे आतल्याशी
जरा बाजुला व्हा नको व्यर्थ माया

कुडी वृद्ध झालीय संपेल यात्रा
असे वेळ थोडाच गाडी सुटाया

***

आसावरी काकडे
८.८.२०१६

Friday, 5 August 2016

ती एक अनाम भिल्लिण

ती एक अनाम भिल्लिण
आपल्या पाच तरुण मुलांसह
लाक्षागृहात जळालेली..!

त्यांचा अपराध नव्हताच काही
त्यांना केलेली शिक्षाही नव्हती ती
एका कटाला काटशह देण्यासाठी
आखलेली केवळ एक योजना होती..!

दूर्योधनाला आगीत होरपळलेले
सहा देह दिसले
आणि पाची पांडव कुंतीसह सुखरूप निसटले
पुढे मोठे महाभारत घडले...
वर्षानुवर्षे त्याचे गोडवे गायले गेले..!

कुणाला कळलंही नाही की
त्यासाठी एका निरपराध कुटुंबाचा बळी गेला...
क्रौर्य असं घरंदाज की
अत्याचाराचा मागमूसही लागला नाही कुणाला
आजतागायत...!

किती कथांमधल्या किती फटी
अशा बेमालूम बुजवल्या असतील कथाकारांनी
ज्यात कित्येक स्त्रिया.. आदिवासी
गाडले.. चिरडले.. होरपळले असतील..!
***
आसावरी काकडे
३.८.२०१६

काय माझा गुन्हा..

काय माझा गुन्हा रामा
मला तुझा मोह झाला
मन उघडे मी केले
राग आला सौमित्राला

लंकापती भ्राता माझा
मीही सामान्य नव्हते
गेले असते माघारी
नाही म्हणायचे होते

पण उठला त्वेशाने
कुलवंत राजपुत्र
नाक छेदून बाणाने
मला केले विटंबित

काय आदर्श घातला
त्रेतायुगात भावांनी
स्त्रीला विद्रुप करणे
गिरविले पुढीलांनी

प्रेम मागितले तरी
विद्रुपता स्त्रीच्या भाळी
प्रेम अव्हेरीले तरी
तिच्यावर हीच पाळी..!
***
आसावरी काकडे

Thursday, 28 July 2016

तरीही

किती जाळली लाकडे, पाहिले ना
किती थापल्या भाकरी, मोजले ना

कधीची अशी रांधते माय येथे
तरी पोट का रे कुणाचे भरेना..?

खरी भूक थोडेच मागे परंतू
मनातील हव्यास का आवरेना

समुद्रात येई नद्यांचेच पाणी
सराईत खारेपणा का सरेना?

रकाने भराया किती शब्द येती
दिलासा कुणाला तरी का मिळेना

किती जन्म येथेच झाले तरीही
जिवाला कुणी ओळखीचे दिसेना..!
***
आसावरी काकडे
28.7.2016
(साप्रेभ. दि. अंक २०१६)

सावली

केव्हातरी काढलेलं
माझं एक कृष्णधवल छायाचित्र-
खिडकीत बसलेली मी
चेहर्‍यावर अर्धा उजेड
अर्धी सावली..!

मनात आलं...
किती वर्षे झाली
मी अर्धीच वावरतेय सर्वत्र
सावलीतली अर्धी मी
अजून दिसलेच नाहिए कुणाला
माझंही कुठं लक्ष गेलं
आजवर तिच्याकडं..?

खरंतर
जन्मक्षणापासूनच
आपल्या सोबत असते
आपली सावली
पाहात असते जवळून
गळणार्‍या पानांसारखा
जगलेला एकेक क्षण...
बाहेर पडणारा एकेक निःश्वास
निर्माल्य बनत वाहून जाताना..

वजा होत जाणार्‍या
उजेडातल्या आपल्यावर
लक्ष ठेवून असते
हसत असते आपल्या
सुख-दुःखांना.. काळज्यांना..स्वप्नांना
बोलत नाही काही
मिसळत नाही आपल्यात
नुसती चालत राहाते सोबत..

पण वाटतं
कधीतरी अचानक
स्वतःतच सामावून घेईल ती
उजेडातल्या आपल्याला
कल्पनाही न देता
आणि
अदृश्य होईल निराकारात..!
***
आसावरी काकडे
२६ जुलै २०१६

Tuesday, 26 July 2016

किती अजून आहे दूर

अब्जावधी वर्षांमधली
किती वर्षे जगून झाली

किती अंतर कापून झाले
किती अजून बाकी राहिले

किती अजून आहे देणे
चालू आहे आळवणे

गाणं मागतोय तो सूर
किती अजून आहे दूर

किती विटा झाल्या रचून
किती वेळा घेतले लिंपून

किती अजून बाकी भर
केव्हा होईल बांधून घर

अब्जावधी येथे जीव
अनंत काळ करतो कीव

प्रत्येकावर नाव तुझे
तरी चाले माझे माझे

***

आसावरी काकडे
२६ जुलै 2016